बुधवार, २२ जानेवारी, २०२०

दत्त कृपाळू


दत्त कृपाळू
***********

दत्त कृपाळू कृपाळू
जणू मूर्तिमंत छळू

दत्त मायाळू मायाळू
लावी ह्रदयासी जाळू 

दत्त आधारू आधारू
देतो धक्काची उतारू 

दत्त वेल्हाळ वेल्हाळ
जणू उरावरी काळ

दत्त सोयरा सोयरा
गळा बांधतसे दोरा 

दत्त विक्रांते सोडला
येत दत्ताने गिळला 

 © डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

मंगळवार, २१ जानेवारी, २०२०

जीवन




जीवन
*****
मृत आक्रोशी जीवलगांच्या काळीज पिंजून जाते 
या जगण्या मरण्याचे नभ वांझ उदास दिसते

का कुणा कळल्यावाचून हा प्रवाह अविरत वाहे 
सुटताच हात हातातून आकांत भरून राहे

त्या तिथेच पलीकडे मुल एक लंगडी खेळे
वेल नाजुक कुणी मधली आधारास्तव झुले

हातात खेळणे कुणाच्या ते खेळ  मग्न आहे
हातात कफन कुणाच्या तन मन भग्न आहे

जगणेच तरीही सारे घटनातून मिरवत आहे
विक्रांत किनाऱ्यावरती सुख दुःख वाहत आहे

 © डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

सोमवार, २० जानेवारी, २०२०

मरणाच्या वाटा




मरणाच्या  वाटा
 ********
मेघ बरसला 
आणि मेला 
सुकून वाफा 
सारा गेला 

जळले अंकुर 
माती मधले 
मिटले टाहो 
पाना भरले

जर्जर डोळे 
कोरडलेले 
पटलावरती 
तडे पडले 

असेच मेलो 
किती कितीदा
जीवित राहिलो 
शाप भोगता

कुठे देव तो
कुठल्या गावी 
का मरणाच्या
वाटा दावी

विक्रांत हा ही 
गाळ पोपडी 
क्षणिक ओली 
मेली कोरडी

 © डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

रविवार, १९ जानेवारी, २०२०

वाहवा




वाहवा
********

काल वाहवा करणारे  
गेले आज निघून आहे
कंटाळले काही कुणाचे       
गेले काम सरून आहे

तरीही मी लिहितो आहे
गातो मनापासून आहे
अटळ प्रवास अवघा हा
चालणे बाकीअजून आहे

खरतर ही स्वप्नदुनिया
मनात या विखरूनआहे
शब्द सोहळे उगा मांडले
बघे जात डोकावून आहे

येतील काही नवे आणिक
नवी वाहवा मिळणार आहे
खोटी नसेल जरी ती ही
किंमत त्यांची जाणून आहे



डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/

शुक्रवार, १७ जानेवारी, २०२०

पणती (एका थकल्या जीवाचे मनोगत )



पणती
**

माझी मिटू दे पणती
बहु कीटकांची दाटी
किती काजळे कोनाडा
मंद क्षीणश्या या वाती॥ १ ॥

वास तेलाचा जुनाट
थर दाटे हिरवट
कोणा गरज तयाची
काडी जातसे फुकट॥ २॥

असे पुराण मातीची
एका लाल दमडीची
चार दिसाच्या काळाची
खुण दिवाळ सणाची॥ ३॥

खूप मिरवली कुठे
आता तया जीव विटे
मारा फुंकर हळूच
जडो अंधाराचे नाते ॥ ४॥

तेल नको उभारीचे
जन्म वाढत्या सुताचे
वेडा विक्रांत उगाच
ओझे वाहतो फुकाचे॥ ५॥

झाली अवघी ती सेवा
बळ सरू आले देवा
तव स्वरुपी दयाळा
मज मिळावा विसावा  ॥ ६॥

 


 © डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

गुरुवार, १६ जानेवारी, २०२०

कृपा




  कसरती कृपा
 ************

सोडूनिया साऱ्या
रुळलेल्या कथा
शोधाचिया वाटा
गेलो जरी ॥ १॥

शोध मरणाचा
शोध जगण्याचा
सुखाचा दुःखाचा
केला बहू ॥ २॥

निसटून पाय 
घसरलो खाली
तेव्हा हाता आली
श्रद्धा वेल ॥ ३॥

ओरडले कुणी
जिवा आला बोल
मैत्रीची ती ओल
दिली कुणी ॥ ४॥

वाटेत भेटले
नमिले तयाला
पुसले पथाला
दाखविण्या ॥ ५॥

त्यांनी दावलेले
मनी धरियले
आटोकाट केले
यत्न सारे ॥ ६॥

घेतला निरोप
परत तयांचा
साद तो कुठचा
ऐकुनिया  ॥ ७॥

शोधण्याची वाट
फिरे उफराटी 
आधाराची काठी 
मोडुनिया

अहा देवराया 
इथेच तू होता 
दिसला न हट्टा 
धुंडायच्या ॥ ९॥

कसरती कृपा
करी दत्तराय
भेटण्या उपाय
पारखून ॥ १० ॥

विक्रांत वाकला 
डोंबारी ही झाला 
क्लेश हरवला 
चित्तातला ॥ १

आता दोरावरी 
नाचतो खेळतो 
मुळी न पडतो 
भासमान ॥ १
.
** © डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

बुधवार, १५ जानेवारी, २०२०

शाळेतील ती (उपक्रमातील कविता)



शाळेतील ती (उपक्रमातील कविता)
**********

नाजूक अधरी
मिरवित लाली
ती जेव्हा आली
शाळेमध्ये ॥

बटा कपाळी
काळ्या कुरळ्या
भुवई स्पर्शल्या
होत्या काही ॥

विशाल नयनी
काजळ ल्याची
जग जिंकली
होती दृष्टी ॥

येता अशी ती
वर्ग थांबला
फळा हासला
कौतुकाने ॥

बसली बेंच तो
होय सिंहासन
नि आम्ही दीपून
दरबारी ॥

झाला वर्ग मग
सगळा नापास
तरीही खास
शाळेमध्ये ॥

म्हटला विक्रांत
झाले शिकणे
जीव  टांगणे
रितेपणी ॥


© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...