शुक्रवार, १२ मे, २०१७

हे झाड बहरून आलय




फांदिफांदीवर फुटलाय धुमारा
हे झाड बहरून आलय आता
देही उसळला ऋतूचा सोहळा
सारे वाटत सुटलय ते आता

फुलणे हा झाडाचा धर्म असतो
आणि फळणे हीच कृतकृत्यता
ते भाग्य तया भेटलेय आता
त्याला सुखे हिंदोळू द्या आता  

तसे फार काही नाही त्याच्याकडे
गंधाने व्यापलेले मुठभर आकाश
आणि रंगांत विखुरलेले हे इवलाले
तुमच्या आमच्या सुखदु:खाचे भास

त्या गंधाला मोल असेल वा नसेलही
त्या फुलांनी घर सजेल न सजेलही
पण असे बहरता येते कणाकणातून
कळेल या जगाला हे ही कमी नाही

सर्वांगाने फुलणे म्हणजे गाणे असते
मी माझ्या गाण्यात बहरलोय आता
घेणे न घेणे तुमच्या हातात असले तरी
न देणे माझ्या हातात उरले नाही आता

डॉ .विक्रांत प्रभाकर तिकोणे

अतळ डोह

अतळ डोह
*********

आत्ममग्न
दुःखाच्या
विराट
किनाऱ्यावर
एक एक लहर
पसरत होती ,
सरत होती
तरीही वलय
संपत नव्हती

गोठलेली रिक्त
जाणिव
अस्तित्व आपले
कवटाळून
म्हणत होती
आहे मी
आहे मी ।

तिचा उगम
तिचा अंत
लागत नव्हता
कुणालाही

डोळ्याच्याही
डोळ्यामागे
घडणारे ते नाट्य
देत होती निर्थकता
त्या वृक्षांना
जे शोधत होते
त्या जळातच
शाश्वतता
सैरभैर झालेल्या
पानात सळसळत
पानगळीची चाहूल घेत

आणि अतळ डोहात
खोलवर गेलेल्या
त्या पानांच्या पिढ्यांचा
पत्ताही कुणाला नव्हता


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
Http://kavitesathikavita.blogspot.in

गुरुवार, ११ मे, २०१७

||भगवान बुद्ध वंदना ||


बुद्धत्व प्राप्त केलेल्या
परम प्रिय गौतमा
अणुरेणूतील शून्य 
जाणलेल्या प्रियतमा
मजला जाणवतात
तुझ्या चैतन्य लहरी 
कधी बसता एकटे
श्वासाच्या किनाऱ्यावरी
तुझ्या मंद स्मितातून
उसळणारी प्रेरणा
अर्धोन्मिलित डोळ्यात
ओघळणारी करुणा ||
त्या परम वैराग्याचा
 इवलासा एक कण
हवाय मज जाण्यास
तुझ्यामध्ये हरवून
त्या तुझिया अनंतात
महाशून्याच्या स्फोटात
तुझ्याशिवाय नेणार
कोण घेवून हातात
परम शांती स्वरूपा
काल अकाल अतिता
करुणाघन कृपाळा
हृदयस्थ तथागता
आत्मदीप होण्यासाठी
झालास जीवनाधार
 पेटविले स्फुलिंग तू
मिटविला अंधकार
ज्ञानदिप्त प्रकाशात
 दिसे तूच वारंवार
विक्रांतच्या हृदयात
असे वास सर्वकाळ
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

बुधवार, १० मे, २०१७

पुन्हा जडे जीव जगावर




लाख तुझे ऋण मजवर
झालीस तू मेहरनजर  
मानू कितीदा तुझे आभार
शब्दाविन मी तुझ्यासमोर

त्याच रोजच्या मरणात मी
होतो चालत विना कारण
त्याच व्यथा अन कथातून
वाहत होते उगाच जीवन

आल्हादक तू उषा होवून
जाळत गेली गर्द अंधार
पुन्हा दिसे सुंदर जीवन  
पुन्हा जडे जीव जगावर  

तुझ्या पथी जीव अंथरून
वाटे उगा पडून राहावे
तुझ्या पावुला उरी झेलून  
हर पदी मी चुंबून घ्यावे

असे क्षण कुण्या जीवनात
क्वचित कधीतरी येतात
कृपावंत ते होवून धन्य  
जीवन जगुनिया जातात

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


अदमास !!

  

अदमास !!


"हसून टाळतेस का ?
वळून हसतेस का ?"
असे विचारावे तुला 
कितीदा वाटले होते 
पण तुझ्या चपलांचे 
भय सदोदित होते 

"रस्त्यात थांबतेस का ?
बहाणे करतेस का ?,"
असे वाटणे बहुदा
माझाच भ्रम होता 
मुंगेरीलाल स्वप्नात 
सदैव मश्गुल होता 

"हृदयात येतेस का ?
जीवास छळतेस का ?"
स्वप्नांचिया वाटेवर 
टोलनाका नसतो 
समजून होतो तरी 
बळे विचारात होतो 

,,"माझी तू होशील का ?
जीवनी येशील का ?"
खडा टाकून उगाच
अदमास घेत होतो
पळाया बूट आधीच
घालून बसलो होतो


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

मंगळवार, ९ मे, २०१७

एकच मागणे



एकच मागणे  
*********

एकच मागणे  
तुजला दयाळा
तुझिया पदाला  
ठाव द्यावा ||

सरोत प्रार्थना
अवघ्या कृपाळा  
जाणावा जिव्हाळा
पदोपदी ||

नको घेणे देणे
नको येणे जाणे
प्रेमात जगणे
घडो तुझ्या ||

नको प्राणायाम
नको जप ध्यान
जगण्या कारण
भक्ती व्हावे ||

दत्ता अवधूता
तुझा तूच दाता
म्हणून विक्रांता
आस मोठी ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे




सोमवार, ८ मे, २०१७

वेडेपणा


वेडेपणा
******
वेडेपणा माझ्यातला
मज येतसे दिसून 
गाठ कुठल्या जन्माची 
काही येतसे कळून
जन्म जन्मात हिंडता 
कधी दुरावलो कुठे 
असे भेटल्या वरती 
वाट पाऊलात अडे
पुन्हा भेटलो अवेळी
भेट राहिली अधुरी 
नव्या अतृप्त जन्माची
कडी आणिक जुळली
आता सुटावी बंधने 
मन मनात गुंतून 
ऋण कालचे जीवाचे 
जरा जाऊ दे फिटून
तुझे हिशेब कसले 
मज कळेना अजून 
कर आतातरी सौदा 
जन्म जाऊ दे वाहून


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...