रविवार, ३० डिसेंबर, २०१८

सरत्या उन्हाचा लोभ



सरत्या उन्हाचा लोभ
*****************

माझ्या सरत्या उन्हाचा
नको सखी लोभ धरू
आता होईल काळोख
उगा वेडेपणा करू

सांज लाभली सुखद
अंगी ल्याला गार वारा
जल लहरी मोजल्या
ओल लागली पायाला

मैत्र मिळते नशिबी
असे क्वचित कुणाला
सौख्य लाभते अनोखे
सूर मिळता सुराला

आता सरला दिवस
वाटा ठरल्या वेगळ्या
भेटी होतील परत
जन्म काळाच्या गुंडाळ्या

उद्या नवीन सागर
नवा असेल किनारा
पुन्हा भेटणे नव्याने
ओढ अव्यक्त अंतरा


डॉ.विक्रांत प्राभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

शनिवार, २९ डिसेंबर, २०१८

मी कडू स्वभावाचा






कडू स्वभावाचा ( काव्य उपक्रमासाठी)

या आपल्या कडू पणाचा
उतारा मज न सापडला  
मग त्याचाच रंग लेवून
मी माझे पणा सजवला

आता हे कडूपण आतले
तुपात तळले साखरेत घोळले
तरी राहणार अगदी तसेच
मग दुनियेतही तसेच मांडले

हा आपण कडू बोलतो
कडूच प्रतिक्रिया देतो
गोड बोलणार्‍यांचा तर
फारच तिटकारा येतो

साले ते सारेच खोटारडे
आत एक बाहेर असलेले
साप जणू की हिरवेगार
झुडुपा खाली दडलेले

हळू हळू लोकांनी नाईलाजाने
आपल्याला तसाच स्वीकारला
दिसताच आपण, म्हणती ते
आला रे आला, कडू कारला

जास्त कुणी हटकत नाहि
नादी कुणी लागत नाही
कुणी जवळ केले तरीही
आपला कडूपणा सुटत नाही

अर्थात या कडूपणाचा
पण कधीच आपल्याला
कुणी किती म्हटले तरी
काही त्रास नाही झाला

अन या आतल्या रसायनाचा
आपण कधी राग नाही केला
जसे आहोत तसे आपल्या
या मनाचा स्वीकार केला

नाही येत बुवा आपल्याला
दुनिये सारखे वागायला
पण तशीच काही एक चव
असतेच ना हो कारल्याला !


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


शुक्रवार, २८ डिसेंबर, २०१८

येई दत्ता



येई दत्ता

असे आत्म राज्य 
देही वसलेला 
शोधे त्या भेटला 
म्हणतात ॥

बुजलेले पथ 
अडलेला वारा 
रान भुली खेटा
घडतात ॥

कसे पाहू तया
बांधलेले डोळे 
उजेडी आंधळे 
भांबावले ॥

खुणावती शब्द
दाही दिशा मुक्त 
शब्देविना दत्त 
पहावया॥

थकला विक्रांत
व्याकूळ आहे प्राण
होऊन जीवन 
येई दत्ता॥

डाॅ.विक्रांत प्रभाकर तिकोणे  
httht://kavitesathikavita.blogspot.in

गुरुवार, २७ डिसेंबर, २०१८

दत्त कवित्व


दत्त कवित्व
*********

शब्दांवर शब्द
रचत रचत
राहतो करित
कवित्व मी ॥

शब्दांचे हे टाळ
कुटत कुटत
राही आळवत
दत्ता तुज  ॥

लयीचा मृदुंग
सुरांची वा जाण
असल्या वाचून
गाणी गातो ॥

तुझा कानाडोळा
कळतोय मला
मना पण चाळा
अन्य नाही ॥

वेडाची आवड
आवडीचे वेड
नाही रे सुटत
काही केल्या ॥

घेई बा ऐकून
देई वा सोडून
माझे मी करीन
तुझ्यासाठी ॥

विक्रांत शब्दात
गेला हरवत
सुमनची होत
शब्दरूप ॥

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http ://kavitesathikavita.blogspot.in

बुधवार, २६ डिसेंबर, २०१८

काळ





काळ !
************

रवी मध्यानीचा
खाली उतरला
काळ्या काजळीची
किनार नभाला

सरलेले वर्ष
मानलेला काळ
जाय उतरणी
देहाचा ओघळ

कल्लोळ भरला
जल्लोष चालला
एकेक दिवस
क्षणांचा सोहळा

कालही मी होतो
आहे नि आजला
काळ कल्पनेत  
जन्म वर्तुळाला

कळताच मन
भ्रम मावळला
अनादि जीवन
हुंकार उरला

विक्रांत नावाचा
आकार मानिला
इथेच होता नि
असेल नसला

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in



मंगळवार, २५ डिसेंबर, २०१८

संत कृपा






संत कृपा

सुखाचा पावूस
आसावल्या मनी
संत मेघूटांनी
कृपा केली ||

कृपेचे ते बोल
अनुभूति खोल
हृदयात ओल
पालविली ||

माझेच मजला
पुन्हा दाखविले
रूप विसरले
भ्रमातले ||

काही शब्दातून
काही शब्दविन  
सहज साधन
व्यक्त केले ||

भांडे डागाळले
पुन्हा विसळले
भरून ठेविले
शुद्धपणे  ||

जाहला सार्थक
दिन आज काही
विक्रांत प्रवाही
चैतन्याच्या ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in







रविवार, २३ डिसेंबर, २०१८

देई दत्ता मज



देई दत्ता मज
*********

देई दत्ता मज
जन्म पुन्हा पुन्हा
परी तुझा तान्हा
करी सदा

मोकल संसारी
जगाच्या बाजारी
हृदय मंदिरी
विराजून

फिरव तिर्थांची
कर वा संन्यासी
एकांती वनांसी
मौन ठेवी

जन्मोजन्मी पण
देई प्रेमसुख
भक्ती कवतुक
दावी सदा 

विक्रांत विनवी
दत्ता अवधूता
सांभाळ अनंता
लेकरास


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

प्रार्थना

प्रार्थना ******* जाहले दर्शन तृप्त झाले मन  देखीले सगुण  परब्रम्ह  हास्य मुग्ध मुखी हात उंचावले  आशिष भरले  प्रेममय  परमपवित्र ...