शुक्रवार, १ नोव्हेंबर, २०१३

साधन




करावे साधन |  काय मी ते आता |
तोच करविता | मायबाप ||१
माझे हाती फक्त | बैसने आसनी
कृपा सौदामिनी | करे  सारे ||२
केली धावाधाव | अनंत उपाय |
नच झाली सोय  |कधी कुठे ||३
तया त्या कष्टाचे | होऊनिया  चीज |
पावली ती मज | जगदंबा ||४
असे गुरुराव | कृपा शक्ती दाता |
सनाथ अनाथा | केले झणी||५
जन्मो जन्मी पुण्य | केले संपादन |
त्याचे वरदान | लाभियाले ||६

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


नव्वद टक्के जळलेली


नव्वद टक्के जळलेली
तरीही ती जिवंत होती
जळलेल्या नसा सोबत
वेदनाही जळली होती
पूर्ण शुद्धीत सारे ओळखीत
करीत होती विनंती
डॉक्टर मी वाचेल ना  हो ?
घरी पुन्हा जाईल ना  हो ?
जीव नसलेला एक होकार
डॉक्टर देत होते
व्हेने  सेक्शन  केथेटर
यांत्रिकपणे होत होते
जीवघेणे आर्जव तिच्या प्रश्नातले
सारी यांत्रिकता खरवडत होते

विक्रांत प्रभाकर
kavitesathikavita.blogspot.in

गुरुवार, ३१ ऑक्टोबर, २०१३

वेश्या (अनुवादित)


(मूळ इंगजी कवी मला माहित नाही ,कुठेतरी कागदावर दिसलेली हि कविता .खूप आवडली अन अनुवाद केला. )

बंदिवान ती प्रारब्धात
पाच फुटी दुबळ्या देहात
देह भोगी पिळवटलेली
दु:ख वेदनेत सापडलेली
समाजाने तिरस्कारलेली
आणि तरीही वापरलेली
तिजला वेश्या म्हणती ते
जरी नसे नाव तिचे ते


अनुवाद विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

प्राणाच्या पाचोळ्यात



प्राणाच्या पाचोळ्यात
भिर भिरणारी हवा आहे मी |
दवाच्या  उतरंडीवर
भिजणारी ओल आहे मी |
हाती  न  सापडणारा
फुटका पारा  आहे मी |
पाण्या मध्ये सोडलेला
थोडासा रंग आहे मी |
माझ्या मध्ये माझ्याहून
कुणी वेगळा आहे मी |


 विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

शुक्रवार, २५ ऑक्टोबर, २०१३

ते तुझे पाहणे




बघुनी मला एकदा
हसलीस जाता जाता
तेव्हा माझ्या कवितेला
अर्थ नवा आला होता

 

ते तुझे पाहणे असे
थेट थेट आत होते
कि धडधडणे माझे
ऐकले जगाने होते

बंद दार होती सारी
कड्या कुलूप ठोकले
त्या तुझ्या पदरवाने
तट तुटून पडले

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

जगायचे सांग या मी





जगायचे सांग या मी
काय करू देवा आता
देहाच्या दगडा या नि
कसा कुठे फेकू आता

तट तट तुटतात
जन्मो जन्मीच्या या गाठी
व्यर्थ झाला शीण फार
धावतांना सुखापाठी

मिट्ट काळ्या काळोखात
मरे बीज प्रकाशाचे
अन जीवा काचतेय
ओझे कालच्या पुण्याचे

शृंगारल्या प्रेताची या
जणू वरात निघाली
ताठ निश्चेष्ट ओठात
सुखे स्वर्गाची मांडली 

 विक्रांत प्रभाकर


सोमवार, २१ ऑक्टोबर, २०१३

उरावा विठ्ठल



उरावा विठ्ठल | मनाच्या शून्यात
देहाच्या ऋणात | बुडालेला ||१||
विझुनिया दिवा | जाणीवेचा काळा |
भरावा सावळा | लख्ख चित्ता ||२||
पहावे नाटक | चालले जगाचे |
धरुनी तयाचे |बोट घट्ट ||३||
जग चुकवून | अंग झटकून |
कुणा न कळून | त्याचे व्हावे ||४||

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...