गुरुवार, १३ ऑक्टोबर, २०१६

मीच एकटी







मीच एकटी झोक्यावरती
केस मोकळे वाऱ्यावरती
आनंदाचा अथांग सागर
मीपण हरवून माझे धूसर
अशी कधीची युगा युगाची
सदैव उषा नव किरणाची
याच्या त्याच्यासाठी नुरले
मी माझ्यातच माझी नटले
माझेपण हे आकाश झाले
माझ्यातच हा प्रकाश उमले
वृक्षवेली अन पानफुले
सखी मी माया मज कळले
मी छाया मी गंध हवेवर
मी रंग मी स्वर समेवर
मी मुक्त या कळीकाळातील
मी जाणीव गूढ चैतन्यातील 

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/

बुधवार, १२ ऑक्टोबर, २०१६

सारे नावावर दत्ता






सहज कंटाळा 
आला जगण्याचा
देह ओढण्याचा 
उगाचच ||
ओढले ताणले 
उगा या मनाला
जणू वितळला 
रबर हा ||
शून्यात निमाली 
सारी हालचाल
शून्याचा महाल 
कोसळला ||
नको येरझार 
नको फेरफार
सारे नावावर 
दत्ता तुझ्या  ||
विक्रांत जाहला 
दिवाळखोर
मोडून व्यापार 
वासनांचा ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/

मंगळवार, ११ ऑक्टोबर, २०१६

तीन ज्ञानी






तीन ज्ञानी
गेले मठात
शब्द घेवून
काही ओठात |
मिटले डोळे
शिरले मौनात
नाद उमटे
मन हृदयात |
झांजा वाजती
खणखणखण
डफ बोलतो
दणदणदण |
अलख अलख
वदल्यावाचून
शब्द येतात  
हृदयी कुठून |
मेघ भारले   
वेधून घेती
चैतन्याच्या   
लाटा फुटती  |
भावभोळा
अर्थ जाणतो
समर्पणाला
साद घालतो |
निरंजनाच्या
पाठी पोटी
उरा उरी अन
झाल्या भेटी |

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/

वीणेकरी

वीणेकरी ******* अपार भरल्या गर्दीत राउळी  उभा वीणेकरी नाद लयी ॥ कुणी पायावरी ठेवीतसे माथा  कुणी काढे वाटा बाजूने तो ॥ त्यास मोजम...