शनिवार, १० ऑक्टोबर, २०२०

कागदाचे ऋण

कागदाचे ऋण
***********
कागदाचे ऋण 
वाहते जीवन 
अरे तया विन 
सारे उणे ॥

शिकलो अक्षरे 
तयात पाहून 
आकडे घोकून 
पाठ केले ॥

किती चित्रकथा 
वाचल्या सुंदर 
कौतुके अपार
दाटुनिया ॥

जाहली ओळख 
आणि कवितेची 
माझिया प्रितीची 
हृदयस्थ ॥

ज्ञानाचे भांडार 
आणले समोर 
चांगला डॉक्टर 
घडविले ॥

अन मग भेटी 
आली ज्ञानदेवी 
कागद ते दैवी 
अपूर्वच॥

जाहलो आनंद 
रंगून तयात
सुख मूर्तिमंत 
भरलेला ॥

गाथा दासबोध 
कृष्णमूर्ती थोर 
बुद्धादिक येर
मिळविले ॥

गिर्वाण संस्कृत 
आंग्ल नि भाषेत 
गेलो भटकत 
अनिवार॥

कोरेपणी केले
मज ब्रह्मदेव 
कवितेचा गाव 
रचियता ॥

माझ्या जीवनात 
असे हा कागद 
मज अलगद
सांभाळता ॥

सुखात दुःखात 
यशपयशात
जाहला तो देत 
साथ मला ॥

आताही हातात 
धरूनिया हात 
असे मिरवत 
लिहलेले ॥

जर हा नसता 
कागद जीवनी 
विक्रांत वाहनी
व्यर्थ होती ॥

**********
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 



शुक्रवार, ९ ऑक्टोबर, २०२०

नंदी पालथा


नंदी पालथा
**********

दत्त भजता भजता 
झालो दत्त विसरता ॥१
रूप गेले नाम गेले 
शब्द ठणाणा सांडले ॥२
दत्त चित्त एकटक 
मन आहे टकमक ॥३
झालो माकड मनाचे 
परी डोळे न फुटले ॥४
कोण भजतो कोणाला 
नंदी पालथा पडला ॥५
होता मातीचाच गोळा 
विक्रांत जलौघ झाला ॥६

***********
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 

मंगळवार, ६ ऑक्टोबर, २०२०

विधात्याचा विधाता

विधात्याचा विधाता 
**************

विधात्याने ठरविले 
रडायला पाठविले 
रडण्याला रडू आले 
ऐसे दत्ता कडू केले 

विधात्याने लिहियले 
कधी कुणी चुकविले 
भोगतांना परी सारे 
भोगणार्‍या हरविले .

विधात्याने काम केले 
पाप-पुण्य पाहियले
कण  क्षण मोजुनिया
तोलुनिया माप दिले

तिथेही चूक होत नाही 
ज्यादा हाता येत नाही 
दत्त विधात्याचा बाप
गणित मानत नाही. 

विधात्याचा विधाता तो 
सुक्ष्म स्थुलि नांदतो तो 
गिळुनि ओंकार सारे 
महाशुन्यि खेळतो तो .

विधात्याने ठरविले 
बदले सहज दत्त 
प्रिय लेकरास देतो 
सजवून दुजे ताट 

म्हणे विक्रांत म्हणूनि
व्हारे हट्टी दत्त भक्त 
खांद्यावरी बाप घेतो 
सुखावती सारे कष्ट 

***********
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 


सोमवार, ५ ऑक्टोबर, २०२०

माहेर

माहेर
******
माझ्या माहेराचे 
झाले गुणगाण 
आनंद उधान
मनामध्ये ॥

माऊलीची कीर्ती 
ऐकुनिया लेक 
होऊन भाऊक 
जी जी म्हणे ॥

पावसाची आई 
माझ्या हृदयात 
सोहम भजनात 
जोजावते॥

त्याचतिच्या गोष्टी 
ऐके पुन्हा पुन्हा 
परी सरेचिना 
गोडी कधी ॥॥

सहज सुंदर 
किती मनोहर 
चैतन्य सागर 
असुनिया ॥

करुणा कृपाळ
करे अंगीकार 
देह मनावर 
मळ जरी ॥ 

विक्रांत पातला 
पावक प्रकाश 
पावस आकाश 
पांघरुनी ॥
***********
डॉक्टर विक्रांत प्रभाकर तिकोने

रविवार, ४ ऑक्टोबर, २०२०

शिवरायांची माणसं

शिवरायांची माणसं
*************

माझिया राजाची 
माणसं सोन्याची 
प्रचंड प्रेमाची 
अलौकिक ॥

माझ्या राजाची 
माणसं लोहाची 
दुर्दम्य इच्छेची 
अविचल ॥

आणिक राजा तो 
जणू की परीस 
जिवंत मातीस 
करणारा ॥

आहा ते भाग्याचे 
पाईक सुखाचे 
जाहले तयाचे 
सहकारी ॥

देव देशासाठी 
आयुष्य वेचून 
गेले ते कोरुन  
नाव इथे ॥

विक्रांत तयाच्या 
नमितो पदाला 
वाणितो भाग्याला 
शतवार ॥

अशा राजासाठी 
लाखदा जगावे 
लाखदा मरावे 
इहलोकी ॥

राजे शिवराय 
मला देवराय 
वाणू किती काय 
नच कळे ॥

म्हणून नमितो 
मुजरा करतो 
ह्रदयी धरितो 
सर्वकाळ॥

********
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com

शनिवार, ३ ऑक्टोबर, २०२०

तुझे बोल (उपक्रमासाठी)


तुझे बोल 
************

तुझे बोल चांदण्याचे 
अवसेच्या विभ्रमाचे 
दव होतं ओघळत्या
अलवार वा शीताचे 

तुझे हासू पावसाचे 
उसळत्या तूषाराचे 
लहरत्या फेसाळत्या
गंगौघाच्या उगमाचे 

तुझी दिठी आभाळाची 
निळ्याभोर सागराची 
गुढ काळ्या भरलेल्या 
यमुनेच्या गं डोहाची 

तुझी मिठी कुसुमांची 
गंध धुंद झुळुकांची 
मृदु मंद अलगद 
पिंजलेल्या मेघुटाची

शब्दातीत तुझी प्रीती 
अवतरे माझ्या गीती
मानतो मी तुझ्यासाठी
शब्द अपुरे हे किती 

*********
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com

शुक्रवार, २ ऑक्टोबर, २०२०

गुरूवर

गुरूवर
******

याहो संत जन 
या हो एक वार 
मज गुरुवर 
भेटवा हो ॥
मी तू पणाचा हा 
मिटुनिया खेळ 
आत्मतत्वि मेळ
करू द्या हो ॥
सारी दलदल
देहाची मनाची 
साचल्या भोगाची
हटवा हो ॥
व्यर्थ नातीगोती 
व्यर्थ उठाठेव 
निरुद्देश गाव 
सुटू द्या हो ॥
गुरुराव असे 
मुक्तीचे ते द्वार 
असे पूर्वापार 
ऐकुनी हो ॥
बहु शोधियले
परि दिसेनाची 
जन्म अंधाराची 
कोठडी हो ॥
विक्रांत जगात 
तिमिराचा भास
मिटूनी डोळ्यास
असे काय॥
प्रकाश होऊनी
तेजाने भरूनी
मज सामावूनी
त्यात घ्या हो॥

*********
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com

रिक्तत्ता

रिक्तत्ता ******* क्षणा क्षणाने कळल्या वाचूनी आयुष्य येते ऋतू घेवूनी  हसवून रडवून चोरपावलांनी रंग खेळूनी जाते उलटुनी  काय कमावल...