सोमवार, १० ऑक्टोबर, २०१६

ओळीवरून कविता (माझ्या मनाप्रमाणे काहीच होत नाही)








माझ्या मनाप्रमाणे काहीच होत नाही
असे म्हणणे म्हणजे
मूर्खपणा बाकी काही नाही
सारेच मनासारखे कश्याला व्हायला हवे
निवडूंगावर गुलाब का यायला हवे
मी काय असे पुण्य केले
की टाटा बिर्लाच्या घरात डोळे उघडले 
आपण तगर आहोत ना मग वास नाही
म्हणून रडण्यात अर्थ नाही
आपण गरुड नाही म्हणून कधी   
चिमणी उडायचे सोडत नाही
ज्याला असते रडायचे
काम सोडून बसायचे
त्यालाच असतात बहाणे करायचे
रडणे भेकणे सोडून दे
दु:ख वाऱ्यावर सोडून दे
जसे आहे तसे जीवन
मिठीत घेवून जगून घे
शेवटी  हे ध्यानात ठेव
मनाप्रमाणे काहीच होत नाही
असे म्हणतो त्याच्या घरी
सकाळ कधीच होत नाही
जे तुला कधीच नको असते
किंवा नसल्याने काहीही
बिघडणार नसते
ते तुला कधीच मिळत नसते
प्राणातून उमटू दे आकांक्षा
मनातून नको
ती पूर्ण करण्यास
विश्वात्मा बांधील असतो
हे सनातन सत्य आहे

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/





शुक्रवार, ७ ऑक्टोबर, २०१६

हृदयी ठेवी दत्त भगवान





मना करी रे करी ध्यान
हृदयी ठेवी दत्त भगवान ||
मना सांडी रे सांडी व्यथा
जना सांग धन्य गुरुकथा
गुरुचरित्र असे हे तारक
तुटे कोटी जन्म बंधन ||१ ||
मना चाल रे चाल शिखरी
देव दत्त बघ गिरनारी
काय वर्णू तेथची बात
कणकण गर्जे दत्त गाण ||२ ||
मना जाई रे जाई कृष्णातीरी
गुरुपीठ श्री गाणगापूरी
दंड धरून गुरु नृसिंह
भक्ता रक्षी रूपी निर्गुण ||३||
मना थांब रे थांब क्षणभर
प्रेमे आळव दत्त दिगंबर
घडो वा न घडो तप ध्यान
प्रभू येतील रे धावून ||४ ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/




गुरुवार, ६ ऑक्टोबर, २०१६

शून्याची दिवाळी




आता या जन्माचे करायचे काय

दुरावले पाय व्यवहारी ||१

निरर्थक नाटक चाले घडोघडी

उगाच चावडी जीव गोळा ||२

शून्याच्या अंगणी शून्याची रांगोळी

शून्याची दिवाळी दीपासाठी ||३

विक्रांत विटला देही साठवला

होवून वेगळा मजा पाही ||४



डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

http://kavitesathikavita.blogspot.in/

बुधवार, ५ ऑक्टोबर, २०१६

निकी वाट







मातेवीन गर्भ पित्यावीन जन्म
येरे येणजाण अर्थहीन ||
जगाचा पसारा मनात साठला
आला काय गेला कुणा कळे ||
जगताचे मूळ मनच केवळ
कळला पोकळ रंभागर्भ ||
सुखाचा तो सोस दुखातला वास
केवळ आभास चलचित्र ||
मावळता मन जगताचा अंत
पाहतो अनंत आत्मरूप ||
तोच पाहणारा गेला हरवून  
जगणे कळून क्षणगामी ||     
विक्रांता दाविली नीट निर्देशून
दत्ताने येवून वाट निकी ||

  
डॉ विक्रांत प्रभाकर तिकोने
http://Kavitesathikavita.blogspot.in
   

वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...