बुधवार, ५ एप्रिल, २०१७

विनवणी श्रीरामा ।।



विनवणी श्रीरामा ।।

जरी मी नच राम लायक ।
परी तो प्रभू जगतपालक ।
कलीमलहारी त्रिभुवनपालक ।
ठेवो माझी अल्पशी ओळख।।

मी तो मोही तुडुंब भरला 
विषयानुरागी थिल्लर थोरला 
सदा कर्दम वाढवीत आपुला 
चित्त सरोजी भ्रमर  भरला।।

मस्त खेळती कुंजर माजले 
काम भाव जे विभ्रम उठले 
गाळी अडकले मकरी गिळले
भक्तीभाव जे मनात सजले ।।

जन्म भोगतो नशेत दुःखद
तुझी करुणा माझे औषध 
हे रघुनाथ जय नरेश अवध 
येऊन माझे हे मीपण वध ।।

सुने जैसे हाडी अडकले 
जंबुक वा चामडीत गुंतले
क्षणभोगी मन मोही जडले
नाम घेतले जणू वाया गेले ।।

भ्रमित विक्रांत खेळे चकवा 
चोरे लुटले तव निघता गावा 
गिध वानर रिस जपले तुवा 
लोटू नको या मूढ मानवा ।।

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


सोमवार, ३ एप्रिल, २०१७

होय बाधा जीवनाला





वेडे उधाण वादळ     
खुळ्या मिठीत घेवुनी  
गौर पावुले जळात
होती सोडुनिया कुणी
  
काळ्या डोळ्यात दाटले
तेच आदिम काहूर
सुख उर्मीचा फुलला   
तनमनात मोहर   

तेच गेह देह तरी  
ऋतू झालेला फितूर
गंध कस्तुरी चंदन
रोमरोमात मधुर

धुंद सुखाची स्पंदने
हळू घेतांना वेचूनी
भय हातात जपले
नच जावे कि सुटूनी

रूप तेच ध्यानीमनी
वेणुनाद कणोकणी
होय बाधा जीवनाला
प्राण दुसरा होवुनी
  
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in


शनिवार, १ एप्रिल, २०१७

ये सखी




ये सखी

हळूच येवून
डोळे चुकवून
मजला वाकून
बघ सखी ||

जरा वळून
जाई लिहून
दो ओळीतून
मन तुझे ||

मग गालातून
यावे उमलून 
ओठ दुमडून
हसू तुझे ||

जरा थबकून
मान वळवून
त्या बहाण्यातून
थांब सखी ||

शब्द उचलून
नजर झेलून
कुर्बान होवून
जाय कुणी  ||

तुझ्यावाचून
व्यर्थ जीवन
आले उमजून
साऱ्या क्षणा ||

घेई उचलून
हृदय देवून
मजला करून
आपुला तू ||

तुझ्या वाचून
शून्य होवून
जाईल निघून
अथवा मी ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने


शुक्रवार, ३१ मार्च, २०१७

|| सांभाळावे दत्तराया ||





|| सांभाळावे दत्तराया ||

तुवा ठरविले
तैसेचि घडावे
मज सांभाळावे
दत्तराया ।।

जीवन थोरले
सामोरे आलेले
जाणून घेतले
स्वस्थपणे।।

वाहतो मी आता
नेशील तिकडे
सरळ वाकुडे
जैसे तैसे ||

कुणी दुखावले
कुणी सुखावले
कर्मात घडले
काही एक ||

प्रेमाला द्वेषाला
घेतसे झेलून
आलेले चालून
प्राक्तनाने||

विक्रांत भावना
भरून भिजला
करुनी दत्ताला
जिवलग ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने







गुरुवार, ३० मार्च, २०१७

जाणीव




जाणीव

तुझ्या आहेपणाची
देहात पडलेली सावली
घेवून मी जगतो आहे
खरतर मी अजूनही
केवळ मानतो आहे
मी हा तूच आहे
तलावात पडलेल्या
प्रतिबिंबा सारखा
समजा ..

मी नाही मानले ते
तरीही ते प्रतिबिंब
तुझेच असणार नाही का?
आणि जर खरोखच मी
ते प्रतिबिंब नसून
स्वत:ला खुश करण्या करता
केलेला खटाटोप असेल तर ?
आईने दाखवलेल्या
बागुल बुवा सारखा तर ..?

तरीही हे जगणे
तेच राहीन नाही का ?
आणि मी कुणीही नसलेला
तो एक देहधारी सजीव
त्या न दिसणाऱ्या
अमिबा सारखा ..!!

पण मग ही जाणीव
असण्याची..
अन जाणण्याची ..
तिचे मूळ काय आहे ?
जे खुपत असते मनाला
जगण्यातून उसंत मिळताच
व जगण्याची निरर्थकता
कळून येताच...

या अनाहत प्रश्नांचा
मागोवा घेत घेत
मी येतो परत परत
त्या तिथेच
जणू काही मग
मीच तो प्रश्न होतो

आणि वाटू लागते
बहुदा तो प्रश्नच
तुझे रूप असावे
माझ्या मधले !!


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने






बुधवार, २९ मार्च, २०१७

दत्ते लुबाडले





भर संध्याकाळी सूर्य उगवला
चंद्रमा दिसला अमावासी ||
रुतले गुलाब जहरी स्पर्शाने
जाहले जळणे चंदनाने ||
बोलणे मधुर रुतले उरात
सुगंध जळत गेला घ्राणी ||
काळवेळ भान व्यर्थ आकळले
विक्रांत जळले पुन्हा येणे  ||
दत्ते लुबाडून जगणे चोरले  
अर्थ हरवले घोकलेले ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने


मंगळवार, २८ मार्च, २०१७

बाई !!!




सतत होवून घरभर वारे वावरते बाई
थकले तनमन तरी सदैव हसत असते बाई

घर सोडूनी कर्तव्या जरी दूर कधी जाई    
घरा वाचून एकटी कधीच पण नसते बाई

येता प्रलोभने मनमोहक इंद्राची जरी
घर मोडण्यास चंद्रमौळी घाबरते बाई

कधी अवमानित दु:ख दाटली असे धुत्कारली
आत परी ज्वालामुखीच भरली असते बाई

या दुनियेच्या बाजारात कधी विवश जी उभी  
त्या दुनियेसाठीच परी ती आई असते बाई

खचती भिंती वादळात छप्पर उडून जाती
त्या मातीतून पुन:पुन्हा स्वर्ग सजवते बाई

देह स्वर का जरी वेगळा अबला किंचित ती
उर्जा तीच जगताची या विश्व घडवते बाई

आई बहिण मुलगी पत्नी अथवा मैत्रीण की
रे मूढांनो बाई ही केवळ नसते बाई

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
http://kavitesathikavita.blogspot.in 


झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...