मंगळवार, २२ डिसेंबर, २०१५

माझी उदास भाकरी ..







तुच दावतोस खुणा
मज कळूनी कळेना
चिंब बरसतो घन
खोल अंतर भिजेना

लाख वाचूनिया शब्द
काय लिहिले कळेना
अर्थ दिसतो सरळ  
नीट दुसरा वळेना  

तशी तर हिच असे
वाट काल सुटलेली
नवा सोस नवी हौस
डोळे पुन्हा बांधलेली

नवा डोह नवा मोह
जळी काळी थरथर
पथ उतार बेफान
किती घालवा आवर

कसा जाणायचा असा   
स्मृती विस्मृती गुंता  
गुंगी तशीच निजता
स्वप्न तसेच उठता

नग्न अंतरी बाहेरी
उगा हिंडतोस दारी
माझी उदास भाकरी
जळे रोज चुलीवरी

 विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

रविवार, २० डिसेंबर, २०१५

दत्ता तुज ध्यातो






दत्ता तुज ध्यातो | दत्ता तुज गातो |
आणिक रंगतो  | भक्तीमध्ये ||१||
तूच अंतरात | शांतीरूप ज्योत |
असे पाजळत | सर्वकाळ ||२||
अंधार वासना | झडपता मना |
तुझीच करुणा | सांभाळिते ||३||
पातलो दयाळा | तुझिया पदाला |
अन्य या विप्राला | काही नको ||४||

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

गुरुवार, १७ डिसेंबर, २०१५

जीव तुझ्यात आहे





अजूनही आभाळ हे थोडेसे धुरकट आहे
कालचे उद्यावर नि जरासे सावट आहे

फेकायचे होतेच ओझे वस्त्राचे या खरेतर
मनावर लाजेचे पण आवरण चिवट आहे

साहिले अपमान लाख लाखदा परतलो ही
काय करू डोळे तुझे बोलणे लाघट आहे

धुंडाळतो चेहरा माझा फुटक्या काचेत या
लाख रूपे तुझीच ग मला कवटाळत आहे

पुनःपुन्हा होईल विध्द जाईलही प्राण हा  
सुखी परी किती आता जीव तुझ्यात आहे

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

सोमवार, १४ डिसेंबर, २०१५

स्वर झाला ओला





चंद्र हवा का ग तूजला  म्हटलो मी जेव्हा 
डोळ्यातून तिच्या एक ओघळला काजवा 
अन तलखी  मिटुनी मग  साऱ्या जागरणांची 
गालावरती झाली नवी नक्षीच काजळाची 

विझले होते कधीच निखारे आणि तरी तरीही 
उब हवीशी फुलू  लागली पुन्हा ओढाळ देही 
अलख अलख रे शब्द कोवळे कानी रुणझुणले 
अन दिशांचे वस्त्र सोवळे मग तेही ओघळले 

एक हिमालय शुष्क शुभ्र  पुन्हा मनी  गोठला 
निर्झर नक्षी कातळावर तो नाद जणू मिनला 
काय घडले कुणास ठावे वेळूत धावला वारा 
अन श्वासातून सूर उमटून स्वर झाला ओला 



विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

रविवार, १३ डिसेंबर, २०१५

निर्भत्सना आणि वासना






भोगी मनाची निर्भत्सना
होवूनही भोगी मन
उभे राहते लाळ गाळत
जिव्हा लोलुप श्वानागत
त्याच दारात
कधी शब्दांचे फटके
हाड हाड होणे
कधी भिरकावल्या दगडाने
जीव कळवणे
जणू प्राक्तन भोगणे
अटळपणे
मग प्रक्षुब्ध अपमानाने
शपथ घेवून जाणे  
पण रक्तात पसरताच
उपभोगाचे रसायन
भारावलेल्या मंत्राचळागत
पुन्हा येवून थांबणे
त्याच दारात 
पुनःपुन्हा
मारूनही मन मारत नाही
सांगूनही मन ऐकत नाही
देवूनही पोट भरत नाही
जन्मोजन्मीची वासना


विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...