शुक्रवार, १० जुलै, २०१५

माझा डोळा तुझ्यावर






माझा डोळा तुझ्यावर
तुझा डोळा दत्तूवर
दत्तू मरे पुष्पावर
पुष्पा काळ्या रघुवर

रघु लतापायी वेडा
लता माझ्या मागावर 
असे कसे विचित्रसे
चाले प्रीतीचे हे चक्र

आणि मग कधीतरी
कुठल्याश्या दगडावर
गाडी कोलमडणार  
सारे जग हसणार

मन का आसक्त होते
दूरच्याच चंद्रावर
मना का हवे असते
सुख उसने उधार

कुणासाठी वेडे असे
कालचे स्वप्न लाचार
रोज बसे रोज उठे
शोध सुखाचा बाजार

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

मंगळवार, ७ जुलै, २०१५

दे सखी तुझे प्रकाशाचे हात







जमले तर दे सखी
तुझे प्रकाशाचे हात
जमले तर दे मज
या वळणावर साथ

असे कुणास ठावूक
किती चालने अजून  
कधी कळले कुणास 
मार्ग जाईल संपून

कुण्या जन्माचे देणे
हाका मारते अजून
कुण्या जन्माचे नाते  
हक्क सांगते अडून

क्षण हरेक जगतो
तुज डोळ्यात माळतो
हाका मारुनिया मूक
शब्द कोषात ठेवतो

पायी शृंखला कुणाच्या
मन धावते माघारी
आशा वेडगळ तीच
बोल बोलते अंतरी

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

 

सोमवार, ६ जुलै, २०१५

मृत्यू इयत्ता नववीतला ...





काल अचानक पाहिला मी
मृत्यू इयत्ता नववीतला
खेळता खेळता दारामध्ये  
डाव अखेरचा संपलेला

रोगराई नव्हती कुठली
नव्हता अपघात वा झाला
हसता हसता धावता धावता
होता तो खाली कोसळला

कणखर काटक देह त्याचा
आणि निरागस चेहरा
माती लागली हाता गाला
अंगावरती घाम सुकला

एक विच्छिन्न आक्रोश
साऱ्या रुग्णालयात दाटला
एकमेकांच्या मिठीत रडत    
त्याच्या मायबापांनी केलेला

आग हृदयी पाहणाऱ्याच्या  
डोळ्यात सागर दाटलेला
का ? कश्याने ?या वयात?
प्रश्न साऱ्यास पडलेला

काय कुणा सांगावे मी
अर्थ नव्हता जरतर ला
ट्रॉलीवर तो अलगदपणे
जणू आताच निजलेला   

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

महफ़िल

महफ़िल  ******* यारों के दिलदारों के टीकट आ रहे हैं ।   महफ़िलों के रंग सूने हो रहे हैं । तुम किस सुबह का इंतजार कर रहे हो?  ...