शनिवार, ३१ ऑगस्ट, २०१९

दत्त ध्याईला





दत्त गाईला रे 
मी 
दत्त ध्याईला 

स्वप्नी पाहिला रे 
मी
मनी वाहिला 

स्मित मनोहारी 
जो 
ओठी ल्यायला 

रूप अद्भुत 
की 
रुपी ओतला

मन तृप्त झाले 
तै 
दत्त भिनला

माय बाप माझा 
रे
मज पूर्ण दिसला 

सारे दत्त होत 
हा 
विक्रांत नूरला


शब्द स्पर्श गंधी
या   
असे दत्त ओतला      


© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in






गुरुवार, २९ ऑगस्ट, २०१९

भक्ति थोडी




भक्ति थोडी
*********

दिगंबरी मन
सदा राहो माझे
दत्त नाम वाचे
यावे नित्य
 .
असो जगण्यात
खरे खोटे काही
दोष कोणाचेही
दिसू नये
 .
नको वैरभाव
घेण्या देण्यावरी  
आणिक अंतरी
द्वेषबुद्धी
 .
सज्जनांचा संग
लाभो मज नित्य
जेणे सदा चित्त
शुद्ध होय
 .
सरो मलिनता
आली व्यवहारी
दत्त नरहरी
कृपा करी
 .
तुज विनवणी
लागूनिया पदा
देई या विक्रांता
भक्ति थोडी
.
© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


बुधवार, २८ ऑगस्ट, २०१९

गोष्ट जगण्याची




गोष्ट जगण्याची

************



सरो माझा देह

पडो आता खाली

उगाच वाहिली

खोळ खुळी



जर तुझे येणे

घडणार नाही

कशाला मी वाही

नगरी ही



छान सजवली

गुणे वाढविली

यत्ने सांभाळली

सतकर्मी



कधी काही जरी

तुटले फुटले

वागणे चुकले

काळ गुणे



विसर न केला

पथ न सोडला

जन्म हा वाहीला

तुजसाठी



विक्रांत शपथ

वाहतोय तुझी

गोष्ट जगण्याची

तूच माझी 

.



© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


सोमवार, २६ ऑगस्ट, २०१९

दत्त सावळा




दत्त सावळा  

********





दत्त सावळा सावळा

गौर कर्पूरी सजला

दत्त कैलाशी वैकुंठी

शैव वैष्णवी भरला



भेद भावाच्या सहित

देतो दिगंबरा मिठी

रूप रूपातीत तुझे

मज दिसू दे रे दिठी  



म्हणे एकांगी विक्रांत

गीत खेळात पडला

दत्ता चित्तात ठेवूनि

आत्म खेळात रंगला



© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

रविवार, २५ ऑगस्ट, २०१९

काफीरकी




काफीरकी

********

                     

कासया मी जाउ 
आता कुण्या दारी 
भार तुजवरी 
दत्तात्रया


होवो माझे भले 
होवो नच जरी 
जातो ना माघारी 
येथूनिया


तुझ्या दारी नाही 
असे जगी काही 
दिसत ते नाही 
मज दत्ता


जरी का उपाशी 
राहिलो मी इथे 
मिळणार कुठे 
काही नाही


सरली ही कथा 
माझ्या यातनांची 
आता कृपा तुझी 
खरी ठरो


अन्यथा होईल 
जगात नाचक्की 
व्यर्थ काफीरकी 
केली ऐसी


विक्रांत दारात 
तुझिया कुतरे 
तुकड्या लाचारे
दीन उभे
.                         

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


शनिवार, २४ ऑगस्ट, २०१९

ओठावरी गाणे होते




ओठावरी 
गाणे होते
गाण्यामध्ये
शब्द ओले

ओळीमध्ये

शब्द खुळे
अर्थ खोल
काही रूळे

प्राण होते 

भारलेले
देहावरी 
उमलले

स्पर्श तुझे 

हळूवार
किरणांनी
माळलेले

फुल गाली 

उमलले
मीन डोळे
काजळले

नेत्र निल 

हरवले 
शुभ्रकांती 
विसावले 

आभाळ ही

निळे निळे
माझ्यामध्ये
आकारले

जगण्याचा 

भाषा ल्याले 
क्षण होते
सजलेले

काय एथ

मी असे वा 
परकाया 
कुणी आले

हरवला 

आकार हा 
आधारही 
नवे आले 

तिच वाट 

तिच गाठ 
देही दीप 
पाजळले



डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

http://kavitesathikavita.blogspot.in‍

शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०१९

कृष्ण आला दारी



कृष्ण आला
*********

पहाटेच्या पारी
कृष्ण आला दारी
सखा आला घरी
केली त्यानी चोरी ॥

निजलेले होते
स्वप्न सजलेले
चोरीयले भान
ध्यानी भरियले॥

घरदार नेले
नेली पोर बाळी
नवरा नणंद
नेली एक सरी ॥

लुटले गं बाई
आले रस्त्यावर
सावळ्या भ्रमात
झाले वेडी पार ॥

एकुलीच आता
एकुल्या मनात
एकुलिये जग
एकुल्या पणात ॥

गवळण मनी
काठोकाठ कृष्ण
विक्रांत भरून
सुखावला


.

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

http://kavitesathikavita.blogspot.in‍

भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...