रविवार, ३ जुलै, २०१६

मोह इवले ढसाळ






मोह
****

मोह इवले ओढाळ
मना वाहूनिया नेते 
नामी रंगलेले चित्त
पुन्हा ढळते मळते

मज कळेना कृपाळा
तुझा डाव हा कसला
घेई क्षणात पोटाला
देसी लोटून दुरला

दिल्या नात्यात जगतो
देह प्रारब्धा वाहतो
जरी सांभाळ म्हणसी
शक्ती तुलाच मागतो

देह शिणला भागला 
काळ थोडाच राहिला
नको मोकलूस आता
ठाव देई रे पदाला

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/

शुक्रवार, १ जुलै, २०१६

नर्मदेचा काठ






नर्मदेचा काठ
तुडवावी वाट
राहावे चालत
जन्मोजन्मी || १ ||
कणोकणी साऱ्या
व्हाव्या गुजगोष्टी  
तरुवेली नाती
दृढवावी || २ ||
चंद्र सूर्य तारे
आकाश सोयरे
कवळावे वारे
भणाणते || ३||
मंदिर मठात
घालावे आसन
करावे साधन
मनसोक्त || ४||
मैयातीरवासी
सखे आप्तजन
उरात बांधून
घ्यावे प्रेम  || ५ ||
काठोकाठ किती
संत भक्तजन
तयांचे चरण
वंदावे मी || ६ ||
अंती प्रवाहात
जावे हरवून
जीवन संपून  
तिच्यातीरी  || ७ ||
दत्ता दयाघना
पुरवावी आर्ती
विक्रांतची माती
धन्य व्हावी || ८ ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/









सोमवार, २७ जून, २०१६

बातम्या..





वार्ता असतात साऱ्या
व्यर्थ कुटाळाच्या बाता
चांग क्वचित तयात
बाकी गाढवाच्या लाथा

कुणी देऊनिया दाम
बातमी हवी ती छापे
कुणी उकरून मढे
मेद सडलेले ओपे

कधी फुटती बातम्या
कधी फाटती बातम्या
वाट लावाया कुणाची
कधी बनती बातम्या

बातमी असते मस्त
चटका मसाले दार
लक्ष्य वेधावया जना
आणि खपाया पेपर

खरे इवले टाकून
बने गोलमाल गोळा
शब्द वाकवून अर्थ
नवा तयार केलेला

धंदा चालला कुणाचा
मेंदू पडला गहाण
काल वाचलेले हेच
जसे फेकलेले शेण

पत्र विकायला हवे
चॅनल चालाया आणी
निंदा नालस्ती स्तुतीनी
जन घ्यायचे ओढूनी

किती मळला आरसा
भान दावणाऱ्या नाही
सत्य निष्ठेचा विचार
खिसा भरणाऱ्या नाही

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/




रूप ज्ञानदेव

रूप ज्ञानदेव  ********* रूप ज्ञानदेव घेऊनिया आले  आळंदी बैसले पांडुरंग ॥ देवभक्त रूपे करतो सोहळा  द्वैताचा आगळा प्रेममय  देव स्व...