सोमवार, ५ ऑक्टोबर, २०१५

दत्तात्रेय





दत्तात्रेय माता दत्तात्रेय पिता
दत्तात्रेय भ्राता जिवलग
दत्तात्रेय दाता दत्तात्रेय त्राता
दत्तात्रेय सत्ता माझ्यावरी

सुखाचा सागर मायेचे आगर
जगण्या आधार दत्तात्रेय  
अलोट कृपाळू अत्यंत दयाळू
पापीया सांभाळू करी देव

स्मरणा भुकेला जीव दे जीवाला
जागतो प्रेमाला खऱ्याखुऱ्या
धर्म वर्ण याती नसे तयास ती
जाणतसे रिती भक्तीचीच

आनंद कारक आपदी रक्षक
विश्वाचा नायक हरिहर
नाट्य सूत्रधार लीला भ्रमकार
काळ चक्राकार चालविता

जरी मायातीत खेळतो मायेत
मुक्ती बंधनात क्रीडा करी
थेंब पाणियाचा अंश सागराचा
तैसा हा तयाचा खेळ चाले   

तयाच्या प्रेमाने सजले जगणे
प्रेमाचे चांदणे रोमरोमी
आता हे मागणे नुरावे मागणे
काही देणे घेणे तयावीण  

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

रविवार, ४ ऑक्टोबर, २०१५

ट्राफिक कंट्रोल (एक दृष्य)






कुठला मंत्री जाणार इथून
हायवे पोलीस बसले सजून
फ्लायओव्हरच्या दो बाजूस 
हातामध्ये काठ्या परजून

उगा वाढले पोट आपले
पट्ट्यामध्ये घट्ट बांधून
लाल मोठ्या नजरेनी नि
देती सिग्नल शब्दांवाचून

ओहोहो मोठा साहेब तो
कधी काळी आला दिसून
काळा गॉगल डोळ्यावरती  
इस्त्री मारली चेहऱ्यावरून

साळसूद गाड्या लाईनीत
उगाच आवाज केल्यावाचून
गुमानपणे नि जात होत्या   
उगा नको कटकट म्हणून

आणि कुणी सिग्नल अडले
चरफडलेले मनात दाटून
मुकाट बसले तोंड दाबून
आत कुणावर काही खेकसून  

मग रस्त्याचे मालक ते
गेले मिरवत रस्त्यावरून
लाल पिवळे लाईट फेकत  
सगळ्यांचीच सुटका करून   

अन त्या गाड्या गेल्यावर
क्षणात हॉर्न गेले दणाणून
पुन्हा पथावर त्या वर्दळली
गर्दी रोजची शिस्तीवाचून 


विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

शुक्रवार, २ ऑक्टोबर, २०१५

रीस्टोर फोटो








रिसायकल बिन मधील तुझे फोटो
मी पुन्हा रीस्टोर केले .
तसे ही ते पुसले जाणार नाहीच
मग राहू दे म्हटले
ती तू तेव्हाची मनात घर केलेली
माझे सर्वस्व झालेली
पुन्हा पाहतांना तुला माझा श्वास अडकला
कालौघी विचार थांबला
अन तेव्हा अचानक कळून चुकले मला  
दुखते जखम तरी सुखावते  
आता तुला मुद्दाम विसरायची तशी
काहीच गरज नव्हती
अस्तित्वाचा माझ्या एक तू
अविभाज्य भाग झाली होतीस
तू तशी नाहीस खरतर
तू तशी नव्हतीस
पण मनी सजली प्रतिमा झालीस
अदभूत अचानक झाला भास अन
एक कविता उमलून गेलीस    

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/




  





  

अटळ

अटळ **** गिरनारी मूर्ती फुटली गोरक्षाची  ती कृती भ्याड नामर्द रात्रीची  अफगाणी मूर्ती फुटली गौतमाची  ती कृती उद्दाम  द्वाड दिवसा...