गुरुवार, २८ जून, २०१८

दत्त माउली



दत्त माउली  

माऊलीची दृष्टी 
सदा बाळाकडे 
तैसे मजकडे 
पाही दत्ता 

संकटी पडता 
येई गे धावून 
नेई सांभाळून 
निजधामा 

मोही अडकता 
पडता पडता 
फिरवून रस्ता 
धाडी मागे 

जाता वाहवत  
मायेच्या लोंढ्यात 
काळाच्या धारेत 
वाचवी गे 

विक्रांत शरण 
हात उभारून 
घेई उचलून  
माउली  ये 

डॉ .विक्रांत प्रभाकर तिकोणे 
http://kavitesathikavita.blogspot.in

सोमवार, २५ जून, २०१८

रीत मनावर




रीत मनावर 


तू शब्द आठवत 
नजर झुकवत 
डोळे मिटत 
बोलतेस 

तव बोल लाघट 
स्वर अनवट 
मन होत गंधीत
दरवळते

मी जीर्ण पिंपळ 
करतो सळसळ 
झेलत वादळ 
एक नवे 

मी पुन्हा बहरतो 
आकाश भरतो 
तुजला पाहतो 
पानोपानी 

तू येत येत 
पण जाते हरवत 
मी वाट पाहात 
ग्रीष्म होतो

तू किती दूरवर 
जन्मांचे अंतर 
मी रीत मनावर 
पांघरतो 


डॉ .विक्रांत प्रभाकर तिकोणे 
http://kavitesathikavita.blogspot.in

रविवार, २४ जून, २०१८

दत्त शोध




दत्त शोध

शोधतो मंदिरी
शोधतो अंतरी
साधू दरबारी
दत्ता तुला ॥

सापडून खुणा
दत्त सापडेना
आर्तीही मिटेना
काळजाची ॥

दत्त दत्त दत्त
लावूनिया रट
शून्य प्रतिसाद
कारे प्रभू ॥

स्मर्तृगामी प्रभू
तुज लागे बट्टा
देवा गुरुदत्ता
बरा नव्हे ॥

दत्ता विना रिक्त
म्हणवितो भक्त
व्यर्थ गेले उक्त
नाम तुझे ॥

विक्रांत उदास
चर काळजात
वेदना जपत
पदी राही ॥


डॉ .विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

शुक्रवार, २२ जून, २०१८

धाव घेई दत्ता

धाव घेई दत्ता 

********

आता लवकरी 
धाव घेई दत्ता 
अनाथांच्या नाथा 
अवधूता 

येता तुझ्याकडे
लोटू नको दूर 
देई पायावर 
ठाव मला 

संपले जीवन 
क्षीण झाले प्राण 
परी तुजविण 
थारा नाही 

नाही भरवसा 
पुढल्या क्षणाचा 
लोभ जगताचा 
व्यर्थ वाटे 

पोखरला वृक्ष 
काळ कीटकांनी 
गेला ओसरूनी 
बहरही 

चार श्वासांची या
सुमने शिणली 
तुझ्या पाऊली 
वाहू देरे 

विक्रांत शरण 
भावभक्ती विना 
पडून चरणा 
राहू दे रे 


 डॉ .विक्रांत प्रभाकर तिकोणे 
http://kavitesathikavita.blogspot.in

गुरुवार, २१ जून, २०१८

मंजूर मजला

मंजूर मजला

*********
तुज काय देऊ
मज ना कळते
तुज काय बोलू
मज ना वळते

या खुळ्या मनाचे
उनाड पाखरू
सदैव तुलाच
केवळ स्मरते

छंद तुझा मज
बंध तुझे मज
रे खेचून नेती
मुळी ना ऐकती

तुजसाठी पुन:
जनन घडावे
या अवनीतच
सतत रुजावे

मंजूर मजला
बंधन इथले
संग हवा तव
मीपण नसले

डॉ .विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

बुधवार, १३ जून, २०१८

पगड्यांची भांडणे



पगड्यांची भांडणे
***********

पगड्यांची भांडणे
खरंतर पगड्यांची नसतात
मतांवर डोळा ठेवलेल्या
त्या धूर्त चाली असतात

माझी पगडी मोठी झाली
त्यांची पगडी पडली खाली
कशी खासी मस्त जिरवली . . .
छान साली भांडणे लागली .

तुम्ही तर फुटलेच पाहिजे
एकमेकाला पाहिजे मारले
जे फायद्याचे त्यांनी तर
सदा सदा हवेच जिंकले

बाकी त्यांची पापे विसरा
दरोडे अन् लुटी दडवा
पण त्यांची पगडी मात्र
तेवढी लोकहो ध्यानी ठेवा

शीर सलामत तो पगडी पचास
हे ही बाकी खरे आहे
अन् टाळण्यासाठी सासुरवास
मिळेल ते ही बरे आहे.

डॉ .विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

शनिवार, ९ जून, २०१८

तूच


तूच ...
*****
तुच माझे स्वप्न आहे
चांदण्यात सजलेले
तुच माझे गाणे आहे
शब्द लेणी कोरलेले

तूच वेडी कांक्षा माझी
रात्रंदिन वाहिलेली
तू तितिक्षा जीवनात
सदा उरी साहिलेली

तूच तप्त तप आहे
डोळीयात मांडलेले
नाव तुझे ओठी माझ्या
प्राण तुला वाहिलेले

तूच सूर्य नभातील
कणकण व्यापलेला
तूच आत बाहेर तू
जाणूनी न जाणलेला

सांगणे काहीच नाही
मागणे आणिक काही
तृप्त असा तुझ्यात मी
वेगळे काहीच नाही


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
kavitesathikavita.blogspot.in

वीणेकरी

वीणेकरी ******* अपार भरल्या गर्दीत राउळी  उभा वीणेकरी नाद लयी ॥ कुणी पायावरी ठेवीतसे माथा  कुणी काढे वाटा बाजूने तो ॥ त्यास मोजम...