बुधवार, १ फेब्रुवारी, २०१७

शब्दांचे आशिर्वाद



तसे तर वाहून गेलेत बरेच शब्द
हातातून मनातून कवितातून
धरून ठेवायचे कारणच नव्हते  
आणि इच्छाही नव्हती
खरतर त्यांच्या वाहण्यानेच  
अर्थ उमलले जात होते
आणि त्याच्या सोबत
उलगडत होतो मी ही मला
शब्द माझा शेवटचा मोह  
हे माहित आहे मला
आणि शब्दांच्या पलीकडे
माझे गंतव्य आहे  
हे ही माहित आहे मला

जगाचे तकलादू व्यवहार सांडून
मनात नाचणारे हे शब्द
ते नसते तर
मी जगूच शकलो नसतो
प्रेमाच्या मर्यादा जाणून चुकलो मी
यशाच्या गोडीला कंटाळलो मी
सत्तेच्या मूर्खपणाला वैतागलो मी
जगण्याचे नाटक वठवत
नात्यातील पसारा सांभाळत
आयुष्य ढकलत चाललो मी
पण केवळ आणि केवळ
या सरळ रेषेला लटकून
रफार मात्रां वेलांटी उकार
यांची सर्कस करणाऱ्या
या शब्दांना धरून

मान्य आहे मला
शब्द निर्जीव असतात
कागदावर उमटलेले
काही आकार असतात
काही लोकांसाठी तर ते
म्हशीचेच रंग असतात

पण मी पाहिलेत इतके रंग
इतके आकार आणि स्वप्ने त्यात
की जणू डुंबलो सुखाच्या सागरात  
त्या खुणा मना पलीकडच्या
त्या कल्पना कुणी करून ठेवलेल्या
त्या अनुभूती विश्वासा न बसणाऱ्या
माझ्या अविभाज्य भाग झाल्या आहेत

आता माझ्या नगण्य अस्तित्वात
मी पाहतो ती संभावना
ती आशा ते साहस ती आकांक्षा
जी करू शकते भेद
या जाणीवेत दडलेल्या आकाशाचा

या शब्दांच्या आशिर्वादामुळेच
मी म्हणून मी आहे  
माझे पणाला अर्थ आहे
काही कारण जगण्याला  
काही जळत राहण्याला..
प्रकाशाचा स्पर्श सोनेरी
होत असतो अंतराला

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in






शनिवार, २८ जानेवारी, २०१७

अखेरचा श्वास माझा




अखेरचा श्वास माझा
सहजी ओंकार व्हावा
प्राण देहाने स्वत:च
हळू मोकळा करावा

सांडून साचले सारे
चित्त रिक्त मुक्त व्हावे
मी माझेपण बांधले
याद काही न राहावे

मिटताच डोळे आत
जग तत्क्षणी तुटावे
जाणीवेच्या सरीतेने
सागरात लीन व्हावे

असो गोड किंवा कटू
बीज मागे न उरावे
मरणाच्या आधी इथे
मी मृत्यूस पांघरावे  

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

शनिवार, २१ जानेवारी, २०१७

भिऊ नको कधी





साखर फुटाने
मावा पेढा राशी
फुलांच्या ढिगात
मन माझे साक्षी

अवघा गोंधळ
धनाचा कल्लोळ
राग लोभ परी
मिटला समूळ

वदे माझे मन
हळूच आतून  
किंवा देवराय
तया संकल्पातून

जळो जन रीत
वृत्तीचा व्यापार
साठव अंतरी
चैतन्य अपार

दोनच दिसाचे
जगणे जगाचे
नाते तुझे माझे
हे जन्मो जन्मीचे

इथे मीच आहे
तिथेही असेन
भिऊ नको कधी
पाठीसी ठाकेन

 डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने


आयुष्य





आयुष्य तुसडा
दु:खाचा तुकडा
भिंतीत उगाच
पडला पोपडा

आयुष्य उत्सुक
सुखाचा सोहळा
होळीत उडाला 
गुलाल धुरळा

आयुष्य विरक्त
मनाचा एकांत
गाभारी पेटली
शांत एक ज्योत

आयुष्य अमाप
विचारांचा कल्ला
लोकल गर्दीत
बुडाला चेहरा

आयुष्य उजाड
जळलेले पान
कोळसा राखेचे 
भेसूर गाणं

आयुष्य आशेचा
इवला अंकुर
काट्यात फुलले 
जीवन सुंदर

आयुष्य आरसा
हरेक मनाचा
बिंब विसरल्या
त्या प्रतिबिंबाचा

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने


गुरुवार, १९ जानेवारी, २०१७

ज्ञानदेवा बापा..




पुढचे ते पाठ
मागचे सपाट
ऐसा आहे थाट
अभ्यासाचा ||

ओळखले शब्द
ठेवले लिहून
मनात अजून
अर्थ नाही ||

नऊशे सहस्त्र
पेटवल्या ज्योती
माझिया वाती
स्पर्श नाही ||

ज्ञानदेवा बापा
करी रे करुणा
अर्थाचा उगाणा
दावी मज ||

पूर्वेच्या राऊळी
होई नारायण
हरू दे अज्ञान
तुझ्यादारी ||

विक्रांत पाषाणा
स्पर्श तो घडावा
जन्म उजळावा
आकलनी ||


http://kavitesathikavita.blogspot.in




बुधवार, १८ जानेवारी, २०१७

दत्ताचा ढोल




करतो वल्गना
भक्तीच्या वाचाळ
रिता मी पोकळ
ढोल जगी ||

दुमदुमे जगी
बसे कानठळ्या
आवेशी आरोळ्या
घुमे स्वरी ||

कळतोय आत
चामड्याचा थाट
वेगळाच हात
सारे करी ||

रोज पिटतोय
रोज वाजतोय
फुटण्याचे भय
सांभाळून ||

वाजता वाजता
झालो दत्तमय
अन्य मागू काय
दिगंबरा ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/


मंगळवार, १७ जानेवारी, २०१७

चंद्र गोंदलेला होता



सांजवेळी अंगणात
शब्द हरवला होता
आभाळाच्या भाळावरी
चंद्र गोंदलेला होता 

पक्षी सारे घरट्यात 
वृक्ष स्तब्ध आपल्यात
मंद वाहणारा वात 
गंध भिनलेला होता 

धूसर त्या प्रकाशात
चंद्र प्रभा नयनात
देवलोकातील सखी 
जीव भारावला होता 

दूरवर ध्यान तिचे
भान जणू शून्य होते 
मृण्मयी आभा बिलोरी
देह चंद्र झाला होता 

दूर कुठे घंटा नाद
दीप मंद कुण्या द्वारी 
नाद ओंकार अजपी
माझिया भिनला होता 

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने

भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...