शुक्रवार, ८ मे, २०१५

मी मात्र भरुन पावलो...






तुझे माहित नाही मला
मी मात्र भरुन पावलो
तुझी प्रीत लाभल्याविन   
बघ प्रेमाने समृध्द झालो

असे मात्र मुळीच नाही
कि जखमा झाल्याच नाही
रात्र रात्र जागुन रडलो
तुझ्यासाठी सखये मी ही

ते सुखाचे शुभ्र उमाळे
अन विरहाच्या आर्त रात्री
जगलो जगलो सखी मी ग
जीवन जाणले काहीतरी

खरोखर  प्रीत शिकवते
अद्भुत अगम्य जगायला  
आपल्याला हळूच कळते
अंतरात अन उमलायला

तसा तर तुझ्यासाठी मी  
उभा पायी जन्म अंथरूनी
पण तू ना आली म्हणूनी
जाणार नाही कधी जळूनी

अमृत स्पर्श होता एकदा
मृत्यू का येणार कुणाला
अर्थ प्रीतीमधला कळता
रूप सुवर्ण ये लोहाला

विक्रांत प्रभाकर

बुधवार, ६ मे, २०१५

शूल घुसे काळजात






अश्या विझल्या डोळ्यांनी  
थंड थिजल्या शब्दात
नको नको बोलू सखी
शूल घुसे काळजात

मिटले हे हसू तुझे
सांग कुणाच्या बोलांनी
का तुला खुपले माझे
जाणे शब्द उधळूनी

नाही कसे म्हणू तुला
जीव जडे तुजवर
पतंगा हाती नसते
झेपावणे दिव्यावर

कसे समजावू तुज
दावू भाव उघडून
सर्वस्व तुला वाहून
गेलो भणंग होवून

मरू मरू जातोय मी  
प्रेम तुझे संजीवनी
रागावता तुच अशी
उरणार ना कहाणी

विक्रांत प्रभाकर


मंगळवार, ५ मे, २०१५

मी तुझ्या वॉलवरून







येतो
थबकतो
जातो
मी तुझ्या वॉलवरून
लिहितो
वाचतो
टाकतो  
मग ते पुन्हा पुसून
जाणतो
मानतो
पाहतो
हा खुळेपणा ये घडून  
पाहणे  
वाचणे
कळणे
राहते घडल्या वाचून
असणे
नसणे
जगणे
हे व्यर्थ तुझ्या वाचून
येशील
पाहशील
जाशील
तू काही कळल्या वाचून
काहीतरी
कसेतरी
कुणीतरी
जाईल तुजला सांगून
आलेले
गेलेले
व्याकुळले
कुणाचे नादान मन

विक्रांत प्रभाकर

रविवार, ३ मे, २०१५

बरे झाले डान्स बार ...






बरे झाले डान्स बार पुन्हा सुरु झाले
कुठेतरी नाच नाचुनि घर चालू लागले

तशी तर इथे येती कितीतरी माणसे ही
शोधूनही सापडतो न त्यात माणूस एकही

पण तसे असुनी काहीसुद्धा बिघडत नाही  
उधळल्या दौलतीला कमीपणा येत नाही

असा काय तसा पैसा बाजार विचारत नाही
डाळ गहू तेल रॉकेल दर कमी होत नाही

वाजो गाणे कुठलेही असो भाषा कुठलीही
थिरकते देह तया अन्य काही दिसत नाही

वस्त्रातून घुसणारे हावरट कामुक डोळे
बघूनही न बघता मी पैशावरी ठेवी डोळे

ओंगळ ते घाण हात लोचटच स्पर्श जरी
तरी खोटे हसुनी मी लटकाच राग धरी

घर दार मुले बाळे मला हवे आहे सारे
तयाआधी देहा पण जगवाया हवे खरे

  विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/



रिक्तत्ता

रिक्तत्ता ******* क्षणा क्षणाने कळल्या वाचूनी आयुष्य येते ऋतू घेवूनी  हसवून रडवून चोरपावलांनी रंग खेळूनी जाते उलटुनी  काय कमावल...