शनिवार, ७ मार्च, २०२०

दत्त आकाश




दत्त आकाश 

*********
दत्त आकाश कोवळे 
ओल्या पहाटे फुटले 
माझे मन डवरून 
दव चिंब ओले झाले

दत्त प्रकाश किरण 
आला मेघुटा मधून 
कांती उजळ सुवर्ण 
रोमरोम शहारून

दत्त फुलला मोगरा 
गंध आकाश भरला 
झालो पाकळी पाकळी 
रंग कर्पुरी भाळला 

दत्त पहाटेचा वारा 
सुख अविट शहारा 
आला घेऊन चंदन 
व्यापे मनाचा गाभारा

दत्त गवत ओलेते 
ध्वजा भगवी डोईते
चाले किर्तन रानात 
मन झिंगते रंगते 

दत्त विक्रांत सोइरा 
जीवी जीव या भरला 
पंच प्राणाच्या प्रकाशी
डोळा भरून पाहीला
+++
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
 http://kavitesathikavita.blogspot.in

शुक्रवार, ६ मार्च, २०२०

दावी रस्ता







दावी रस्ता
***********
सरलेल्या आयुष्याचा
सल मनी टोचतो रे
काय मी जगलो नि
कसा आहे जगतो  रे

भिकारीच वृती सदा
देवा तुझ्या दरबारी
नवसाचे डोंगरच
ठेवले रे तुझ्या दारी

सांगतच होते संत
उभा कल्प वृक्षातळी
समजून उमजून
केल्या त्याच चुका तरी

तसा देवा दयाळू तू
नाही म्हटलाच नाही
सारे बाल हट्ट माझे
पुरे केले लवलाही

आता तरी संपू दे रे  
मागण्या या माझ्या व्यर्थ
वठल्या भक्तीस  दे रे
नव्या जाणिवेचा अर्थ

तुझ्या हाती सारे दत्ता
देई दृष्टी दावी रस्ता
आण पुन्हा भानावरी
हरवल्या या विक्रांता  
------------------------
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
 http://kavitesathikavita.blogspot.in



गुरुवार, ५ मार्च, २०२०

पाचोळयाची खेळी




 वर्तुळ
 ******
झन झन झन
करे कणकण
तरीही अंतरी
व्याकूळ स्पंदन॥

जावू पाहे तन
धुपा्रती होऊन
झरते जीवन
अन डोळ्यातून ॥

कशाला श्वासाचे
अडती बंधारे
प्राण जाऊ पाहे
कुठल्या त्या द्वारे ॥

येते जागेवरी
वर्तुळ फिरून
अन केंद्रबिंदू
त्रिज्येला  धरून ॥

जातच आहे रे
पाणी नदीतून
कसे कळावे ते
गेलेले वाहून ॥

विक्रांत वादळी
पाचोळ्याची खेळी
आली काय गेली
कोणाला पडली ॥
डॉक्टर विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.in

बुधवार, ४ मार्च, २०२०

गुरुशिखरी





 


गुरुशिखरी
*******
मी तो दत्ताचा छावा
आलो दत्ताचिया गावा ॥
गिरी चढलो थोरला
उरी भेटलो पावुला ॥
वाट काढत पाण्यात
कधी मुग्ध चांदण्यात ॥
कधी मेघी हरवून
कधी उन्हात तावून ॥
दत्त येत होता सवे
दत्त नेत होता सवे ॥
ध्यास लागलेला मना
बळ कुठले या तना॥
दत्त कृपाळूवा झाला
केले जवळ बाळाला ॥
विक्रांत भरून पावला
धन्य स्पर्शून शिखरा ॥

 


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
 http://kavitesathikavita.blogspot.in

भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...