गुरुवार, ९ जानेवारी, २०१४

प्रवास (नर्मदाकाठच्या कविता )









सर्वदूर केवळ
पाण्याची खळखळ
अन पायाखाली
पाचोळ्याची सळसळ  
कुणीही नाही
आजूबाजूला
अथवा कुणाची
चाहूल कानाला
किती चालायचे
माहित नाही
किती चाललोय
माहित नाही
मनाला त्याची
मुळी शुध्दच  
उरली नाही
पोहोचणे किंवा
न पोहोचणे यास
जणू आता
काही अर्थच
उरला नाही
अस्तित्वाच्या
कणाकणात
विरघळलेली
तुझी साथ
श्वासाच्या
अंतापर्यंत
हवी हवीशी
वाटणारी ..
थबकली पावुले
वाटले मनास
इथेच हा पथ
संपावा प्रवास

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/



मंगळवार, ७ जानेवारी, २०१४

आई (नर्मदाकाठच्या कविता )




तुझ्या पाण्यावर तरंगणारी
छोट्या छोट्या दिव्यांची रांग
त्या तेजाने उजळलेले तुझे रूप
पाहता पाहता मला
माझी आई आठवली
देवा समोर डोळे मिटलेली
तशीच सात्विक उजळ
माझा जीवनाधार असलेली
अन जाणवले
ती तूच होतीस तिथे
ती तूच आहेस इथे

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

शनिवार, ४ जानेवारी, २०१४

एक पहाट (नर्मदाकाठच्या कविता )






मैया काठी आत खोलवर  
गूढ एकांती शांत गंभीर

भल्या पहाटे पिठूर चांदण्यात
दोन माता गार गोट्यांत

बसल्या होत्या पूजा करीत
निर्भय धीर शांत आश्वस्त  

चार दिवे त्यांनी सोडले
हळूच लहरत जवळ आले

गार बोचरा वारा आणि
दुधाळ पाणी खळखळ गाणी

उष्ण अश्या प्रेमळ प्रवाही
देहास सोडून दिले मीही 

मी मैया त्या चार ज्योती
चंद्रप्रभा अन पाण्यावरती

कितीवेळ मग माहित नाही
चंद्र उतरला माझ्या देही

कुठे असे मी वाहून गेलो  
कोण असे मी पाणी झालो  

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

शुक्रवार, ३ जानेवारी, २०१४

घाटावरचा नावाडी (नर्मदाकाठच्या कविता )






घाटावरचा नावाडी
होता नाव वल्हवित
नेक धंदा पिढीजात
आपला प्रेमे करीत

डोळ्यामध्ये पण त्याच्या
उद्याचे काहूर होते
गाव आणि घाट त्याचे
बुडून जाणार होते

बाप आजा पणजोबा
या  घाटावर जगले
मी भाऊ अन ताईनी
इथेच जग जाणले     

दुजे काम करू काही
पोटाची या चिंता नाही
माईची पण साथ ही
आता मिळणार नाही

उदास स्वरात त्याच्या
विरहाची आग होती
नाळ तुटल्या इवल्या
अर्भकाची हाक होती

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/





बुधवार, १ जानेवारी, २०१४

साधू (नर्मदाकाठच्या कविता )


राकट चेहऱ्याचा
जटाभार वाढलेला
विडीच्या धुरात
सदैव गुरफटला
चाळीशीतील साधू
गावाचा बापू
होता भल्या मोठ्या
आश्रमाचे आधारस्थान
बसला होता भर थंडीत
झाडाखाली अंधारात
एका बांधल्या धुनीपाशी
उघड्या अंगावर घोंगडे ओढून
जणू त्याचे काहीच नव्हते
सारे काही असून

सभोवताली जमलेले
भक्त काही चेले
प्रापंचिक प्रश्नांचे
गाठोडे घेवून आलेले
त्या प्रश्नांना व्यवहारिक उत्तर
मिळत होती गप्पातून
त्याच्या कथा चमत्काराच्या
भुते घालवून दिल्याच्या
खोट्या आहेत म्हटला
गाववाले उगाचच 
बोलतात काही वदला
हे तर प्रारब्धाने
लिहिले असे काही
माझे दानापाणी 
वाढून ठेवले इथे काही
म्हणून राहिलो 
बाकी कश्यात तथ्य नाही.

आणि तरीही रात्र झाल्यावर
हातात घेवून बँटरी
जावून आला तो मठ देऊळ
वर बांधल्या घाटावरी 
निजलेले परिक्रमावासी पाहून
जागे असलेल्यांची
विचारपूस करून
हवे नको विचारून
आणि पुन्हा येवून 
धुनी जवळ
बसला आपली घोंगडी पांघरून 

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

रिक्तत्ता

रिक्तत्ता ******* क्षणा क्षणाने कळल्या वाचूनी आयुष्य येते ऋतू घेवूनी  हसवून रडवून चोरपावलांनी रंग खेळूनी जाते उलटुनी  काय कमावल...