गुरुवार, २० फेब्रुवारी, २०१४

दु:ख सालं येतं कुठून





प्रेमात पडून
लग्न करून
दु:ख सालं
येतं कुठून  ||

तीस शोधून
नीट बघून
चुकलं कुठ
न ये कळून ||
पथ्य पाळून
व्रत घेवून
काय झालं
भलं वागून||
ती    माझी
मी न तिचा
तरीही चाले
रथ रवीचा ||
नशिबं असती
सारे म्हणती
कळून चुकलं
शेवटी शेवटी ||

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/






रात्र (नर्मदाकाठच्या कविता)


प्रकाश स्निग्ध निशब्द रात्र
आनंद विभोर गात्र गात्र
मृदुल मंद शीतल स्पर्श
कणाकणात दाटला हर्ष
अनासक्त मी होऊन धुंद
सारे सोडून संस्कार बंध
कधी कधी ये निशा अशी ही
मंद श्वास नि हृदय स्पंद ही


विक्रांत प्रभाकर

http://kavitesathikavita.blogspot.in/

 

प्रेम फजिती




मी तिच्या बॅगेत एकदा हळूच फुल ठेवले
पण तिने हसून राजूलाच थॅन्क्स म्हटले
मी तिच्याशी रस्त्यात बोलण्याचा यत्न केला
सरातर्फे तिने माझा पार बाजा वाजवला   
मी तिला पाहण्यास तीन मैल चालून गेलो
कुत्रांच्या तावडीतून जीव वाचवून आलो
ठोकर खावून रस्तात खाड्यात पडून पडलो  
पळपुटा सैनिक होत महायुद्ध हरून आलो
वर्गात तिला सतत पाहतसे डोळा भरून
भाऊ तिचा म्हणाला टाकीन डोळे फोडून
नाद खुळा माझा तरीही कमी नाही झाला
तक्रार येता घरी मग बापाने कचरा केला
शाळेमध्ये जावून हेच धंदे करतोस काय
शिव्यालाथाबुक्के नका विचारू झाले काय

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

बुधवार, १९ फेब्रुवारी, २०१४

वार्डबॉय मारुती...


कामाला वाघ असलेला
वार्डबॉय मारुती गेला
एका वर्षात क्षयाने झिजून
संपूर्ण क्यॅजूल्टीचा तंबू
आपल्या खांद्यावर वाहणारा
आपल नाव सार्थ करणारा ..

कुणी असो वा नसो बरोबरीला
विना तक्रार ड्रेसिंग करणारा 
कॉल नेणारा पेशंट आणणारा
स्टीकिंग कापणारा प्लास्टर लावणारा
रात्री बाराला सगळ्यांसाठी
गरम गरम चहा बनवणारा
सहा फुट मध्यम देहाचा
कठोर चेहरा प्रेमळ मनाचा
सद्गृहस्थ पंनाशीचा ..

कधी काम संपल्यावर
येवून बसे लांब स्टूलवर
आणि आपल्या हुशार मुलीचे
कौतुक सांगे वारंवार
लोक म्हणायचे ,
अगोदर तो व्यसन करून
वाया गेला होता म्हणून
आता ही कधी रुग्णाकडून
घेतो चिरीमिरी म्हणून 
पण त्याच्या वागण्यात
बोलण्यात अन काम करण्यात
कधीही लबाडी न आली दिसून..

क्षय झाल्यावर काही दिवस
उपचार घेता असतांना 
तो काम करीत होता
आणि दिवस भरीत होता
पण कामाशिवाय बसलेला
उदास चेहऱ्याचा वाळल्या देहाचा
मारुती बघणे म्हणजे
शिक्षाच होती साऱ्यांना
कुठल्याही उपचाराला दाद न देणारा
असाध्य असा एम.डी.आर .
आला होता त्याच्या वाट्याला 

शेवटचे तीन महिने तर
मारुती हॉस्पिटलच्याच होता
एका खाटेला खिळलेला
रोज दिसायचा नमस्कार करायचा
मिळालेल्या टोंकिनच्या बाटल्या
आणि व्हिटामिनच्या गोळ्या
मी त्याला द्यायचो कारण
बाकी काहीच करत येत नव्हते.. 

एक दिवस संतोष वार्ड बॉय
गेला मला सांगून
मारुती सिरिअस झाला म्हणून
त्याला ऑक्सिजन वर ठेवलाय पण ..
तेव्हा इच्छा असूनही
मी वार्डमध्ये गेलो नाही
मारुतीचा अटळ मृत्यू
मला पाहायचा नव्हता
मारुती मनामध्ये
जिवंत ठेवायचा होता
पण सारे सोपस्कर होवून
मारुतीचे डेथ सर्टिफिकेट
शेवटी आले माझ्याचसमोर 
मी सही करावी म्हणून

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

  

सोमवार, १७ फेब्रुवारी, २०१४

सियाराम बाबा (नर्मदाकाठच्या कविता)


 

शंभरीच्या आसपास
वृद्ध बालक वाकला
आल्यागेल्या पथिकाच्या
सेवेत आहे रमला

गादीविना कुठल्याही
विनाशिष्य अधिकारी
मुक्त विरक्त विदेही
अवधूत निरंकारी

जसा पुराण पिंपळ
पारावरी विसावला
विस्तीर्ण प्रवाह साक्षी
काळवेळ विसरला

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

रविवार, १६ फेब्रुवारी, २०१४

ब्रह्मगिरी पायथ्याशी


ब्रह्मगिरी पायथ्याशी   
धन्य तीर्थी कुशावर्ती
जागा अजुनी निवृती
दान देण्यास भक्ती

कोण कालसर्प यजी  
कोण नागबली करी
रत्नं देतोय निवृती
माती जमवती सारी

त्यांच्या कृपा कटाक्षाने
पार जीवन मरणे
उगा तरीही भितीने
घर कुणाचे भरणे

येता कैवल्य जीवनी
दिली झुगारूनी कुडी
त्यांच्या समोर किती      
दीन लाचार बापुडी

डॉ विक्रांत प्रभाकरतिकोणे 
http://kavitesathikavita.blogspot.in/

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...