शनिवार, १० जून, २०१७

करपला चंद्र माझा




करपला चंद्र माझा मी  
नुकताच उलथला आहे
तो गढूळ प्रकाश कालचा
विस्मृतीत गेला आहे

येतील लाटा जातील लाटा
वेळ कुणा मोजायला आहे
मी लाटांना झेलून देही  
सागर माझा केला आहे

चालू दे नाटक जगाचे
कोण कुठे रंगला आहे
आता पाहण्याचा डोळा  
रे माझा उघडला आहे

बाहेर असो मिट्ट काळोख
मी प्रकाश पहिला आहे
वाटा घनदाट निबिड जरी
दिवा आत लागला आहे  


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे



गुरुवार, ८ जून, २०१७

मरण म्हणजे ..


मरण म्हणजे सुटका
जीवनाच्या अंधारातून
मरण म्हणजे शांतता
जरा जन्म गोंधळातून

मरणाच्या मृदू कुशीत
जावे हळूवार निजून
जगण्याचे या सारेसारे
वृथा घाव ते विसरून

तिथे अस्तित्व नसणार
आठव येणार कुठून
तिथे जखमा नसणार
वेदना येणार कुठून

मेंदूत पेटलेले कोष
तेव्हा जातील विझून
मीपण मोकळे होत
गुंताही जाईल सुटून 

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


बुधवार, ७ जून, २०१७

मोगरा

मोगरा

माझ्या सभोवती दाटलेला
हा मंद धुंद दरवळ
आहे मोगऱ्याचा फुलांचा
की तुझ्या शुभ्र अस्तित्वाचा
खरच कळत नाही

ते तुझे गंधित अस्तित्व
माझ्या जीवनाचा
एक भाग होत आहे हळूहळू
माझ्या स्वप्नांचा
आणि त्या वेड्या विचारांचा
केंद्रबिंदू होत आहे हळूहळू

मी मिटतो डोळे तेव्हा
तू असतेस समोर हासत
चमकत्या केसांना आवरत
अन तुझ्या लाघवी स्मिताने
माझे जगणे सावरत

तुझे बोलणे कानात
झरझरते किणकिण करत
अन मी संदर्भ शोधत
राहतो त्याचा अर्थ आठवत
तुझे असणे फुलवते
प्रसन्नतेचा मळा माझ्यात
तेव्हा सहज वागतांना
प्राण खर्ची पडू पाहतात

हा वेडेपणा आहे सारा
झटकून टाक म्हणते मन
पण पाहताच तुला
मोगऱ्याने भरते अंगण

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavitna.blogspot.in

रविवार, ४ जून, २०१७

अनुवादित सैगलने गायलेली गझल (अब क्या बतावू मै तेरे )





अनुवादित सैगलने गायलेली गझल
(अब क्या बतावू मै तेरे )

काय सांगू सखी भेटताच तू काय भेटले मजला  
प्रीतीचे द:ख दिसले अन हे हृदय कळले मजला  
 
पाहिले मी दूरवर कुणी तव याचक न दिसला
तुझा अभिलाषी मीच तुझ्या दारात त्या भेटला
 
ध्येय भेटले ग स्वप्न भेटले ये प्रार्थना फळाला
सारेच भेटले मज तव पाहता पदचिन्हावलीला  
 
आता विद्ध हृदय हे फेकून माझे दूर दे तू
वा स्वीकार कर मज म्हणुनी मित आपुला

दिसला न मज तो केव्हाच फुलला ऋतू
हाय भेटला जेव्हा तो घाव घेवूनी भेटला
 

मुळ गझल = Seemab Akbarabadi 
मुक्त अनुवाद = विक्रांत प्रभाकर तिकोणे

गायक = सैगल 

भलती उपाधी



मागितल्याविन
सोनियाचे कण
दिधले आणून
जीवनाने ||

परी करवेना
तयाचे ते लेणे
देहा सजवणे
कैसे मग ||

कैसे सांभाळले
कुठे ते ठेवावे
कुणास वा द्यावे
समजेना ||

भलती उपाधी
घेतली लावून
सुख सांभाळून
मीच देवा ||

आता होई चोर
तूच दिगंबरा
करी रे सोहळा
लुटण्याचा ||

विक्रांत भिकारी
मग तुझ्या दारी
सुखाने चाकरी
करीन रे ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


शनिवार, ३ जून, २०१७

राम माझा बुद्ध तुझा




जगण्याला भूमी दे रे 
सत्य शिव सुंदराची 
माणसाला येवू दे रे 
जाण त्या सर्वात्मकाची
 
द्वेष नको मत्सरही
मांगल्याची प्रभा व्हावी 
उमलून कणोकणी
श्रद्धेची सुमने यावी 
 
धर्मातरी वाटलेली 
मती ही निष्पाप व्हावी  
सख्य बंधुत्वाची उषा 
मनी उगवून यावी   
 
राम माझा बुद्ध तुझा 
कुणाची न चेष्टा व्हावी 
सद्भावना प्रेषितांची 
जगण्याची भाषा व्हावी 
 
देव देश धर्म माझा 
फक्त माणसाचा राहो 
वर्ण जात गोत्रासवे 
विक्रांत वाहून जावो 
 
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

गुरुवार, १ जून, २०१७

पारधी अन मी





फाटलेले पंख शिवायचा दोरा
शोधायला गेलो पारध्याच्या दारा

त्याने दिले छान उन उन अन्न
नि म्हटला घे रे पिंजरी बसून

त्याचिया प्रेमाला विकलो भुलून
म्हटलो घे रे बा पंखही कापून

आकाशाची याद गेली करपून
चरबीने अंग गेले की फुगून

आता जुळलेले पंख ही असून
उडणे परी ते येई ना घडून

हसतो पारधी पाहतो मोजून
म्हणे येईल रे तुझाही तो दिन

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


अटळ

अटळ **** गिरनारी मूर्ती फुटली गोरक्षाची  ती कृती भ्याड नामर्द रात्रीची  अफगाणी मूर्ती फुटली गौतमाची  ती कृती उद्दाम  द्वाड दिवसा...