सोमवार, २० एप्रिल, २०२०

साधू वध

साधू वध
*****

भगव्यातील भोंदूलाही
देव मानणारा
हा हिंदू समाज
जेव्हा पाहतो
तुम्ही क्रुरतेने
हिंसेने मारलेले
रक्तामध्ये लडबडलेले
त्या असाहाय्य निष्पाप अन
त्या वृद्ध साधूंचे शव .
तेव्हा होते आक्रंदण
श्रद्धेचे भावनेचे
आदराच्या उल्लंघनाने झालेलं
लक्षात ठेवा
तेव्हा तुम्ही टाकलेली असते
काडी तेलाचा विहिरीत
मारलेली असते
उडी सिंहाच्या गुहेत

एका लाथेने नहुषाच्या . .
अगस्तीस मारलेल्या. .
तो मदांध झाल्यावर .
पडावे लागले होते त्यास
होवून साप भूलोकावर
कित्येक वर्ष सरपटत
भोगावे लागले होते
त्याचे प्रायचित्त .
आणि हा तर वधआहे
निर्घृणपणे केलेला
त्याची शिक्षा तर
मिळायला हवी
नव्हे ती मिळणारच .
कारण आता उमटणार आहेत
शाप
लाखो अगस्तीचे
एकाच वेळी .
त्यात तुम्ही जळून
भस्मसात होणार
यात मुळीच शंका नाही .

डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

शनिवार, १८ एप्रिल, २०२०

मन बहाव्याचे झाले



मन बहाव्याचे झाले
************
येता ओघळून चैत्र
मन बहाव्याचे झाले
दत्त स्फुरण जणू की
कणोकणी ओसंडले ॥
गर्द पिवळा झळाळ
धुंद हळदी खळाळ
दत्त झाला जणू वृक्ष
गळा वैजयंती माळ ॥
अशी किमया सोनेरी
पाहू हरखून किती
चित्त चाकाटले दत्ता
किती देखणी ही सृष्टी ॥
कधी होईल मी ऐसा
तुझ्या प्रेमात रंगला
रंग हिरवा हरला
पित तदाकार झाला ॥
उभा तरूतळी मौन
मनी धुंद मोहरला
वदे विक्रांत वृक्षाला
मी तो तूच तो रे झाला ॥
*********
डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogsport.com

बुधवार, १५ एप्रिल, २०२०

मज कंटाळला

मज कंटाळला.
*********
का हो दत्तात्रेया
मज कंटाळला
शब्दांचा आटला
प्रवाहो हा ॥
तुझं भ जावया
अन्य न साधन
जाता हरवून
काय करू ॥
शब्दांमध्ये तू ची
शब्द तेही तू ची
ओंजळ जलाची
जलाशयी  ॥
खेळतो शब्दात  
तुझिया रंगात  
ठेवुनी चित्तात  
मुर्त तुझी  ॥
गौण हे साधन  
गौण आराधन  
विक्रांता कारण  
असू द्या हो.॥
********
डॉक्टर विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com 

मंगळवार, १४ एप्रिल, २०२०

निळा निळाल



निळा निळाल
*********=
हा निळा निळाल
मिरवितो भाळ
तरी का अंतरी
पेटलेला जाळ ॥
मनी या अजुनी
दया क्षमा नाही
का न वाहते रे
करुणा प्रवाही ॥
तीच आहे वस्ती
तशाच त्या व्यक्ती
नाव फक्त थोर  
तुझे मिरवीती ॥
दिलास जो धर्म
तयाच्या त्या मूर्ती
स्तवे तुजसवे
परि तीच रिती ॥
फुटू दे रे घट
द्वेष भरलेले
सुटू दे रे पान्हे
क्षमा ओसंडले ॥
लोट वाहू दे रे
मैत्री करुणेचे
फुटू दे रे तट
उच्च-नीचतेचे ॥
कळो माणसास
सत्व माणसाचे
मनी भरु दे रे
रंग आभाळाचे ॥
डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com 

पर्याय



पर्याय
*****
कुणीही कुणाच्या
सुखी जीवनाचा
पर्याय नसतो .
जरी सुखी जीवन या
भ्रामक शब्दाला
सापडत नाही
पर्याय कधीही
तशीतर पर्यायाची यादी
खूपच मोठी असते
अन ती क्वचितच
कुणाच्या हाती येते
अर्थात एका पर्यायानंतर
दुसरा पर्याय
असतोच समोर
उभा सदैव
दत्त म्हणून !
असे पर्याय
शोधून शोधून
सोडून
निरुपाय झाल्यावर
जो समोर उभा राहतो
दत्त म्हणून !!
तो पर्याय
पर्यायातील असतो
हेच कदाचित
पर्याय शोधण्याचे
निवडण्याचे
सोडण्याचे
व पर्यायाच्या उत्पत्तीचे
कारण असावे.
***
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.in/

सोमवार, १३ एप्रिल, २०२०

सापडले डोळे



सापडले डोळे
*******

हरवले डोळे
सापडले डोळे
पुन्हा काळजात
दाटले उमाळे ॥
घनदाट डोह
गर्द कृष्ण काळे
प्रकाश तेजस्वी
त्यावरी झळाळे ॥
कोण तू कुठला
मजला नकळे
पाहता तुज का
गात्रात शहारे ॥
लपविले ओठ
भाल लपविले
भाव ओळखीचे
परी न दडले ॥
क्षणात विश्वाचे
सुजन या झाले
क्षण पाहण्यात
नवी मी हि झाले ॥
******::
डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

रविवार, ५ एप्रिल, २०२०

नव श्रीमंत


नवश्रीमंत
******

उडवितो गाड्या
कशाला रे गड्या
बापाच्या पैश्याने
मारतोस उड्या ॥
कानी भिकबाळी
गळ्यात साखळ्या
विकुनी जमिनी
कशाला बांधल्या ॥
माज दो दिसांचा
तुझा उतरेल
फुका मिरविली
संपत्ती सरेल ॥ 
कु-र्यात  बोलणं
बाटलीत  जीणं
मटन चिकन
सर्रास झोडणं  ॥
शिक्षणाचा गंध
अजूनही नाही
पुढच्या पिढीची
चिंता तीही नाही ॥
दारुड्या बापाचा
पोर तो तू गुंड
बिघडली पोर
तुझी ती ही बंड ॥
धन देणाऱ्याची
भरली तिजोरी
तुझी दो वर्षात
सरेल रे सारी ॥
वापर रे पैसा
पोरांना शिकाया
धंद्याला लावी वा
नच कि फुकाया ॥
विक्रांते गरिबी
तुझी ती पाहिली
म्हणूनी चिंता ही
मनी उपजली ॥
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot in

रूप ज्ञानदेव

रूप ज्ञानदेव  ********* रूप ज्ञानदेव घेऊनिया आले  आळंदी बैसले पांडुरंग ॥ देवभक्त रूपे करतो सोहळा  द्वैताचा आगळा प्रेममय  देव स्व...