सोमवार, २१ ऑक्टोबर, २०१३

प्रेम असावे लखलखीत





जर त्याचे तुझ्यावर असेल प्रेम खरखुर
घेईल तो तुझ्यासाठी वादळ हि अंगावर
तोच पण जर कधी सांगू लागला कारण
फार अवघड आहे म्हणे घरच्यांना सोडण
तर तुझ्या प्रेमाची तू खरोखर शंका घे
ते आपले प्रेम पुन्हा एकदा तपासून घे
प्रेम असावे लखलखीत दिवसाच्या उजेडागत
स्पष्ट निर्भीड प्रामाणिक प्रकट साऱ्या देखत
प्रेमासाठी त्याच्या तुझ्या कुणालाही फसवू नको
लखलखणाऱ्या सोन्यावर डाग लावून घेवू नको

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/




शनिवार, १९ ऑक्टोबर, २०१३

एक करार लग्नाचा

एक करार लग्नाचा इथं
सदा निभावीत असतो आपण
एकाच दोरीच्या दोन टोकांना
फासात बांधलेलो असतो आपण
एक मेल्याशिवाय
सुटका नाही आता दुसऱ्याला
सुटकाही ती
खरेच असेल याची खात्रीही
नाही कुणाला
ओढता दोर आवळण्यास
जरा दुसऱ्याची मान
आपलाच फास घट्ट होतो
जावू पाहतो प्राण
तोल साधल्याविन इलाज नसतो
दोघांनाही आता
जनास माहित असते सारे
तरीही म्हणती रे
चांगला संसार करता
तुटावा हा दोर अचानक
कुठल्यातरी कारणान
हेच एक स्वप्न सतत
पाहत असतो आपण
एक करार लग्नाचा इथं
सदा निभावीत असतो आपण 


विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

शुक्रवार, १८ ऑक्टोबर, २०१३

झाला देवराया





झाला देवराया | कणव कृपाळू |
दिले आळूमाळू | प्रेमसुख ||१||
त्याच्या स्पंदनी | वीज रुणुझुनी |
मेघ किणकिणी | सर्वांगात ||२||
तरंग रहित | मनाचे आभाळ |
शारद कोवळ | आल्हादित ||३||
देह गोधडीच्या | सुटुनिया गाठी |
उताविळ उडी | घेवू पाहे ||४||
कुणी सांभाळले | कैसे आणीयले |
चंदन दाटले | कणोकणी || ५|| 

विक्रांत प्रभाकर  
 http://kavitesathikavita.blogspot.in/


गुरुवार, १७ ऑक्टोबर, २०१३

देणे घेणे





देणे घेणे
जेव्हा सरले
तुटली नाती
प्रेमही नुरले
हाती मग
केवळ उरले
उदास जगणे
आपण आपुले
कधी कुणावर
प्रीती केली
स्वप्नी रमुनी
दुनिया पाहिली
का न कशी पण
सरली विरली
गाणी भिनली
मनात रुजली

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

शनिवार, १२ ऑक्टोबर, २०१३

असहायता माझी तुला



असहायता माझी तुला
कळत नाही असे नाही
तुझ्या नियम पुढे बहुदा
तुझा पण ईलाज नाही
ये इथे अन घे खांद्यावर
असे तर मी म्हणत नाही
जळणारी पावुले माझी
सावली मुळीच मागत नाही
तुला पाडावे उगा संकटी
असे मला वाटत नाही
काय करू पण हवास तू
आस काही सुटत नाही

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

 

रविवार, ६ ऑक्टोबर, २०१३

जर मी असतो



 
जर मी असतो
तोच पूर्वीचा
रंगीत पंखांचा
नाचऱ्या पायांचा
दव जपणाऱ्या
वेड्या मनाचा
तर कदाचित
तुझ्या स्वप्नांचा
असता सांभाळला
नजराणा नजरेचा
पण आता
उगाच मजला
प्रश्न पडतात
अर्थ काय
असे नाचाचा
इतिहास दवाचा
उगम स्वप्नांचा
आणि मग
मी नच 
उरलो इकडचा
जरी न झालो 
अजून तिकडचा

 विक्रांत
http://kavitesathikavita.blogspot.in/








                                                                                                  

शनिवार, ५ ऑक्टोबर, २०१३

असावे हात तुझेच हातात





असावे हात तुझेच हातात
स्पर्शात अन ओढ अनिवार |
तू आणि मी उरुनि फक्त
नसावं काही काहीच तिसर |
नसावे जग नसावे मानव
नसावे दानव नसावे सुरवर |
तुझ्या ओठातील अबोल थरथर
किंचित ओली जडावली नजर |
एवढेच फक्त उरुनिया बाकी
जावे हरवून सार सार |


विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


श्रावण २ विरह

श्रावणा २ (विरह) ******* कशाला श्रावणा येशी माझ्या दारा  घेऊनीया धुंद ऊन पाणी वारा  तुजला पाहता आठवते कुणी   एकटे पणाची खंत ये द...