रविवार, १० नोव्हेंबर, २०१३

फुटपाथवर



कष्टणारे हात
शिणून जातात
रात्री फुटपाथवर
विश्राम शोधतात

अर्धी भूक 
तशीच पोटात
पाय आखडत
भूवर निजतात

कांक्रीटच्या या
बकाल शहरात
ओल्या कुठल्या
सांधी कोपऱ्यात

अस्तित्व स्वत:चे
हरवून जातात
टोचतात हाडे
कूस बदलतात

जगण्याच्या शोधात
पोटाच्या वणव्यात
उठून  सैरावैरा
धावत सुटतात

कुणी आपले
लक्ष्य हरवतात 
पायाखाली कुणी
तुडवले जातात

जीवनाशी सारे
पैजा मारतात
रोज  तोच पण
जुगार हरतात

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

http://kavitesathikavita.blogspot.in/

शनिवार, ९ नोव्हेंबर, २०१३

काळोखभिलाषा




त्या तुझ्या वचनामुळे
अजून आहे जगतो
अन्यथा जमा काळोखी 
केव्हाच झालो असतो

अजूनही काळोख तो
आहे मज खुणावतो
शांत काळा खोल डोह
जीवास भूल घालतो

पोटासाठी देह जरी 
फरफटत ओढतो
खिळखिळलीय नाती
तरीही बळे जगतो

येई आता तूच माझा
काळोख प्रिय होवून
जगण्या मरण्यातला
भेद जावू दे मिटून

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

शुक्रवार, ८ नोव्हेंबर, २०१३

कोबीची भाजी



जेव्हा तुमच्या ताटात वा डब्यात
नियमित पणे दिसू लागते
कोबीची भाजी
समजायचे की
आता तुमची वेळ आलीय
वानप्रस्थानाची

जास्त काही बोलायाचे नाही
दटावून काही मागायचे नाही
आपणच आपल्या जिभेला
उगा शांत करायचे
पोट भरलंय ना तेवढेच पाहायचे
भाजी शिळी होते
तसे प्रेम हि शिळे होते
गरज संपली की
गरजेचे माणूसही नकोसे होते

नकोपणाच्या काठावर
जेव्हा आपले आयुष्य
येवून ठेपते
कोबीच्या खुणांनी सारे
समजून घ्यायचे असते

कोबीसारखे एक एक
आवरण मग
हलकेच सोडायचे असते
शेवटी जे काही उरते
तेवढेच फक्त
आपले असते
एवढच आपण
जाणून घ्यायचे असते
कोबीची भाजी तर
केवळ निमित्त असते

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/




गुरुवार, ७ नोव्हेंबर, २०१३

मृत्यू स्वप्न...



जेव्हा मी घेईन
माझा  शेवटचा श्वास
तेव्हा मी नसावा
कुठल्या आय.सी .यु.त
छताकडे बघत
ऑक्सिजनच्या नळ्यामध्ये 
धापा टाकत
थेंब थेंबाने देहात
उतरणाऱ्या सलाईनला
असहायतेने पाहत

मृत्यू असावा स्पष्ट
डोळ्यांना दिसणारा
आणि मी त्याचा
स्वीकार केलेला
तेव्हा माझ्या डोळ्यासमोर
असावे निळे आकाश
सभोवताली पसरलेली
हिरवीगार झाडी
पाखरांचा कलकलाट
अन जवळच वाहणाऱ्या
नर्मेदेचा खळखळाट
तृप्त मनाने तृप्त देहाचा
ऐकत शेवटचा हुंकार
मी विरघळून जावा 
त्या विशाल दृश्यात
तिथलाच एक
अंश होवून
जीवनाकडे माझे हे
शेवटचे मागणे 

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१३

गणवेशात तो.. ती..अन..





तो ..
नजर चोरटी एक बोलकी
वर्दी मधली नवीन खाकी
किंचित काळी अन कोवळी
ओठावरली  मिशी  कोरली 
बूट दांडगे पायी असूनी
मुद्रा परी ती लोभसवाणी
रंग रांगडा उन्ही तापला
बोल गावाच्या माती मधला
ती...
सख्या सवे ती पुढे चालली
खूप शहरी जग पाहिली
वक्र भुवया केस कापली
उन्हात आली ताम्र झळाळी
गणवेशात हि रूप गर्विता
नजर बंदी  कुणी पाहता
नाकासमोर पाहत गेली
साऱ्या दृष्या सरावलेली
मी..
काय तयात प्रेम फुलेल ?
ठरले तिचे  लग्न असेल ?
कुणा ठाऊक काय घडेल ?
किंवा माझा हा भ्रम असेल !
पण  त्याचे चोरून  पाहणे
उगा उगाच  अवघडणे
सारे  जणू की  ओळखीचे ते 
कि माझे  मला  पाहणे होते

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

सोमवार, ४ नोव्हेंबर, २०१३

अॅबोरशन नंतर....




ते लुकलुकणारे हृद्य
सोनोग्राफीच्या पडद्यावर
हीच तुझी माझी
पहिली अन शेवटची भेट

त्यानंतर ,
प्रश्नांची मालिका
प्रचंड दडपण
मानसिक ताण ..
करावे न करावे
उठलेले वावटळ

आणि शेवटी
घेतलेला निर्णय
नाही ! नकोच !!

अॅडमिशन मग
डॉक्टरांनी उरकलेला
सोपस्कर
देहाचे यंत्र
ताब्यात देवून त्यांच्या
खरडून टाकला
नको असलेला अंकुर

एवढ अपराधी
आयुष्यात कधीही
वाटल नव्हत मला 
तू मुलगा आहेस कि मुलगी
माहित नव्हत ! खरच !
ते कारण हि नव्हत
तुला त्यागण्याच
अनेक परिणाम टाळणारा
तो एक कटू निर्णय होता
असहायपणे घेतलेला
खरच सांगते
प्रथमच देहाची
देहातील कामोर्मीची
लाज वाटू लागली
त्याचा स्पर्श हि
नको वाटू लागला
तेव्हा पासून

उलटणारे महिने
कॅलेन्डेर वरील खुणा
तू नसूनही तुझी वाढ
मला सांगत होते 
आणि माझ्या
रित्या ओटी पोटीत
मीच रोज मरत होते 


विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/



 

रविवार, ३ नोव्हेंबर, २०१३

सोडुनिया घर जावू पाहता



अक्कलकोटचा
घेवून वारा
गेलो पंढरपुरा
तिथे बसता लाथा
आलो पुन्हा घरा
आता जाऊ वर
चढू गिरनार
सोडुनिया घर
व्हावे दिगंबर
म्हणून पक्के
केले प्रस्थान
काढले शोधून
पोलीसान
फासायला तोंडा
मिळेना राख
नग्न होता बळे
मारितात जन
टाकती समोर
शिजलेले अन्न
म्हणती राहा
आता गुमान
पळणे कठीण
जगणे कठीण
उरलो विनोदी
पात्र होवून

विक्रांत प्रभाकर
kavitesathikavita.blogspot.in

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...