गुरुवार, १२ मार्च, २०२०

कृपेची कहाणी


******
श्री स्वामी समर्थ
आले माझ्या मनी
कृपेची कहाणी
लिहायला

दिला एक धक्का
पुन्हा सावरले
आणिक हसले
मोठ्यांनी ते

करून कौतुक
घेतले जवळ
निमित्त केवळ
भयाची ती

मन धावणारे '
आले भानावर
जडे पायावर
मग तया

केवळ माउली
कृपेची साउली
भेटली भेटली
विक्रांत या


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
**

बुधवार, ११ मार्च, २०२०

आता तरी घडो






आता तरी घडो

**********





तीच ती अक्षरे

जीवनाची पाने

अवघे लिहिणे

ठरलेले



कशाला लिहिली

तू ही व्यर्थ कथा 

जया नाही दत्ता

नाव तुझे



बस झाले देवा

पुरे कर आता 

मिरविणे घटा

अस्तित्वाच्या 
 

आतातरी घडो

तुझे येणे काही

घेवुनिया जाई

मज सवे
 

विक्रांता नावडे

जीवनी वाहणे

निरर्थ जगणे 
तुज विना




************

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
 
http://kavitesathikavita.blogspot.in

मंगळवार, १० मार्च, २०२०

दत्ता येरे खेळायला



 दत्ता येरे खेळायला


 **
दत्ता येरे खेळायला 
माझ्या सवे पळायला 

तुज  मारीन मी हाका 
तुझा लपण्याचा हेका 

सदा घेईन मी डाव
तुझी पुरविणा माव 

सदा लंगडी घालीन
तुझा रिंगणी फिरेन

नको येऊन तू हाताला 
परि रहा रे दृष्टीला 

मार पाठीवर गुद्दे 
कर प्रेमी गुदगुदे 

तुझ्या चिंतनात राहो
तुला सदोदित पाहो

असा मांडे रे तू खेळ 
मागे विक्रांत केवळ


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
 http://kavitesathikavita.blogspot.in

सोमवार, ९ मार्च, २०२०

माझा मिटवा हिशोब





माझा मिटवा हिशोब 

……………………

हे माझे भगवे स्वप्न  
कधी पुरवशी दत्ता  
कधी घेशील जवळी 
माझ्या उचलून चित्ता

मी तो मलिन अवघा
पाच गावात पडला 
मी तो दरिद्री भलता  
दहा चोरांनी लुटला

माया ममता ठगुनि 
बघ  बांधून ठेवला 
चार दयाळू सावानी 
इथपर्यंत आणला

आता उचल कृपाळा 
कर काषाय मजला 
दंड कमंडलू भार
कर संसार उरला

करी ध्यानाचाच धनी 
रहा नाम रुपे मनी 
कोष वितळो जन्मांचे 
तुज पाहू दे डोळ्यांनी 

ऐसे मागणे विक्रांत 
तुज मागतोय दत्ता 
माझा मिटवा हिशोब 
टाका फाडूनिया खता.
***::::
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
http://kavitesathikavita.blogspot.in

रविवार, ८ मार्च, २०२०

बाप सांभाळतो




बाप सांभाळतो 
***********
बाप सांभाळतो 
पाठीशी राहतो 
मोकळे सोडतो 
लक्ष देतो 

बाप कनवाळू 
देही भरे बळ 
दावतो आभाळ
उडायाचे 

बाप जगण्यात 
करतो पोषण 
तन आणि मन 
हाती घेत 

बाप सामोर ते
सदा उदाहरण 
जगण्या जीवन 
साऱ्यांसाठी 

बाप देवराय 
संपूर्ण  सगुण  
तयाचे चरण 
तीर्थ मज
***
-

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
 
http://kavitesathikavita.blogspot.in

भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...