रविवार, १८ ऑक्टोबर, २०२०

माय

माय
*****

जीवनाचे ओझे 
पाठीवरी माय 
चालतात पाय 
अनवाणी ॥१॥
पाठीवर झोका 
चाले भर राना 
झोपलेला तान्हा 
मुटकळी ॥२॥
ऐसी भगवती 
उन्हात रापली 
जीवना भिडली 
बाळपणी  ॥३॥
लत्करेलंकार 
मोळी शिरावरी 
पोट तयावरी 
टांगलेले ॥४॥
करतो नमन 
मान झुकवून 
कुठल्या तोंडाने 
जय म्हणू॥५॥
विक्रांत सुखात 
दुःखाचा उमाळा 
वांझ कळवळा 
वेदनांचा॥६॥

कवितेसाठीकविता
**********
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 

शुक्रवार, १६ ऑक्टोबर, २०२०

मरण

मरण
*****

हृदय थकले हृदय थांबले 
आणि कुणाचे जगणे सरले 

कुणी मरे का असा इथे रे 
काल हसता आज नसे रे 

हे चलचित्र सदा दिसे रे 
मरणे जणू खेळ असे रे 

जग चालले मीही सवेत 
घेवून मृत्यू माझ्या कवेत 

अनंत परी असे कामना 
विचारती ना मुळी मरणा 

माडीवरती  चढली माडी 
आणि सुन्दर आणली गाडी 

मुले गोजिरी द्रव्य भरली 
जगण्याची ना हाव मिटली 

परी शेवटी बसे तडाखा 
पाने गळून वृक्ष बोडखा 

तर मग हे आहे कशाला 
भोगामध्येच प्रश्न बुडाला 

असे अमर सदा सर्वदा 
पूनर्जन्माचा जुना वायदा 

**********
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 

गुरुवार, १५ ऑक्टोबर, २०२०

पायदान

पायदान

*******

मज अवघ्याचा 

आलाय कंटाळा 

दत्ता कळवळा 

येत नाही ॥

वाहतोय ओझे 

तनाचे मनाचे 

गीत या जगाचे 

नको वाटे ॥

धन धावपळ 

मन चळवळ

चाललाय खेळ 

अर्थ शून्य 

निसंग निवांत 

करा भगवंत  

अतृप्त आकांत 

सुटोनिया॥

तुझिया प्रेमाने 

करी रे उन्मत्त

सारे शून्यवत 

भोग होतं ॥

सुटू दे गाठोडे

विक्रांत नावाचे  

होऊ दे दाराचे 

पायदान॥


**********
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 





मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०२०

चंद्र दिला

चंद्र दिला
********
कुणीतरी कधीतरी 
चंद्र दिला हातावरी 

थरथर स्पर्शातून 
गाणे आले बहरून 

काही शब्द माळलेले 
काही शब्द ओघळले 

गंध होता पाझरत 
कागदाच्या घडीतून

झुकलेले डोळे काळे 
दुमडले ओठ ओले 

भाळावरी रुळलेले 
कुंतल ही लाजलेले

कुणीतरी मन दिले 
काळजात घर केले 

आठवते अजूनही 
संध्यारंग उजळले 

भास होतो मीच मला 
कणकण झंकारला 

तीच मूर्ती काळजात 
लेणे झाली वेरूळात 

युग जरी आले गेले 
क्षण तेच थिजलेले 

म्हणूनिया तुझी प्रीती
उमटते माझ्या गीती

**********
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 


सोमवार, १२ ऑक्टोबर, २०२०

आरसा

आरसा
*******

दत्त दावितो मजला 
माझ्या मनीचा आरसा 
धूळ भरल्या वासना 
पारा गळल्या लालसा 

दत्त सांगतो मजला 
पुस पुस रे तो बाळा 
निज साधना रुपाने
तया प्रक्षाळूनी जळा

दत्त म्हणतो मजला 
पाही पाही रे तयाला 
ज्याने अंतरात कैसा 
अैसा आरसा ठेवला

दिसे आरसा आरश्या
जरी समोर ठाकता 
रूपे शेकडो अनंत 
थांग लागेना लागता 

मन मना न कळते
मन शोधावया जाता 
मन परावर्ति माया 
होते सहस्त्र फुटता 

सदा मग्न हा आरसा 
खेळी प्रतिबिंबि असा
नसे बिंबाहून तया 
काही अर्थ तोहि तसा 

फोडू म्हणता म्हणता 
नच फुटणार कधी 
जोडू म्हणता म्हणता 
नच जोडणार कधी 

आहे नाही पण त्याचे 
कधी पाहियले कुणी 
दत्त दावितो हसतो 
नाही विक्रांत रे कुणी

**********
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 

शनिवार, १० ऑक्टोबर, २०२०

कागदाचे ऋण

कागदाचे ऋण
***********
कागदाचे ऋण 
वाहते जीवन 
अरे तया विन 
सारे उणे ॥

शिकलो अक्षरे 
तयात पाहून 
आकडे घोकून 
पाठ केले ॥

किती चित्रकथा 
वाचल्या सुंदर 
कौतुके अपार
दाटुनिया ॥

जाहली ओळख 
आणि कवितेची 
माझिया प्रितीची 
हृदयस्थ ॥

ज्ञानाचे भांडार 
आणले समोर 
चांगला डॉक्टर 
घडविले ॥

अन मग भेटी 
आली ज्ञानदेवी 
कागद ते दैवी 
अपूर्वच॥

जाहलो आनंद 
रंगून तयात
सुख मूर्तिमंत 
भरलेला ॥

गाथा दासबोध 
कृष्णमूर्ती थोर 
बुद्धादिक येर
मिळविले ॥

गिर्वाण संस्कृत 
आंग्ल नि भाषेत 
गेलो भटकत 
अनिवार॥

कोरेपणी केले
मज ब्रह्मदेव 
कवितेचा गाव 
रचियता ॥

माझ्या जीवनात 
असे हा कागद 
मज अलगद
सांभाळता ॥

सुखात दुःखात 
यशपयशात
जाहला तो देत 
साथ मला ॥

आताही हातात 
धरूनिया हात 
असे मिरवत 
लिहलेले ॥

जर हा नसता 
कागद जीवनी 
विक्रांत वाहनी
व्यर्थ होती ॥

**********
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 



शुक्रवार, ९ ऑक्टोबर, २०२०

नंदी पालथा


नंदी पालथा
**********

दत्त भजता भजता 
झालो दत्त विसरता ॥१
रूप गेले नाम गेले 
शब्द ठणाणा सांडले ॥२
दत्त चित्त एकटक 
मन आहे टकमक ॥३
झालो माकड मनाचे 
परी डोळे न फुटले ॥४
कोण भजतो कोणाला 
नंदी पालथा पडला ॥५
होता मातीचाच गोळा 
विक्रांत जलौघ झाला ॥६

***********
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...