बुधवार, २० फेब्रुवारी, २०१९

आवाहन




आवाहन
******

उठा उठा हो
रुद्र भैरवा
उठा उठा हो
शिवशंकरा   

यावे तुम्ही  
तांडव करीता   
आणि उघडा
तृतीय नेत्रा

पाप साचले
नष्ट करा
नतदृष्ट ते
सारे मारा

ध्वस्त करा
पाप नगरा
घेवून तीक्ष्ण
त्रिशूल करा

येई चामुंडा
तू महाकाली
दुष्ट दानव
अवघे संहारी

शीर एकेक
घेई कापूनि
नदी वाहू दे
तिथे रुधिरीं

नाच थयथय
अशी अन
पाप्यांचा त्या
कर्दम करी

समुळ त्यास
नष्ट करी
पुन्हा न यावे
ते देहांतरी

सूड सात्विक
मनात पेटवी
रुजव अघोरी
तंत्र ते काही

खल निर्दालना
विना कधीही
सुखी होणार
नाही ही मही 

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


मंगळवार, १९ फेब्रुवारी, २०१९

माझे सचोटीचे गाणे




माझे सचोटीचे गाणे
*****************

गाडी चालते चालते 
तेल सरते सरते 
धूर भरल्या पथात 
रोज येणे जाणे होते 

पथ खड्ड्यांनी भरला 
देह खिळखिळा झाला
गाडी किती रे खटारा 
बोले बाजूनी जाणारा 

धास्ती दिव्याची रोजची 
कधी पंक्चर व्हायची 
पण मिळता पगार 
भिती उद्याला उद्याची

मोल कष्टाचे मिळता 
मजा जगण्यात आहे 
बरबटलेल्या खिशाला 
पाप वेटाळून राहे

पडो हाताला रे घट्टे 
श्वास धपापो उरात
स्वेदगंगेच्या या काठी
तप घडावे सतत 

दत्त चालवितो जिणे
ऐसे सुख  समाधाने
त्यांच्या पायी रुजू होवो 
माझे सचोटीचे गाणे

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in



।। शिवराय ।।





। शिवराय ।।

शिवराय हे दैवत आमुचे   
नाहीत आणिक कुणाचे   
न हाती झेंडा घेणार्‍याचे  
न पुतळा उभारणार्‍याचे

शिवराय ना मतपेटीचे
याच्या त्याच्या वा जातीचे   
टिळा लावून हिंडणार्‍या  
त्या ऐर्‍या गैर्‍या गुंडाचे  

शिवराय इथल्या मातीचे
रुजलेल्या कणाकणाचे
मनामनात भिजल्या
निस्सीम भावभक्तीचे

शिवराय दैवत या देशाचे
महान प्रतीक स्वातंत्राचे  
पाय रोवून फडफडत्या
भगव्या जरी पटक्याचे

शिवराय मर्द तान्हाजीचे
शिवराय बाजी देशपांडेचे  
शिवराय मदारी मेहतरचे
शिवराय कान्होजी आंग्रेचे  

शिवराय नाव सागराचे
पवित्र भीमा नि कृष्णेचे
उभ्या ठाम सह्याद्रीचे
हिंदूराष्ट्र महापुरुषाचे

शिवराय आडनाव प्रत्येकाचे
शब्द मराठी बोलणार्‍याचे
बाहू बाहुत स्फुरणार्‍या
जिगरी मरहट्ट रक्ताचे

शिवराय सन्मान या मातीचा
शिवराय शिरपेच या देशाचा
शिवराय प्राणात गरजणारा
जयघोष मराठी आस्मितेचा

मी मानी शिवरायाचा
अभिमानी महाराष्ट्राचा
ओवाळतो सदैव तया
करुनी दीप प्राणाचा  

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


रविवार, १७ फेब्रुवारी, २०१९

सैनिक




सैनिक
****

पटावरील
प्याद्यागत
केक सैनिक
जातो मरत

नाव गाव ते
हरवून जाते
पाचोळ्याचे
नसणे होते

ख्त हरते
ख्त जिंकते
वर्षानुवर्ष
रक्त सांडते

मान्य आहे
जीवन त्यांचे
मरण्यासाठी
फक्त असते

यांची सीमा
त्याचा धर्म
पाप कुणाचे
पाक कर्म

या परंतु
कळल्यावाचून
केवळ असते
जाणे धावून

काम त्यांचे
अभिमानाचे
मरणही असते
सौभाग्याचे

तसे इथे तर
रोज घडती
लोक मरती
अपघाती

लढता लढता
मृत्यू वरतो
तो मृत्यूंजय
परी ठरतो

प्रणाम माझा
त्या इर्षेला  
त्या जिद्दीला
समर्पणाला

जगतो आम्ही
छायेत त्यांच्या
पाहातो रुद्र
कायेत त्यांच्या


© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

शनिवार, १६ फेब्रुवारी, २०१९

समाधिस्थ




मठ बांधला
साधू  गेला
उरे सोहळा
समाधीला

किती पेरले
कुठे पेरले
कुणा न कळे
हात झाकला

देही भरला
प्रकाश थोरला
शुन्यी मिटला
विश्व जाहला

दिवा पेटतो
तेव्हा कळतो
तोवर राहातो
तम साठला

मागे उरला
गंध कुणाला
कधी येतो
मग कामाला

स्पंदन सुप्त
अणू रेणूंचे
काम विजेचे
होय कोणाला   

हो निराकार
सरता आकार 
करुणा प्रगटे
मग अपार

विक्रांतास या
संत कृपेने
प्रेम कऴले
सुप्त ठेवले 

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


शुक्रवार, १५ फेब्रुवारी, २०१९

पुलवामा



पुलवामा
*******

मातीत मिसळते रक्त
जेव्हा तिथे सैनिकांचे
उकळते रक्त इथे
प्रत्येक भारतीयाचे

आक्रोशाने घर सुन्न
होती जेव्हा सैनिकांचे
शिवशिवतात हात
श्वास होती वादळाचे

हे युद्ध नसे धर्माचे
हे अधर्म युद्ध आहे
माथेफिरू वल्गनांची
गंदी करतूद आहे

बळ तुझ्या हातातले
सरले कारे भारता
करी निशत्रू हि धरा
घेई गांडीव ते हाता

बोल हेच पुन्हा तुझे
उमटू दे रे केशवा
दुष्ट असुरी तमाचा
सर्व नाश तो घडावा

हीच माझी प्रार्थना नि
हाच माझा आक्रोश रे
देई शस्त्र वा या हाती
संपविण्या हौदोस रे

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...