शनिवार, १४ डिसेंबर, २०१९

पर्व




पर्व
***

हे ही एक पर्व आहे
तेही एक पर्व होते
मनाचे खेळ मनाने
मांडलेले सर्व होते

निराकारी आकाराचे
लागलेले वेध होते
त्याच त्याच वाटेवर
फिरणारे शोध होते

संवेदना जाणावया
हवे इंद्रिय असते
गंध घ्राणा रूप डोळा
सारे ठरले असते

त्यात सीमेत ओढणे
तुज मज भाग होते
भक्तीच्या पडद्यावरी
चित्र उमटत होते

ठाऊक जरी ते सारे
भ्रम मनाचेच होते
विरघळून त्यात मज
परंतु जायचे होते

अन् फाटला पडदा
थांबले विरघळणे
होते रंग नाद जरी
नव्हते परी दिसणे

अंतिम हे दिसणे वा
पर्व अजून घडणे
ठाव नाही पाहणाऱ्या
का" आहे " उभे   "मी पणे  "

 © डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

शुक्रवार, १३ डिसेंबर, २०१९

गोरक्षनाथ



गोरक्षनाथ
*******

जन्म राखेतून झाला
कधी लिप्त न कशाला
काम क्रोध लोभ मोह
कधी जाती ना वाट्याला

असा गोरक्ष तपस्वी
थोर जाहला जगती
नाथपंथी मिरवला
जणू स्वयं की धूर्जटी

भ्याला गर्भवास ज्याला
नाथपंथाचा तो चेला
गुरू पदाचा अढळ
ध्रुवतारा नभातला

गुरू प्रेमासाठी ज्याने
अक्ष क्षणात तो दिला
केली परीक्षा उत्तीर्ण
नग सोनियाचा केला

नारी राज्यात जाऊन
गुरू मच्छिंद्र आणले
आर्त जनावरी साऱया
थोर उपकार केले

परिसीमा वैराग्याची
असे अवधी तपाची
मुर्त साकार प्रेमाची
तात मात गहिनीची

तो हा गोरक्ष सोयरा
सदा राहो मनामाजी
धूळ विक्रांता किंचित
लागो तयाच्या पायाची




© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

गुरुवार, १२ डिसेंबर, २०१९

मच्छिंद्रनाथ




मच्छिंद्रनाथ

***
श्रीमच्छिंद्रनाथ यती 
जरी पुत्र धीवराचा
म्हणे प्रेमे पंथ अंश
कवी नारायणाचा

थोर कुणीही जन्माने
नसतो इथे कधीही
दाविले स्वतेजे त्यांनी
जिंकूनिया देव मही

जनतेच्या सुखासाठी
तपी अनंत कष्टाला
शाबरी ती मंत्र विद्या
दिली आर्त जगताला

नवे मंत्र नवे तंत्र
उभारला नाथ पंथ
तया दिले देवपण
निर्मियले नवे वेद


जाती पाती मोडूनिया
बहुजना गुरू केले
देवतत्त्व हरवून
यत्न सिद्ध मिरविले

असा थोर बंडखोर
कृपा करी जगावर
मातीतून राखेतून
घडविले अवतार
**

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

बुधवार, ११ डिसेंबर, २०१९

पाहीन मी वाट


 पाहीन मी वाट
*********:

पुनवेचे गाणे दत्ता
ओठातून येत नाही
रुसलेल्या भेटण्याचे
गीत काही होत नाही


मजला हे कळो आले
खुपच मी जन्म दूर
जरी नाही लायकी रे
असे तव पथावर

बरं तर असो तेही
जन्मात या कळलास
अंधारल्या जगतात
दीप हाेत दिसलास

तुझी कृपा होण्याची ती
पाहीन मी वाट बरे
भले बुरे बोल माझे
तोंवरी साहून घे रे

विक्रांताचे शब्द आता
बघ सरू सरू आले
मौन आता वाटचाल
दिन मोहराचे गेले


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
***

मंगळवार, १० डिसेंबर, २०१९

नको ताटकळू



नको ताटकळू
**********

पुन्हा पुन्हा तुज
मागावे ते किती
काय  ऐसी रिती
बरी आहे ॥

किती येरझारा
माराया लावशी
पायाला बांधसी
चाके किती ॥

तुजला दयाळा
नच हे शोभते
बघ उणे येते
दत्तात्रेया ॥

विक्रांत संसारी
थकला भागला
शरण तुजला
आला आहे ॥

नको ताटकळू
पुरे झाले देवा
भेटशील केवा
मायबापा॥

 © डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

++++

रविवार, ८ डिसेंबर, २०१९

स्वामी दत्ता !




स्वामी दत्ता !
*********  

स्वामी या लेकराला
दत्ता या बालकाला
उचलून घ्या हो कडेला ॥

स्वामी या अजागळाला
दत्ता या वेंधळयाला
म्हणा तुम्ही हो आपुला ॥

स्वामी ज्या धांदरटाला
दत्ता या मुर्ख बाळा
शिकवा स्थिर व्हायला ॥

स्वामी या अडाण्याला
दत्ता या शहाण्याला
लावा सारे विसरायला ॥

स्वामी आलो काकुळतीला
दत्ता शरण पावुलाला
घ्या विक्रांता ह्रदयाला   ॥



© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


बरे केलेत





बरे केलेत
**********
घातल्या गोळ्या त्यांना
बरे केलेत
खरे खोटे होते का ते
नाही विचारत
काही लोक कधीही
नाहीच सुधारत
भय हवे पापीयांना
नव्हतेच ते घडत
-
मानवी हक्क म्हणूनी
ओरडेल कुणी
न्यायाच्या बजावणीस
होत आग्रही  कुणी
पण तोवरच की
त्यांचे तिथे नसतील कुणी
-
लेक बहिण आई
जेव्हा जळते मरुनी
यातनेत पशुच्या
जाते तडफ़डूनी
गोष्टी  न्यायाच्या मग
जातात रे गळूनी
-
म्हणुनिया म्हणतो मी
बरे केलेत
म्हणेन पुन:पुन्हा जरी
पुन्हा केलेत
-
दिसता समोर
धडधडीत पिशाच
तया काय सिद्ध करावे
लागते ते पिशाच
नष्ट करूनी  तया ती  
थांबवावी पैदास
-
ततक्षणी ततक्षणी ततक्षणी
-
थोर कार्य ते नाही
अरे याहूनी
-
बरे केलेत !

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.
com


रूप ज्ञानदेव

रूप ज्ञानदेव  ********* रूप ज्ञानदेव घेऊनिया आले  आळंदी बैसले पांडुरंग ॥ देवभक्त रूपे करतो सोहळा  द्वैताचा आगळा प्रेममय  देव स्व...