गुरुवार, १० ऑक्टोबर, २०१९

एक दत्त खरा






एक दत्त खरा

--
एक दत्त खरा
बाकी तो पसारा
भोवताली सारा
मज दिसे 
.
सारी खोटी खोटी
जगताची रिती
अवधूता प्रीती
जडू दिली 

गेला भ्रम  जरी
वाहतो संसारी
आनंद उजेरी
अंतरात 

अवघी तयाची 
असे कृपा दया 
कळू आली माया 
थोडी बहू 
.
विक्रांत विरळा
येथुनी सुटला
दत्ताला भेटला
अंतरंगी

.

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

बुधवार, ९ ऑक्टोबर, २०१९

भिकारी मी भिकारी




भिकारी  मी भिकारी
********************

भिकारी  मी भिकारी
या नरहरीचा भिकारी ..धृ..

आलो तया दारी
या गाणगापुरी   
भरी माझी झोळी
दत्ता, देई भक्ती खरी

मज गांजले विकारी
मज झोडीले संसारी
दत्ता येई लवकरी
सोडव रे झडकरी

ये दिन माथ्यावरी
हा जन्म वाट्यावरी
तुझ्याविना दत्ता कोण
घास मुखी या भरी

दे विक्रांता चाकरी
या याचका भाकरी
अथवा जावो प्राण हे
दत्ता तुझ्या दारी
 ***
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

मंगळवार, ८ ऑक्टोबर, २०१९

धर्मपत्नी

धर्मपत्नी
***::***
मज माझी प्रिय
असे धर्मपत्नी
जीवनसंगिनी
धर्मशील ॥
तियेचे चारित्र्य
धवल उज्ज्वल
सुवर्ण झळाळ
जणू काही ॥
तिचे ते कर्तव्यी
सदैव जागणे
नसणे बहाणे
कसलेच ॥
तिची तत्परता
पूर्ण समर्पण
जाहले जीवन
तृप्त माझे ॥
धनिक घराची
अहंकार नाही
तुझे माझे काही
वदे ची ना ॥
उत्तम आवड
सदा जपतचे
जीव देत असे
जीवासाठी ॥
मुलांची जणू की
प्रत्यक्ष देैवत
ठेवितसे चित्त
तया  दक्ष ॥
स्वभावाने धीट
आणि रोकठोक
जीवन रसिक
गुणवती ॥
कधी थोडी फार
होते धुसफूस
खाताना तो ऊस
कटे जीभ॥
परी तो गोडवा
मुळी जात नाही
टाकवत नाही
मुळी सुद्धा ॥
अहो त्यात दोष
नसेच उसाचा
लोभ  खाणाऱ्यांचा
नडे काही ॥
खरेच मी असे
भाग्यवान पती
ऐसी भगवती
घरी माझे ॥
अंजना विक्रांत
घेते म्हणवून
सुखाने भरून
जातो मीच ॥

**
 © डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

सोमवार, ७ ऑक्टोबर, २०१९

संचित

संचित
***************
फळले संचित
जाहले उदित
वाढवून प्रीत
दत्ता प्रती ॥
मुख मागते हे
दत्त नाम घ्यावे
पाय चालू पाहे
गिरनार ॥
कृष्णेचे ते पाणी
लागो सदा अंगा
वाटते सर्वांगा
व्याकुळता ॥
भस्माचे ते लेणे
बहू गोड वाटे
वासना ती तुटे
कनकाची ॥
कधी टेकवीन
दत्त पदी शिर
वाहिण्या अधीर
प्रेम भक्ती ॥
मायबाप दत्ता
कृपा ही केली
विक्रांती जाहली
उपरती॥
**
 © डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

रविवार, ६ ऑक्टोबर, २०१९

शक्तिचा जागर



शक्तिचा जागर
**********
नावाला नवरा
घर संसाराला
सोडता तयाला
येत नाही ॥
टोचून बोलतो
मारतो गांजतो
उपाशी ठेवतो
वेळोवेळा ॥
न दे खर्च पाणी
म्हणे घे पाहूनी
मजा ये मारूनी
स्वतः परी ॥
देहावरी हक्क
दाखवू पाहतो
मारतो छळतो
नाकारता ॥
का गं बाई अशी
राहते संसारी
वार स्वतःवरी
झेलूनिया ॥
नको कोंडलेली
राहू गोठ्यातली
गाय गांजलेली
कदापी तू  ॥
कशाला हवाय
धनी कुंकवाचा
पुरुषी जगाचा
मक्तेदार ॥
आदिमाया तूच
ओळख स्वतःला
घेऊन शुलाला
सिद्ध होई ॥
करी गं हुंकार
मिरव गजर
शक्तीचा जागर
दावी जगा ॥
विक्रांत विनवी
निद्रिस्त शक्तीला
प्रकट रूपाला
करी आता ॥

**
 © डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

शनिवार, ५ ऑक्टोबर, २०१९

दत्त भरलेला





 दत्त भरलेला

डोळीयात दत्त
हृदयात दत्त
जीवनात दत्त
भरलेला
निजण्यात दत्त
जगण्यात दत्त
स्वप्नातया  दत्त
भरलेला
स्मरणात दत्त
विस्मृतीत दत्त
काठोकाठ दत्त
भरलेला
कणोकणी दत्त
मनोमनी दत्त
विश्वाकार दत्त
भरलेला
दत्ताचा विक्रांत
म्हणे दत्त दत्त
जाणिवेत दत्त
भरलेला
.
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com

शुक्रवार, ४ ऑक्टोबर, २०१९

मोडू दे रे खोडी

मोडू दे रे खोडी
****:*******
संसार सुखाची
तुटू दे रे गोडी
मोडू दे रे खोडी
दत्ता माझी ॥
बहु लाचावली
जिव्हा ही रसाला
आणि बोलण्याला
खोटे नाटे ॥
किती गोड वाटे
लोळणे निजने
डोळ्यांनी पाहणे
सुखवस्तू ॥
घडेना साधन
सद्ग्रंथ वाचन
संतांची वचन
स्मरेनाचि  ॥
नामाची संगत
कदापि घडेना
भजनी रमेना
चित्त द्विधा ॥
वाया गेला मंत्र
गुरूंनी दिधला
कोनाडी ठेवला
चिंतामणी ॥
मायबाप दत्ता
करा सोय काही
मार्गी तुझ्या नेई
सनातन ॥
भक्तीने भरू दे
साधने जडू दे
कृपेने भिजू दे
विक्रांत या ॥
 © डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
https://kavitesathikavita.blogspot.com
**+

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...