शनिवार, ३ सप्टेंबर, २०१६

ओळख







माझीच नसे रे
ओळख मजला  
मी अन्य कुणाला
काय सांगू   ||

नाव गावी मज
कुणी डकविले  
कैसे बांधियले
गुण दोषी ||

अरे सांगा मला   
मी कोण आहे
जो व्यर्थची वाहे
नाहीपण ||

भोगात हसतो  
दु:खात रडतो
तयास पाहतो
तो कोण रे ||

निद्रेत जागतो
जाणीव जगतो
विश्वात नांदतो
आहे पणी ||

तो कोण कोण रे
मी कोण कोण रे
ते जाण जाण रे
एकमेव ||


 डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे


शुक्रवार, २ सप्टेंबर, २०१६

दार खुणावते निळे





एक शून्य अंधुकसे
जरा जाणवू लागले
अंतर्बाह्य कोंदाटून
साऱ्या विश्वात भरले

एक नाटक नसले  
दिसू नीटस लागले
खेळ छाया प्रकाशाचे
भय ओळखी लोपले

जाणीवेत आकळले   
बीज उलटे रुजले   
सर्वव्यापी सनातन
नित्य नूतन कोवळे

तेच जुने जरी डोळे
नवे पाहणे हे झाले
पाहणारा प्रियतम
त्या न अजून पाहीले

भरजरी “आहेपण”
दार खुणावते निळे
लेणे जीवनाला नवे
माय गुरुदेवे दिले

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे



बुधवार, ३१ ऑगस्ट, २०१६

दत्ताच्या अंगणी






दत्ताच्या अंगणी लाविले आसन
मांडिले बस्तान हटी तटी ||
आणतो अवसान करितो भांडण
एकटा रडून दावी कधी ||
परी तो कठोर दावितो लाघव
दावी ना ठाव काही केल्या ||
त्याची ती कीर्ती आहे मी ऐकुन
राहतो थांबून म्हणूनिया ||
प्राण गेला तरी जावू दे सुखाने
परी ना सोडणे अंगण हे ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

भय

भय *** किर्र निर्मनुष्य अश्या  जयंती माता जंगलात  मऊ मातीत उमटलेली  ताजी व्याघ्र पावुले  अन् एकटेपणी  चाललेली माझी परिक्रमा . वि...