शनिवार, २४ ऑगस्ट, २०१९

ओठावरी गाणे होते




ओठावरी 
गाणे होते
गाण्यामध्ये
शब्द ओले

ओळीमध्ये

शब्द खुळे
अर्थ खोल
काही रूळे

प्राण होते 

भारलेले
देहावरी 
उमलले

स्पर्श तुझे 

हळूवार
किरणांनी
माळलेले

फुल गाली 

उमलले
मीन डोळे
काजळले

नेत्र निल 

हरवले 
शुभ्रकांती 
विसावले 

आभाळ ही

निळे निळे
माझ्यामध्ये
आकारले

जगण्याचा 

भाषा ल्याले 
क्षण होते
सजलेले

काय एथ

मी असे वा 
परकाया 
कुणी आले

हरवला 

आकार हा 
आधारही 
नवे आले 

तिच वाट 

तिच गाठ 
देही दीप 
पाजळले



डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

http://kavitesathikavita.blogspot.in‍

शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०१९

कृष्ण आला दारी



कृष्ण आला
*********

पहाटेच्या पारी
कृष्ण आला दारी
सखा आला घरी
केली त्यानी चोरी ॥

निजलेले होते
स्वप्न सजलेले
चोरीयले भान
ध्यानी भरियले॥

घरदार नेले
नेली पोर बाळी
नवरा नणंद
नेली एक सरी ॥

लुटले गं बाई
आले रस्त्यावर
सावळ्या भ्रमात
झाले वेडी पार ॥

एकुलीच आता
एकुल्या मनात
एकुलिये जग
एकुल्या पणात ॥

गवळण मनी
काठोकाठ कृष्ण
विक्रांत भरून
सुखावला


.

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

http://kavitesathikavita.blogspot.in‍

गुरुवार, २२ ऑगस्ट, २०१९

नापास हे घोडे


 नापास हे घोडे
*************
जर तुला वाटे
नापास हे घोडे
मोजुनियां कोडे
देई दत्ता ॥

प्रियकर हाती
घडावे शासन
करीन प्राशन
विष तेही ॥

तेणे गुणे काही
पडे तुझी गाठ
ऐसी मज भेट
कृपा करी ॥

करी रे दानव
कंस वा रावण
हाताने मरण
देई मज ॥

देई रे पशुत्व
देई रे दास्यत्व
दिसु दे देवत्व
तुझे मज ॥

मग हा विक्रांत
जन्म जन्मांतरी
राही पदावरी
तुझ्या दत्ता
००

बुधवार, २१ ऑगस्ट, २०१९

पिंजरा





पिंजरा
*****

विश्व पिंजऱ्यात
कोंडीयले  मला
देऊन खायाला 
गोड फळे 

सुख सौख्य देहा
दिला मानपान
व्यर्थ अभिमान
वाढविला

सुटू गेली चिंता
आजची उद्याची
गोळीच निजेची
घेतली म्या

सुटले भाविक
जीवलग संघ
भोगाचे अभंग
पाठ झाले 

विक्रांत सुटावा
यया कारेतून 
पंखी पांघरून
बळ तुझे

प्रभू दत्तात्रेया
तुच बाप माझा
तोड दरवाजा
आसक्तीचा

मग मी उडेल
गगन होईल
मजला भेटेल
माझेपणी

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in‍

००

मंगळवार, २० ऑगस्ट, २०१९

इथे मरण साजिरे



मोह मधुर मदिर
कुण्या डोळ्यात शिरला
जीव बुडाला हरला
शब्द सुगंधीत झाला

आले सावज हातात
रानी आरोळ्या उठल्या
दाट हिरव्या झाडीत
कुणी जिभल्या चाटल्या

कोण मरून जगले
काय ठाव या जगाला
देशोधडीला लागून
कुणी भेटले कुणाला

डोह डोळ्यांचा गहिरा
कुण्या जीवास कळतो
जन्म सांडून पतंग
कैसा आगीला भिडतो

जा रे  जा रे  वाटसरा
इथे नकोच रेंगाळू
इथे मरण साजिरे
कोणा क्वचित ये कळू

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in‍


सोमवार, १९ ऑगस्ट, २०१९

गिरनार वादळ





गिरनार वादळ
***********
वारा  बेभान डोंगरी
येई खोल दरीतून
 देह थरारे हिवाने
जातो वाटतो उडून

वस्त्र फडाडे तनुचे
जैसा ध्वज की स्तंभाला
कुणी लोटतो धरतो
वाटे जणू पावुलाला

आत वादळ भक्तीचे
घोष दत्ताचा चालला
येई डोळ्यातून सरि
मनी आकांत वाढला

आता बाहेरी हा असा
धुंद गोंधळ माजला
वाट गिरणारी ओली
खेळ धुक्यात चालला

बाप दत्तात्रेय माझा
वाट पाहतो शिखरी
झालो अधीर वाहण्या
वेडे शिर पायांवरी

म्हणे विक्रांत वादळा
नको करूस गमजा
पंचभूतांचा तो स्वामी
आहे गिरनारी माझा
.
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in‍


 

रविवार, १८ ऑगस्ट, २०१९

दत्त स्मरणी




दत्त स्मरणी 
********

कुणाच्या स्मरणी 
मनाची मासोळी 
अशी तळमळी
पाण्याविना 

कुणाच्या प्रेमानी 
मनाचा मयुर 
पिसारा सुंदर  
फुलवितो  

कुणाच्या नावाने 
मनाचा हा रावा 
म्हणतो ये देवा 
भेटावया 

कुठल्या गाण्यांत 
मनाची कोकीळ 
स्वरांनी आभाळ 
भरतसे 

तूच तो एकच 
बाप गिरणारी
बैसला शिखरी 
रैवतकाच्या 

विक्रांत सादर 
तया पदावर 
म्हणे कृपा कर 
दत्तात्रेया

.
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in‍

वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...