मंगळवार, ८ सप्टेंबर, २०२०

गिरनार चढत

गिरनार चढत 
***********
प्रत्येक पायरीशी थोडे घुटळत 
प्रत्येक पायरीला हळू कुरवाळत 
जावा गिरनार हळू हळू चढत 

प्रत्येक पायरीवर दत्त स्मरत
प्रत्येक स्पर्शात ऊर्जा अनुभवत 
जावे गिरनारच्या मुळापर्यंत 
आदिम शक्तीशी  तादात्म्य पावत 
 जावा गिरणार  हळूहळू चढत 

त्या पवित्र वृक्षांचे कौतुक करत 
त्यांच्या सावल्यांना धन्यवाद देत 
कातळ कपाऱ्यांना लळा लावत
जावा गिरनार हळूहळू चढत 

ते दत्त जीवलग नवनाथ 
हजारो लाखो संत-महंत 
अगणित प्रेमळ भाविक भक्त 
यांना मनोमन वंदन करीत
जावा गिरणार हळूहळू चढत 

कधी भणाणता वारा झेलत 
कधी कोसळत्या धारात भिजत
थरथरणारे अंग आपलेच पाहत 
जावा गिरनार हळुहळु चढत 

कधी उन्हाच्या रौद्र कहरात 
असताना अंग लाही सारखे फुटत 
वा घामाच्या धारात अखंड नहात 
सुकलेल्या गळ्याला पाण्याने भिजवत 
जावा गिरणार हळूहळू चढत 

आणि पोहचताच गुरु शिखरावर 
सर्वस्व आपले अर्पण करत 
 होऊन अगदी रिक्त रिक्त 
जावे दत्तप्रभुची एकरुप होत

पुढे कृतज्ञता धन्यता ओतप्रोत
 उर्जेने भरलेला देह सावरत 
सार्थकतेने भरले डोळे पुसत
जावे गिरनार हळूहळू उतरत 
***********
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 

सोमवार, ७ सप्टेंबर, २०२०

सोयरीक


सोयरीक
********
करा सोयरिक 
माझिया दत्ताची 
सोडून गाठोडी 
देहाची मनाची ॥
जोडा अनुबंध 
शुभ ते सकळ 
फेकून मलिन 
दाटलेला मळ ॥
तया आन आम्ही 
काय ते देणार 
भाव फक्त शुद्ध 
प्रीती तारणार ॥
निसंग निर्मळ 
ऐसा गंगाजळ
होय औट हात 
असून आभाळ ॥
प्रेमासाठी प्रेम 
भक्तीसाठी भक्ती 
देई रे कृपाळा 
एवढे विक्रांती ॥
☮☮☮☮☮☮☮ 
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 

घर

 घर.
*****
शनिवार ची रात्र झाली की 
सगळे धुवायचे कपडे बॅगेत कोंबून 
मी होस्टेलवरून निघायचो 
सेंडहस्ट रोडला ठाण्याची लोकल पकडायचो 
शनिवारी बहुदा बसायला मिळायचे 
आणि मग ठाण्याकडे प्रवास सुरू व्हायचा 
त्यावेळी खिडकीतून दिसायची असंख्य घरे 
कित्येक चाळी कित्येक इमारती काही झोपड्या
आणि त्या इमारतींच्या इवल्या-इवल्या खिडक्या 
कधीकधी ट्रेन स्लो व्हायची 
अन त्या खिडक्यातून 
दिसायच्या काही हालचाली 
आठ नऊ ची गडबड
मुलांची बडबड
किचनच्या शिट्यांचा आवाज 
एका लयीतील बातम्या कधी गाणी
प्रत्येक खिडकीच्या आत एक घर 
त्या घरात एक संसार 
एक स्वतंत्र जग वसलेले 
कसे आणि कितीपत असतील 
यांचे संबंध 
त्यांच्या भावना त्यांचे व्यवहार 
त्यांचे नातेवाईक त्यांची मित्रमंडळी 
त्यांची स्वप्ने त्यांची मुले 
किती ही सारी गुंतागुंत केवढा हा पसारा
आणि तरीही 
मला जाणवायचे त्यावेळी 
कुणाचाही कुणाला नसलेला स्पर्श 
अच्छेद्य भिंती दुरावलेले मजले
भर सागरात असलेली  ती असंख्य बेटं
अचानक हेही जाणवू लागायचे की 
त्या प्रत्येक घरात मीच आहे 
त्या सुखदुःखांच्या सांगाती 
नाव वेगळे असेल देह वेगळा असेल 
संबंध वेगळे असतील 
पण मी तो तोच आहे.
घर लपेटून बसलेले अस्तित्व .
मग ती सारी अस्तित्व जोडून मला
मी पूर्ण शहर व्हायचो.
*********
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 


शनिवार, ५ सप्टेंबर, २०२०

गुरूदेव दारी

गुरूदेव दारी
*********

गुरूदेव दारी 
याचक जन्माचा
पाहतोय वाट
रिक्त मी हाताचा ॥
तुडविल्या वाटा 
धरीले मी पाय 
नच सार्थ झाला
कुठला उपाय ॥
ओघळती मोती 
लक्ष आषाढात 
थेंब का पडेना 
चातक मुखात ॥
आहे काय जन्म
बेवारस माझा
कुण्या गल्लीतल्या 
लोचट हातांचा ॥
अहा चाले कुठे 
अमुप साधन 
कृपापात्र भक्त
शिष्य भाग्यवान  ॥
सारे असे काय
अवघे हे खोटे 
आत्म संमोहनी 
मना सुख वाटे ॥
गुरूदेव दत्ता 
धरीले मी पाय 
सारा खटाटोप
व्यर्थ होता काय ॥
विक्रांत वळतो
पुन्हा भोगयागी 
साली होती काय 
कुतरी जिंदगी॥

डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com 




शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०२०

उजेड अंधार

उजेड अंधार
**********
उजेडाची वाट
पाहे का अंधार 
अस्तित्वा आधार
सापेक्ष जो ॥१॥

शोधतो उजेड 
काय अंधाराला 
अर्थ कळायला 
प्रकाशाचा ॥२॥

उजेड अभाव 
असे का अंधार 
अथवा अंधार 
स्वयंपूर्ण ॥३॥

म्हणे असतात 
अंधाराचे लोट 
दाट घनदाट 
विश्वव्यापी ॥४॥

कृष्णमेघ काही 
कृष्ण विवरही
अनंत प्रवाही 
महाकाळी ॥५॥

चक्षू पिंजऱ्यात 
विक्रांत जगणे
असे का जाणणे 
पार काही ॥६॥

*****
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https:// kavitesathikavita.blogspot.com 

गुरुवार, ३ सप्टेंबर, २०२०

दत्त रवि


दत्त रवि
*******
सदा उजेडाची 
देत असे साथ 
माझा दत्तनाथ 
रविराज ॥
तयाला ठाऊक 
नसेची अंधार 
कृपेचा अपार 
तेजोराशी ॥
अविद्या काजळी 
अघोर करणी
तयाला पाहुनी 
दुर पळे ॥
सरती संकटे 
अवघी अरिष्टे 
तयात रे खोटे 
काही नाही ॥
सदा राही परी 
भक्तीने सादर 
उगाची व्यापार 
करू नको ॥
शुद्ध व्यवहार 
निर्मळ आचार 
घाल कानावर 
अपराध ॥
देईल तो बळ
मग चालण्यास 
उजळे बोधास
अंतरीच्या ॥
संताचे वचन 
विक्रांता ठसले 
दत्ताला धरिले 
हृदयात ॥

°°°°°°°°°°°°°
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com

बुधवार, २ सप्टेंबर, २०२०

औदुंबर

औदुंबर
******
दत्ता तुझा कृपा
वृक्ष औदुंबर 
सुख मजवर 
बरसतो ॥
निवविते काया 
छाया थंडगार 
भक्तीचा मोहर 
मनी दाटे ॥
दूरवर जाती 
सारी पापताप 
आनंद अमुप 
उरी भरे ॥
एक एक फळ 
जणू विश्व भास 
जगण्यात वास
शिकवते ॥
फुलाविन फळ
फळातील फुल 
विश्वकोडे मुळ
दाखवते ॥
वृक्षातळी आला
कृपेने भिजला
विक्रांत  सुटला
देठातून॥
 © डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 

रिक्तत्ता

रिक्तत्ता ******* क्षणा क्षणाने कळल्या वाचूनी आयुष्य येते ऋतू घेवूनी  हसवून रडवून चोरपावलांनी रंग खेळूनी जाते उलटुनी  काय कमावल...