मंगळवार, २४ मार्च, २०२०

विक्राळा


विक्राळा
*****
मरण पाहिली
दुनिया थांबली
घरात बसली
आळीमिळी ॥

हि तोंडावरती
फडके बांधली
अवघी थिजली
भय प्याली  ॥

दुनिया धावते
औषध नसली
पशु पचवली
कोटी-कोटी ॥

जशी की करणी
तशीच भरणी
म्हणतेय वाणी
निसर्गाची ॥

सुपामधील ते
सुखात बसले
जातेच पाहिले
नाही ज्यांनी ॥

मरण चाटते
आहेच जिभल्या
जै वाटा तुटल्या
कड्यातल्या ॥

तयात विक्रांत
नसेच वेगळा
बघ विक्राळा
मर्जी तुझी॥

डॉक्टर विक्रांत प्रभाकर तिकोणे http://kavitesathikavita.blogspot.com

सोमवार, २३ मार्च, २०२०

तुझे डोळे



तुझे डोळे
*****
तुझे डोळे चांदण्यांचे
बावरल्या हरीणीचे
दूर कुठे अडकल्या
गायीच्या गं दावणीचे
.
तुझे डोळे नवाईचे
घनदाट काजळाचे
कासावीस करणाऱ्या
घनगर्द आठवांचे
.
तुझे डोळे आरशाचे
लख लख प्रतिमेचे
जडावला जीव प्राण
सांगणाऱ्या भावनेचे
.
तुझ्या डोळी हरवावे
माझे गाणे वेडे व्हावे
जीवनाने जीवनाला
पुन्हा सामावून घ्यावे
.
मिटुनिया पापणीला
जागे मज करू नको
आकाशाच्या अंकुराला
उगा उगा खुडू नको
.
निजलेल्या आकांक्षांना
अपेक्षांचे गुज काही
सांगुनिया डोळ्यातून
नको करू छळ बाई
०००००००
.डॉक्टर विक्रांत प्रभाकर तिकोणे
http ://kavitesathikavita.blogspot.com

रविवार, २२ मार्च, २०२०

दत्त तारीतो


।। दत्त तारीतो ।।
**********
दत्त वारीतो दु:खाला
दत्त आणितो सुखाला
दत्त अंतरी भरला
सदा तारीतो मजला ||
.
दत्त आवरे मनाला
दत्त सावरे तनाला
रोगराईच्या संकटी
नाम देई रे दव्याला ||

करी शितल प्रारब्ध
भोग आलेले देहाला
करी कवच भोवती
दूर सारतो काळाला ||
.
दत्त सगुण-निर्गुण
माझ्या देही विसावला
दत्त आभाळ भवती
जग तयाचा झोपाळा ||
.
दत्त वागवितो देह
दत्त चालवितो जग
मला कसली फिकीर
दत्त करूणेचा मेघ ||

बाप दत्तात्रेय माझा
रुपी समर्थ नटला
मज बोलावून आत
दारी रक्षक ठेवला ||
.
डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोने
https://kavitesathikavita.blogspot.in

शनिवार, २१ मार्च, २०२०

तोच तो ब्राह्मण


तोच तो ब्राह्मण
************

ब्रह्म जाणतो जो
तोच तो ब्राह्मण
बाकी तुम्ही आम्ही
सारे ते समान ॥

आम्हाला बुद्ध ही
गमतो ब्राह्मण
आम्हाला तैसाची
महाविर जैन ॥

चोखा तुका नाम्या
अवघे ब्राह्मण
स्वरूपी राहिले
स्वरूप होऊन ॥

तयाच्या हातात
ब्रम्ह दीप्तीमान
तयाच्या प्रकाशी
चालतात जन ॥

पाप  योनीची ती
जुनाट कल्पना
म्हणो कुणी किती
न पटते मना

जन्माने नसते
कुणीच महान
वैश्य कृषी क्षत्रि
पोटाची साधन

नवनाथे स्पष्ट
सांगितली खूण
तेच ते मानतो
विक्रांत म्हणून 

**
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.in

शुक्रवार, २० मार्च, २०२०

साधू बाबा


साधू बाबा
*******

डोईवर फेटा
भालावर टिळा
तुळशीची माळा
गळ्यामध्ये ||
डोळीयात भाव
पवित्र भक्तीचे
जल चंद्रभागेचे
नितळसे ||
भागवत वसा
देही मिरवला
जन्म वाहियला
देवा काजी ||
मधुर भाषण
पवित्र वचन
सदा समाधान
अंतर्बाह्य ||
प्रिय लेकीबाळी
हरिरूप सारी
असून संसारी
विरक्त तो ||
गुरू पद जरी
आलेले चालत
परि न तयात
मोठेपण ||
भक्त तो रे कैसा
चालतो बोलतो
संत नि शोभतो
जगतात ||
ऐसे साधू नाम
विठ्ठल ते सार्थ
धन्य जगतात
केले तुम्ही ||
विक्रांत श्रद्धेने
नमितो तुम्हाला
ऐकुनी कीर्तीला
धवल त्या ||
डॉक्टर विक्रांत प्रभाकर तिकोने
http://kavitesathikavita.blogspot.com

बुधवार, १८ मार्च, २०२०

श्री कानिफनाथ



श्री कानिफनाथ
***********
माझा कानिफा कानिफा
जन्म कुंजर कुहिरा 
असे मढीला निवास
भक्त रक्षक सोयरा

बाप जालिंदर गुरु
त्याची कीर्ती किती थोरू
लावी क्षणात भक्ताला
जन्म-मरणाच्या पारू

शिष्य अपार मेळावा
लाख-लाख झाले गोळा
त्यांस घेतले ह्रदया
काय वानू त्या कृपाळा

थोर नाथांची ती कथा
बळे जिंके हनुमंता
गुरु मुर्ती प्रकटुनि
रक्षी राजा गोपीचंदा

सखा गोरक्षाचा झाला
नाथपंथ वाढवला
शिष्य भित्री नि अस्थिर
प्रेमे धडा शिकविला

नाथ जागृत मढीला
उर्जा पर्वत जाहला
दीन गांजल्या जनाला
असे आधार जिव्हाळा

 **
डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे

http://kavitesathikavita.blogspot.in

मंगळवार, १७ मार्च, २०२०

तव पदी येता






तव पदी येता 
**********
तव पदी येता 
चित्त अवधुता 
जन्माची वार्ता 
हरवली 

उधळला धूप
वृतीचा अनंत 
गेला आसमंत 
व्यापून या 

पेटुनिया ज्योत 
सोनेरी पिवळी 
प्रभेनी सजली 
काया माझी 

देहाच्या देवळी 
देवाची दिवाळी 
प्रकाश कोवळी 
विद्युल्लता 

शोधाचिया वाटा 
आटल्या मिटल्या 
डोळ्यांच्या बाहुल्या 
सप्तलोकी 

विक्रांत जडाचे
गूढ कवतुक 
मिटली रे भूक 
नक्षत्रांची

 **
डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे

http://kavitesathikavita.blogspot.in

रूप ज्ञानदेव

रूप ज्ञानदेव  ********* रूप ज्ञानदेव घेऊनिया आले  आळंदी बैसले पांडुरंग ॥ देवभक्त रूपे करतो सोहळा  द्वैताचा आगळा प्रेममय  देव स्व...