सरत्या उन्हाचा लोभ
*****************
माझ्या सरत्या उन्हाचा
नको सखी लोभ धरू
आता होईल काळोख
उगा वेडेपणा करू
सांज लाभली सुखद
अंगी ल्याला गार वारा
जल लहरी मोजल्या
ओल लागली पायाला
मैत्र मिळते नशिबी
असे क्वचित कुणाला
सौख्य लाभते अनोखे
सूर मिळता सुराला
आता सरला दिवस
वाटा ठरल्या वेगळ्या
भेटी होतील परत
जन्म काळाच्या गुंडाळ्या
उद्या नवीन सागर
नवा असेल किनारा
पुन्हा भेटणे नव्याने
ओढ अव्यक्त अंतरा
डॉ.विक्रांत प्राभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
ब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.
उत्तर द्याहटवा