शुक्रवार, ८ मे, २०२०

गुरुदेव थोर






गुरुदेव थोर 
ज्ञानी प्रकाशले 
कुणाला भेटले
भाग्य वसे 

ज्ञानाची ओंजळ 
भरून अमृत 
स्वहाते पाजत
प्रेमभरे 

परी भाग्य हिन
घेईना का घोट 
उघडून तोंड
आदराने 

बस रे ध्यानात 
अथवा नामात 
उलट स्वतः त
उतरत 

तुझे ते पचन 
करणे तुजला 
ज्ञान मुरायला 
लागे बरे

विक्रांते ऐकले 
मनात ठसले 
कल्याण जाहले 
जन्माचे या  

 
©डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

**

बुधवार, ६ मे, २०२०

नाथ जोगी



नाथ जोगी
********

डंका वाजतो वाजतो 
नाथ जोगी मिरवतो 
ओस पडल्या मनात 
ध्वनी अलख गाजतो ॥

धुनी जळते जळते 
पाप दोष हरविते 
नाथ ओंकार साकार 
विश्वभान हरविते ॥

शब्द शाबरी विद्येचे 
वेद मूर्तिमंत झाले 
जड जीवास तारण्या 
जनी कृपे मिसळले ॥

नाथ विरक्त उदास 
आत्मरति सदा मग्न
भक्ती शोधते जयाला 
ऐसे पृथ्वीमोल रत्न ॥

सदा डोळ्यात विक्रांत 
स्वप्न नाथांचे पाहतो 
दत्त स्नेहाचे चांदणे 
मनो मनी पांघरतो ॥

प्रेम करता पिलांस
माय मनी सुखावते 
प्रेम जाणूनिया खरे
माय कृपावंत होते 

नाथ दत्त अैसे मज 
दोन्ही भेटले कृपाळू 
झाले जिवलग किती
प्राण तयास ओवाळू

दृढ ठेवा मज इथे 
आणि काही न मागणे 
बाकी घडो काही मग
देहा येणे आणि जाणे


*©डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


मंगळवार, ५ मे, २०२०

दत्तभास



 दत्त भास
****::

माझिया घरात
काय करतोस
इकडे तिकडे
का रे फिरतोस ॥
माझिया दारात
का रे थांबतोस
कुणाचा कशाला
पहारा देतोस ॥
ऐसे तुझे भास
भास नव्हे खास
करूनिया घेसी
कृपाळू का त्रास ॥
नको बाबा ऐसा
उगा कष्ट झेलु
सांभाळशी दत्ता
मज आले कळू ॥
तुझिया पदाची
झालो असे धूळ
यानेच माझे हे
जगणे सफळ ॥
तुझी सेवा घडो
तुझे प्रेम जडो
तव प्रेम मनी
सदोदित वाढो॥
चित्तात वावर
साधनी सावर
विक्रांता भक्तीचा
फक्त देई वर ॥

©@डॉ.विक्रांतप्रभाकरतिकोणे https://kavitesathikavita.bloggspot.com
***

सोमवार, ४ मे, २०२०

देव देश अन धर्मासाठी


देव देश अन धर्मासाठी 
**********
जन्म देवासाठी 
जावो हा सगळा 
भावभक्ती मळा 
फुलो सदा ॥

देह देशासाठी 
जावो हा सगळा 
संसार वेगळा 
उरो नये ॥

कर्म धर्मासाठी 
घडो हे कृपाळा 
स्वतेजे आगळा 
उभा राहो॥

ज्ञानदेवी चित्त
सदा राहो साचे
वाणी हे दत्ताचे
गीत गावो

अवघी ही कर्तव्ये 
घडावेत साफ 
भ्रष्ट कधी पाप 
भेटो नये 

दुष्टांची संगत 
पाप्यांची पंगत 
पापी मिळकत 
मिळो नये 

देव देश धर्म 
पवित्रेक कर्म 
विक्रांतास मर्म
कळो यावे..
***
डॉक्टर विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com 
****

रविवार, ३ मे, २०२०

दरवळ


दरवळ
*****

तो दरवळ 
चंदनाचा 
तो दरवळ 
चाफ्याचा
अनाकलनीय 
वासाचा . .

कुठल्याही 
फुला वाचून 
कुठल्याही 
कुपी वाचून 
आलेला 
उलगडून। . .

म्हटले तर 
मीच सुगंध 
म्हटले तर 
मीच आनंद 
माझ्या मनी 
दाटलेला 
होतो मीच 
एक धुंद. .

हेही सुख 
तुझेच होते 
तेही सुख 
तुझेच होते
म्हटले तर 
सुख होते 
म्हटले तर 
सांत्वन होते 
म्हटले तर 
हुलकावणीच 
एक हळूच 
देणे होते 
रडणाऱया 
बाळाहाती
एक खेळणे 
देणे होते 

रडे थांबले 
थांबला दरवळ 
आहेस तू 
आहेस जवळ 
एवढे मात्र 
होते कळत  
थांबली ठसठस  
थांबली कळ.
.
हे जीवलगा
स्थूलातून सुक्ष्मात
सुक्ष्मातून मनात 
अन मनातून 
होत मनातीत 
ने मला 
तुझिया सवेत  
एक दरवळ 
तुझा करत.

डॉक्टर विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com

शनिवार, २ मे, २०२०

गोरक्षाची वाणी






गोरक्षाची वाणी 
वसो माझे मनी 
कृपेची कहाणी 
जन्मा यावी 

हसता खेळता 
करो यावे ध्यान 
अवघे जीवन 
दत्त व्हावे 

गुरु भक्ती दिप
जळावा अंतरी 
अविद्या अंधारी 
मार्ग मिळो

सारी धडपड 
सारी खटपट 
देवाशी लगट
होण्या व्हावी 

ज्ञानाचा प्रकाश 
पडावा जीवनी 
चित्त निरंजनी 
लीन व्हावे 

आणि काय सांग
मागावे तुजला 
मायबाप तुला 
सारे ठावे

म्हणून विक्रांत 
होतो आता उगा 
असो नाथ जागा 
हृदयात..
*©डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

शुक्रवार, १ मे, २०२०

चालविले देवे




चालविले देवे 
*********


भक्तीचीया वाटे 
चालविले देवे 
धरुनिया सवे 
हाताला या 

चौकातले श्वान
जरी होते मन 
ठेविले बांधून 
बोध बळे  

कृपेचा पाऊस 
कधी दिले ऊन
केली दाणादाण 
तर कधी 

मान-अपमान 
केले ठरवून 
ठेवण्या बांधून 
दृढ पदी 

मध्यमवर्गाचे 
धोपट जीवन 
नच ओढाताण 
केली कधी

चुकली ना वाट 
सुटले ना सूत्र 
जगात विचित्र 
चालतांना

विक्रांत कृतज्ञ 
कृपेने दाटून 
घाली लोटांगण 
दत्ता पदी

**

©डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

अटळ

अटळ **** गिरनारी मूर्ती फुटली गोरक्षाची  ती कृती भ्याड नामर्द रात्रीची  अफगाणी मूर्ती फुटली गौतमाची  ती कृती उद्दाम  द्वाड दिवसा...