शुक्रवार, २८ डिसेंबर, २०१८

येई दत्ता



येई दत्ता

असे आत्म राज्य 
देही वसलेला 
शोधे त्या भेटला 
म्हणतात ॥

बुजलेले पथ 
अडलेला वारा 
रान भुली खेटा
घडतात ॥

कसे पाहू तया
बांधलेले डोळे 
उजेडी आंधळे 
भांबावले ॥

खुणावती शब्द
दाही दिशा मुक्त 
शब्देविना दत्त 
पहावया॥

थकला विक्रांत
व्याकूळ आहे प्राण
होऊन जीवन 
येई दत्ता॥

डाॅ.विक्रांत प्रभाकर तिकोणे  
httht://kavitesathikavita.blogspot.in

गुरुवार, २७ डिसेंबर, २०१८

दत्त कवित्व


दत्त कवित्व
*********

शब्दांवर शब्द
रचत रचत
राहतो करित
कवित्व मी ॥

शब्दांचे हे टाळ
कुटत कुटत
राही आळवत
दत्ता तुज  ॥

लयीचा मृदुंग
सुरांची वा जाण
असल्या वाचून
गाणी गातो ॥

तुझा कानाडोळा
कळतोय मला
मना पण चाळा
अन्य नाही ॥

वेडाची आवड
आवडीचे वेड
नाही रे सुटत
काही केल्या ॥

घेई बा ऐकून
देई वा सोडून
माझे मी करीन
तुझ्यासाठी ॥

विक्रांत शब्दात
गेला हरवत
सुमनची होत
शब्दरूप ॥

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http ://kavitesathikavita.blogspot.in

बुधवार, २६ डिसेंबर, २०१८

काळ





काळ !
************

रवी मध्यानीचा
खाली उतरला
काळ्या काजळीची
किनार नभाला

सरलेले वर्ष
मानलेला काळ
जाय उतरणी
देहाचा ओघळ

कल्लोळ भरला
जल्लोष चालला
एकेक दिवस
क्षणांचा सोहळा

कालही मी होतो
आहे नि आजला
काळ कल्पनेत  
जन्म वर्तुळाला

कळताच मन
भ्रम मावळला
अनादि जीवन
हुंकार उरला

विक्रांत नावाचा
आकार मानिला
इथेच होता नि
असेल नसला

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in



मंगळवार, २५ डिसेंबर, २०१८

संत कृपा






संत कृपा

सुखाचा पावूस
आसावल्या मनी
संत मेघूटांनी
कृपा केली ||

कृपेचे ते बोल
अनुभूति खोल
हृदयात ओल
पालविली ||

माझेच मजला
पुन्हा दाखविले
रूप विसरले
भ्रमातले ||

काही शब्दातून
काही शब्दविन  
सहज साधन
व्यक्त केले ||

भांडे डागाळले
पुन्हा विसळले
भरून ठेविले
शुद्धपणे  ||

जाहला सार्थक
दिन आज काही
विक्रांत प्रवाही
चैतन्याच्या ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in







रविवार, २३ डिसेंबर, २०१८

देई दत्ता मज



देई दत्ता मज
*********

देई दत्ता मज
जन्म पुन्हा पुन्हा
परी तुझा तान्हा
करी सदा

मोकल संसारी
जगाच्या बाजारी
हृदय मंदिरी
विराजून

फिरव तिर्थांची
कर वा संन्यासी
एकांती वनांसी
मौन ठेवी

जन्मोजन्मी पण
देई प्रेमसुख
भक्ती कवतुक
दावी सदा 

विक्रांत विनवी
दत्ता अवधूता
सांभाळ अनंता
लेकरास


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

स्वप्नभंग


स्वप्नभंग
********** *

वाट तुझी अडलेली
दार अन बंद आहे
धाव घेणे माझे व्यर्थ
एक मूर्ख छंद आहे

देणे तुझे खरकटे
आंबला त्या गंध आहे
कसे म्हणू किती वेळ
जगणे हे धुंद आहे  

जानतो अवमान हा  
उरामध्ये खंत आहे
उतरणे खालती नि
अस्तित्वास डंख आहे

होतो तरी श्वान पुन्हा  
पावुले ओढत आहे
फेकलेले कण तुझे
मानतो आनंद आहे

लोभ हा कसला अन
कसले हे बंध आहे
माये तुझे खेळणे वा
मारणे उदंड आहे

मिट माझे डोळे अन
बुडवून तुझ्यात घे
फेक दूर असे किंवा
होणे शतखंड आहे 

अर्धवट जागेपणी
जगणे दुभंग आहे
विसरणे माझे मला
माझा स्वप्नभंग आहे

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

शनिवार, २२ डिसेंबर, २०१८

दत्तास्तव


दत्तास्तव 
********

दत्तास्तव मी
जगतो रे
ह्रदयी खडावा
धरतो रे 
अलख अंतरी ।।
गातो रे 
कळी काळा न 
भितो रे  ।।
दत्ता मजला
तुझा करी  
तुझेच प्रेम 
उरी भरी ।।
जीवन मरण 
माझे वारी
मधली माया 
दूर निवारी ।।


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
http://kavitesathikavita.blogspot.in

महफ़िल

महफ़िल  ******* यारों के दिलदारों के टीकट आ रहे हैं ।   महफ़िलों के रंग सूने हो रहे हैं । तुम किस सुबह का इंतजार कर रहे हो?  ...