बुधवार, २५ ऑक्टोबर, २०१७

गोंदवलेकर महाराज


गोंदवलेकर महाराज

तया पायावर। ठेवतो मस्तक। 
ऐकुनी पावक ।शब्द त्यांचे।।
घडते सुस्नान ।चिंब होते मन ।
आनंदाचा घन । ओघळतो ।।
अनुभव गम्य । सुख दे प्रेमाने । 
पोटच्या मायेने। कल्पवृक्ष।।
काय वाणू त्यांस । किती गावे गुण ।
भेटते सगुण ।नामब्राह्म ।।
विक्रांत याचक  ।सदा तया दारी ।
मागे कणभरी ।नामप्रेम ।।


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathijavita.blogspot.in

मंगळवार, २४ ऑक्टोबर, २०१७

बीज



बीज


भिजलेल्या डोंगराने
पाणलोट सावरले
आकाशाचे फुल नवे
माळा‍वर ओघऴले

मीच होतो तेव्हा तेथे
मातीतले गाणे झालो
झिरपलो खोलवर
मुरमाची ओल ल्यालो

गवताचा  गंध ओला 
सनातन ओळखीचा
भरूनिया छातीमध्ये
अर्थ शोधे जीवनाचा

फुटूनिया गेले बीज
सांभाळले हरवले
थांबलेल्या क्षणांमध्ये
माझेपण जागे झाले

काय सांगू सखी बाई
खुळी वाट कुठे जाई
नादावले भान सारे
माझ्या अंतरी निळाई

डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोने
http://kavitesathikavita.blogspot.in

सोमवार, २३ ऑक्टोबर, २०१७

| मैत्र |



| मैत्र |

कधी तरी कुणी तरी
अचानक भेटतात
मनावरी जादू होते
जिवलग बनतात

फुलुनिया मैत्र येते  
शब्द मोकळे होतात
जीवनाचे धागे नवे
काही उलगडतात

उधळता पण फुले
तयावर येत नाही
जनरीत वेळभान
हाती हात घेत नाही

दडपले श्वास पण
पुन्हा हसू लागतात
मनातले दडलेले
गुज सांगू लागतात

जीवनाची कृपा पुन्हा
स्वर देही रुजतात
उजेडाची गाणी शुभ्र   
नवी उषा पाहतात

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

रविवार, २२ ऑक्टोबर, २०१७

नृसिंहवाडीला



॥ नृसिंहवाडीला ॥

भेटलो देवाला
जीव हा निवाला
डोळ्यांनी पाहिला
दत्तराज

भेटलो देवाला
हृदयी ठेविला
भावांनी पूजीला
पूर्णकाम

भेटलो देवाला
निर्गुणी दडल्या
सगुणी सजल्या
लीलांभरा

भेटलो देवाला
कृष्णेच्या काठाला
नृसिंह वाडीला
एकवार

भेटता देवाला
डोळ्यांच्या डोहाला
पूर तो लोटला
अनिवार

भेटून देवाला
देह परतला
विक्रांत खिळला
तटावर

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

गुरुवार, १९ ऑक्टोबर, २०१७

॥नारायणपूर ॥



॥नारायणपूर ॥


चैतन्य भरले 
साकार सजले 
मूर्तीत ओतले 
परब्रह्म ॥

पाहून नयनी 
मिटेना पापणी 
मनाचीये धणी 
पुरेचि ना॥

सर्वांगी कंपनं 
उठले झणाण
मनाचे उधाण
मावळले ॥

हृदय व्याकूळ 
अवरूद्ध गळा
एकांती सोहळा 
चाललेला ॥

पेटले अंतर 
शीतळ दर्शने 
श्रीदत्ता जगणे 
चाळविले ॥

विक्रांत उजाड 
निरर्थ वाहणे
जाहले खोचणे
जाणीवेत ॥

डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोने


बुधवार, ११ ऑक्टोबर, २०१७

|| धाव अवधूता ||



|| धाव अवधूता ||


कृपा करा स्वामी
दत्त दिगंबरा
सांभाळा सावरा
पतिताला ॥

मनीचा पसारा
मज आवरेना
संपता संपेना
झाडलोट ॥

अवती भवती
लाटा उसळती
तरण्यास शक्ती
नाही हाती ॥

देहाची आसक्ती
जिवलग नाती
सखे नि सोबती
सोडवेना ॥

तुजविण वृथा
धावे रानोमाळ
हृदयात जाळ
घेऊनिया ॥

धाव अवधूता
नेई तुझ्या पथा
विक्रांत नेणता
अजूनही ॥

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


सोमवार, ९ ऑक्टोबर, २०१७

एक पाऊस



एक पाऊस


दाटलेल्या नभातून
पाणी ओघळत होते
संततधारेत विश्व
अवघे भिजत होते


भिजलेले तन सारे
पाऊस झेलत होते
आणि मनातून ओले
सुख उमलत होते


जन्म सारा जगणेही
क्षण कवळत होते
जळी जणू अस्तित्व त्या
हरवू पाहत होते


पाणीयाच्या देहातले
पाणी उसळत होते
सुख डोळे ओघळूनि
जीवना भेटत होते 

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


वीणेकरी

वीणेकरी ******* अपार भरल्या गर्दीत राउळी  उभा वीणेकरी नाद लयी ॥ कुणी पायावरी ठेवीतसे माथा  कुणी काढे वाटा बाजूने तो ॥ त्यास मोजम...