बुधवार, १७ फेब्रुवारी, २०२१

खुणा


 खुणा.

*****

माझ्या मनातील खुणा 

दत्ता पुसता पूसेना  

व्रण स्मृतीचा खिळ्यांचे

खोल आतील मिटेना  


इथे लपवितो काही  

डाग बेपर्वा पडले

वस्त्र मलमली मृदू

जरी त्यावरी ओढले


दिला मुलामे वरती 

बरे वाटे पाहताना 

दोन दिसात परंतु

तडे पडती तयांना 


आत जाणतोय परी 

माझ्या साचल्या व्यथांना 

जन्म दारभ्य वाहीले 

त्याच त्याच कामनांना


तुवा दिधली घालून 

जग चालवया रीत 

देवा चुकलो चुकलो 

नच झाले रे स्वहित 


तुच करविता सारे 

नीती नियमांचे द्वार 

नाही म्हणत तुजला 

तया अपवाद कर 


करे विनंती दयाळ 

एका नव्या आरंभास

जुने मोडून पडू दे 

व्यापी तुच जीवनास 


तुझा होवून विक्रांत

सदा राहो रे पदास 

ओझे सुखांचे चुकांचे 

नको आता या जीवास

*********


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********


रविवार, १४ फेब्रुवारी, २०२१

सावल्यांचे जग

सावल्यांचे जग
***********

सावल्यांचे जग असते अगदी खोटे खोटे 
कुणी कुणाचा धरला हात कुणा न कळते 

धरल्या वाचून धरल्याचा होतो कुणा भास 
धरला की न धरला प्रश्न पडती कुणास 

सावल्यांच्या जगाचे पण एक बरे असते 
कुठलीही सावली न कधी कुणा चिकटते 

सुंदर असते कधी अथवा विद्रूप दिसते 
मूळ वस्तूस परी त्याची फिकीर नसते 

सावली होऊन कधी कुणी कुणाची जगते 
सावली सम पाठलाग कुणी कुणाचा करते 

तीच सावली कार्य कारण जाता बदलून जाते 
कळल्या वाचून कुणालाही किती वेगळी होते 

सर्वात सुंदर सावली पण वृक्षाचीच असते 
भर उन्हात वनव्यात जी शीतलता देते 

कधी एकांतात चालतांना उगाचच रस्त्यात 
सावलीचाच राक्षस होतो आपल्या मनात 

रात्रही असते खरंतर फक्त एक सावली 
आपल्या देहावरती अवनीने पांघरली 

चंद्रही सावलीत तिच्या त्या लुप्त होतो 
पौर्णिमा अमावस्या आहे जगास सांगतो 

प्रकाशाचा अर्क सूर्य सर्व सावल्यांचा नियंता  
त्याची छाया असेल का पडत कुठे जगता  

सावलीच्या प्रश्नाला सावलीच उत्तर 
प्रकाशाचा अंत होता उरे सावली नंतर 

सावल्यांची जग हे सदा गुढ कोडे घालते 
कधी काळी भिवविते सदैव मज खुणावते


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

मंगळवार, ९ फेब्रुवारी, २०२१

निरोप

निरोप
******

तुझी जाण्याची ती घाई 
माझ्या जीवावर येई 
सूर नुकता लागला 
गाणे हरवून जाई  ॥

पण जाहली ती भेट 
हे ही काही कमी नाही  
वर्षाकाठी बहरतो 
ऋतू वसंत तो पाही ॥

नाही बोलणे घडले 
मन सारे उघडले
परी स्पर्शात क्षणाच्या 
सुख अमृत सांडले ॥

पुन्हा विरह सामोरी 
जणू प्रवास सागरी 
उदयास्त पाहतांना 
तुज स्मरणे अंतरी ॥

तुझ्या गहिर्‍या डोळ्यात
प्रेम पाहिले अलोट
पुन्हा जीवना मिळाला 
एक जीवनाचा घोट  ॥

चल येतो ग सोडाया
पळ सोबत आणखी 
जन्म कुठला असेल 
तुझ्या सोबत आणखी ॥

*****
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

सोमवार, ८ फेब्रुवारी, २०२१

राधा


राधा
*****

खरंच होती का 
राधा अस्तित्वात ?
कुणास ठाऊक 
पण नाही सापडत 
ती भागवतात !

पण तिने व्यापलेले 
आकाश इतके प्रचंड आहे 
की तिचे देहाने असणे नसणे 
गौण आहे भाव जगतात 

खरंतर राधा असते 
भक्तीने भारलेल्या 
प्रत्येक मनात . .
त्या अवस्थेचे
परमोच्च शिखर होऊन 

तो राधा भाव 
हृदयात उतरला की 
कृष्णही जातो 
जणू आपण होवून

बाकी फुटकळ शृंगाराच्या 
कथा त्यांच्या 
ठेवल्या आहेत 
बऱ्याच आंबट शौकीनांनी लिहून 
त्या त्यांच्या मनातील 
वासनांच्या चिंध्याच आहेत 
लपवलेल्या  
राधा कृष्णरुपी 
तलम वस्त्रानी पांघरुन
खोटा साज लेववून 

जसजसा
राधेचा विचार करावा 
तसतसे असे वाटते 
ती अवस्थाच आहे 
देहातीत 
ज्यात वाजत असते 
कृष्ण धून 
बासरीच्या अनाहत सुरांनी 
अन झिरपत असते
पौर्णिमा 
सहस्त्र दलातील 
चंद्रातून 
पेशी पेशी तुन होत असते 
नर्तन 
जाणवत असते 
स्पंदन 
चैतन्याचे आनंदाचे
शब्दातीत सुखाचे 

सर्व कर्मेंद्रिये 
पंचेंद्रिये 
सूक्ष्म इंद्रिये 
जातात एकवटून 
त्या एका जाणिवेत 
ती जाणीव 
म्हणजेच 
राधा !

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

रविवार, ७ फेब्रुवारी, २०२१

रजकास धन्यवाद


वासनेचा खेळ 
जाणती श्रीगुरु
म्हणुनी कृपाळू 
जन्म देती ॥१॥

भोगल्या वाचून 
सुटती न काही 
म्हणुनिया पाही 
भोगवती ॥२॥

अनंत जन्माच्या 
अनंत वासना 
भोगवून मना 
सोडवती ॥३॥

इंद्रीय शमन 
करुनिया मन 
निर्मळ होऊन
जात असे ॥४॥

अन्यथा बाधक 
होतात सतत 
राही फिरवत 
योनीतून ॥५॥

पहा रजकाचा 
जीवन वृत्तांत 
गुरुचरित्रात 
वर्णिलेला ॥६॥

म्हणूनीया भोग 
आला जो वाट्याला 
भोग रे तयाला 
जाणुनिया ॥७॥

आणिक नवीन 
फुटो न अंकुर 
ऐसे गुरुवर 
करताती ॥८॥

भोग रोग योग 
कौतुक गुरूंचे 
मोक्ष पथिकाचे
मुक्काम हे ॥९॥

कर्म प्रारब्धाचे
गणित चक्राचे 
कुणा कळायचे 
तयाविन ॥१०॥

भोग ही भोगावे 
रोगही भोगावे 
गुरूला स्मरावे 
अंतरात ॥११॥

विक्रांत रजका 
देई धन्यवाद 
भोग क्लेश वाद 
धडा दे जो ॥११॥

मिळे आश्वासन
गुरू घडवून
आणती जीवन
भक्तांचे रे ॥१२॥

श्रीपाद वल्लभ
भक्तांचे तारक3
हिताचे रक्षक 
सर्वकाळ ॥१३॥

विक्रांत शरण 
तयाला जावून 
म्हणे सांभाळून 
घेई दत्ता  ॥१४॥

****

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

शनिवार, ६ फेब्रुवारी, २०२१

निळेपण


निळेपण
********

मुक्त आकाशात 
चैतन्याचा पूर 
प्रकाशाचा नूर 
निळा निळा  ॥

निळेपणी चंद्र 
मिरवितो आभा 
प्रकाशाचा गाभा 
दाटलेला  ॥

निळ्या पाणियात 
निळ्या निळ्या लाटा 
प्रकाशाच्या वाटा 
असंख्यात ॥

निळूली चांदणी 
निळेपणी खणी 
तेजाच्या अंगणी 
लखलखे॥

निळसर नग
गडद ध्यानस्थ 
न्याहाळे अंतस्थ 
निळेपण  ॥

पाहता पाहता 
डोळे झाले निळे 
निळूले ओघळे
नीलपाणी  ॥

निळे झाले मन 
निळे झाले तन
हसतोय कृष्ण 
नीलमनी ॥

विक्रांत निराळा 
नुरेचि वेगळा 
झाला निळा निळा 
कृपा दत्त  ॥

**********
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

मंगळवार, २ फेब्रुवारी, २०२१

वृक्ष मरण



एक मरण
*****
एक झाड होतं 
सांगा गेलं कुठं 
भर चौकात 
वाढलेलं मोठं 

कोणी सोडलं रं
कुणी मोडलं  रं
स्वप्न सजलेलं 
नभी हरवलं 

होती छाया गर्द 
खगा सवे बाळ 
तया बुंध्या चाले
बालकांचा खेळ 

दिसे माती आता 
वर उकलली 
कण ‍ पाचोळ्याचे 
झुडपाच्या खाली 

असे भरलेलं 
दुःख अवकाशी
मूक आकांताच्या
पडलेल्या राशी 

गाड्या जाती आता 
तिथं मिरवत 
रस जीवनाचा 
पडे निपचित

 दुःख माझे डोळा 
येतं ओघळतं 
कुणी पुसे मज
काय डोळीयात 

कसे सांगू तया 
मज काय झालं
जणू काळजाला
खिंडार पडलं

झाड नाही आता 
होऊन जळणं 
रोज चाले मी ही 
गिळून मरण


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
**********

रिक्तत्ता

रिक्तत्ता ******* क्षणा क्षणाने कळल्या वाचूनी आयुष्य येते ऋतू घेवूनी  हसवून रडवून चोरपावलांनी रंग खेळूनी जाते उलटुनी  काय कमावल...