रविवार, ५ एप्रिल, २०२०

कृपेची बाहुली



कृपेची बाहुली
******

कृपेची बाहुली
मज मीच केले
जगी मिरविले
तुझ्या नावे ॥
लावियला टिळा
कोरुनी सुरेख
धवल हा वेष
चढविला ॥
वदे दत्त दत्त
जगा पडे धाक
श्रद्धेचा पाइक
धन्य झालो ॥
परी मुखवटा
गळतो हा खोटा
पाहू जाता लाटा
मनातील ॥
अजुनही इथे
मनाची च सत्ता
नामधारी दत्ता
दिसे तू रे ॥
देहबुद्धीचा या
करण्या पाडाव
दिसेना उपाव
अजुनिया ॥
कृपाळा तुजला
शरण शरण
उपाय अन्य न
दिसे मज ॥
ढोंग्याचे हे ढोंग
होवो आता खरे
विक्रांता या त्वरे
तेची करा.॥
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.in

शनिवार, ४ एप्रिल, २०२०

गुरू उपनिदिष्ट साधन



गुरू उपनिदिष्ट साधन

**********

करी नित्य नेम

गुरु ठेव ध्यानी

आणिक साधनी

वाहु नको ॥

गुरुचे साधन

हेच गुरुदेव

आणि भेदभाव

मानू नको ॥

पेटविला दीप

ठेव सांभाळून

साधना घालून

तेल तया ॥

श्री गुरु म्हणजे

असे गुरुतत्व

दृढ भरी भाव

तया ठाई ॥

सोड  धावाधाव

धर एक ठाव

तुजला उपाव

दाविन तो ॥

विक्रांता कळले

मनी उतरले

ते चि सांगितले

जगतास ॥


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

https://kavitesathikavita.blogspot.in

गुरुवार, २ एप्रिल, २०२०

माझा राम



माझा राम
********

माझा राम
मला भेटतो कधी
रूग्णांच्या डोळ्यात
माझी वाट पाहत
बसलेला
असतो तो
तासन्तास रांगेत
उभा थकलेला .
दोन गोड शब्दासाठी
सदैव आसुसलेला
कफ सिरप मागताना
उगाचच ओशाळलेला

माझा राम
मला भेटतो कधी
नर्मदेच्या काठावरती
रुक्ष कठोर डोळ्यातला
अभिमानी गांजलेला .
दारिद्रयातील जगण्याला
सहजच सरावलेला

माझा राम
मला भेटतो कधी
माझ्या दारावरती
भिक्षेसाठी थांबलेला
आशीर्वादाची झोळी घेऊन
याचक झालेला

माझा राम
शब्दात थांबायला
नाही सांगत मला
माझा राम
मंदिरात जायला
नाही सांगत  मला

माझ्या रामाला
पारायण कथा संकीर्तन
घंटानाद करणं
नाही पसंत एवढं

माझा राम असतो
सदैव खुश
संगत नसलेला
एकांतात
मध्यरात्री
पंख्याच्या आवाजात
कवितेत उतरत

वा रस्त्यावर पडणार्‍या
आषाढ सरीतील नर्तनात
 माझ्यासवे गात

झाडातला राम
माणसातला राम
वार्‍यातला राम
पावसातला राम
असतो सदैव सांगत
पाहायला  मला
माझ्यातला
राम !

 डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोने
https://kavitesathikavita.blogspot.in

मंगळवार, ३१ मार्च, २०२०

यती



यती
****
पाठमोरा यती
चढतो पर्वत
करुनी शेवट

मायेचा तो ||
कुणी म्हणो त्याला
पळपुटा खुळा
कुणी वाया गेला
अरेरे हा ||
श्रेय प्रेय तया
येताच सामोरी
जन्माच्या संस्कारी
श्रेय घेई ||
इवलासा देह
जन्म हा क्षणिक
गेले किती एक
व्यर्थ इथे ,||
जन्म मरणाचा
खेळ विलक्षण
विवेके पाहून
स्थिरावला ||
अवघ्या चक्राचा
करुनिया भेद
होय संसवेद्य
दृढ व्रती ||
आहाहा विक्रांत
करी त्याचा हेवा
मज कधी देवा
ऐसा करी ||
*******
डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोने
https://kavitesathikavita.blogspot.in

रविवार, २९ मार्च, २०२०

दत्त सांभाळीन



दत्त सांभाळीन
************

दत्त सांभाळीन आम्हा
व्यर्थ चिंता नको मना ॥

जन्म दत्ता वाहीयला
मग काळजी कशाला ॥

देह प्रारब्ध खेळणे
होवो तयास जे होणे ॥

जर असेल भोगणे
भक्तीमार्गात चालणे ॥

तुवा घडेल जगणे
करू नकोस मागणे ॥

यदाकदाचित जरी
मृत्यु तुजला तो वरी ॥

दत्त योजना मानुनी
घेई ते हे स्वीकारूनी ॥

दत्ता वाहून जगणे
फक्त कर्तव्य करणे ॥

मनी निशंक रहाणे
हेच भक्ती तपासणे ॥

विक्रांत सादर दत्ता
मर्जी मान्य भगवंता ॥

येई जीवन होऊनी
वा ये मरण घेऊनी ॥

***
डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोने
https://kavitesathikavita.blogspot.com

शुक्रवार, २७ मार्च, २०२०

गुरू कृपा



गुरुकृपा
******
गुरू तुम्हा पायी
सदा राहो चित्त
होऊन निश्चिंत
सर्व काळ ॥

येता रिता क्षण
याहो या धावून
टाका हो भरून
पूर्ण त्याला ॥

गुंतता कामात
वसा ह्रदयांत
दाखवत वाट
नीटपणे

अन् विसरता
करा आठवण
प्रेमळा येऊन
तुम्हीच ते ॥

मग हा विक्रांत
सुखसागरात
करीन व्यतित
जीवन हे॥

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.in

गुरुवार, २६ मार्च, २०२०

स्वामीच गुराखी






स्वामी च गुराखी 
*************

घेतल्या वाचून
देसी  दोन्ही हाती
चालविसी वृती
स्वामी राया

कुठल्या जन्माचे
असावे हे फळ
स्वामी देई बळ
जगण्यास

फार काही मज
घडली न  सेवा
संकटात धावा
फक्त केला

भजन पुजन
किर्तन नर्तन
घडले  कधी न
यज्ञ याग

एक स्वामी भक्त
दिधलास दोस्त
रुजविले आत
प्रिती बीज

घडविली यात्रा
कधी प्रेम बळे
धरुनिया नेले
तुच सवे

स्वामीच गुराखी 
माझा तो असून
रक्षितो दुरून
मज सदा

एवढे विक्रांता
आले ते कळून
म्हणुनिया लीन
पायी सदा
********
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

रूप ज्ञानदेव

रूप ज्ञानदेव  ********* रूप ज्ञानदेव घेऊनिया आले  आळंदी बैसले पांडुरंग ॥ देवभक्त रूपे करतो सोहळा  द्वैताचा आगळा प्रेममय  देव स्व...