बुधवार, १२ एप्रिल, २०१७

हसायचे होते





हसायचे होते  

फार काही नाही मज
फक्त हसायचे होते  
हेच वेड पण मला
रडावया पुरे होते  

साथ शोधावया गेलो
सोडणे नशिबी आले  
कुणी साथी नाही तर
दु:ख हेच दोस्त झाले

आता तर जीवनाला
मी ही विसरून गेलो
सरतात दिस कसे
निर्जीवात जमा झालो

कळेना प्रिय कुणास
दु:ख माझे होत आहे
दूरच्या त्या तारकांत
मन हरवत आहे

चालतो आहेच इथे  
छिन्नभिन्न स्वप्न जरी
निसटून मिठीतून
गेले आहे कुणीतरी

कळेना चाहूल कुणाची
जळते काय अंतरी  
हसतेय कोण इथे
काळ ओठात जहरी

(हँसने की चाह ने वर बेतलेली कविता )



डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे




सोमवार, १० एप्रिल, २०१७

दत्ता उतराई कसा होवू


दत्ता उतराई
कसा होवू तुझा
आले काही काजा
जीवन हे ||१||

केल्याविन काही
होत जरी नाही
करणे तू तेही  
झाला माझा ||२||

केली सारी आशा
तुझी जीवनात
भोगात लोभात
लिप्त जरी ||३||

एवढेच पुण्य
असे काही गाठी
झाला तयासाठी
दाता प्रभू ||४||

प्रभू जी भरलो
जीवन पातलो
किरण जाहलो
प्रकाशाचा ||५||

उरले नाटक
विक्रांत ओढतो
दत्ता विचारतो
ठीक ना रे ||६||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 


रविवार, ९ एप्रिल, २०१७

खेळ मजेचा




जोवर कुणी भेटत नाही
गळा पाचर मारत नाही
तोवर शब्द भरून देत
फुगा लगेच फुटत नाही

आंधळ्याचे स्वप्न जसे की
कधी कुणास कळत नाही
स्पर्शा मधले डोळे त्याचे
अर्थ शब्दात मांडत नाही

रे लाख आम्ही जगलो इथे
जगणे त्यास म्हणत नाही
किती उलटून दिन गेले
स्मरण चित्रे पुसत नाही

नवा सदरा घातला तरी
देह कधी बदलत नाही
रंगाच्या थरात बुडूनही
रंग आतला लपत नाही

बघ विक्रांत खेळ मजेचा
दुनिया ज्यास विटत नाही
मन हे कारावास असूनी 
बंदिवाना उमजत नाही

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


शनिवार, ८ एप्रिल, २०१७

जोडीयला दत्तराये ||




जैसे जीवनाचे
हाती आले माप
पुण्य पाप ताप
स्वीकारले ||१

ठेविल्या बांधून
भावना कामना
निराश कामना
भगव्याची ||२

पेटवून प्राण
करी घुसळण
घडो ते घडणं
याची डोळा ||३

मनाचे अंगण
दिले मी सोडून
पाहतो बसून
येरझार ||४

विक्रांत फुटला
शतखंड झाला
पुन्हा जोडीयला
दत्तराये ||५

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


शुक्रवार, ७ एप्रिल, २०१७

हलकेच हात सोडवत



हलकेच हात सोडवत
म्हटली ती जेव्हा
आपण फक्त
मित्र आहोत ना ?
कसमुसा हसलो मी
आणि म्हणालो
अर्थातच !
एक वादळली कविता तेव्हा
कोसळली माझ्या आत
मग जे उरले होते
ते कोऱ्या पानाचे
फडफडणे होते
म्हटले तर आता
लिहायचे कारण नव्हते
म्हटले तर लिहायला
खूप काही होते .

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे







गुरुवार, ६ एप्रिल, २०१७

नाम नाव



किती किती पाणी देवा
किती किती ही निळाई
इवलासा जन्म माझा
सांग कैसा पार होई

कैसे भेटी येवू तुवा
कैसे तव प्रेम पावू
गळुनिया गेले बळ   
सांग कैसा पुढे जावू

सांगतात संत सारे
नाम नाव पार नेई
घेवुनिया थकलो मी
खरे वाटतच नाही

थांबतो मी इथे आता
जन्म मरणाच्या रणी  
प्रेम तुझे मनी माझ्या
ठेव किंवा जा घेवूनी  

जाणतो न विक्रांत हे
येणे जाणे तुझे काही
नाकारणे पण तुला
काही केल्या होत नाही

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
http://kavitesathikavita.blogspot.in 




बुधवार, ५ एप्रिल, २०१७

वाटा केशरी कोवळ्या



वाटा केशरी कोवळ्या
मना क्वचित स्पर्शल्या
अश्या सामोरी येवून
का अवचित ठाकल्या

वाटा होत्याच मोडल्या
दूर ओढयात बुडाल्या
नव्या वळणी फिरून
उगा खुणावू लागल्या

साऱ्या तुटल्या जगाच्या
गाठी बुद्ध्याच सोडल्या  
हाका ओढाळ तरी का
मग माझ्यात रुतल्या  

गाव परके निष्ठुर
बाता धनाच्या चालल्या
मन विरक्त उदास
गोष्टी कुणा न कळल्या

होते भ्रम जरी कळे
साऱ्या सुखाच्या सावल्या
आस कुणाची जीवाला
पाय थांबती कश्याला

वाटा उसन्या परक्या
दत्ता कशाला दाविल्या
जाणे राहिले पुढती
सुख पायास फाटल्या

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in 





झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...