मंगळवार, ८ मे, २०१८

शुक्र चांदणी




शुक्र चांदणी

आठवणींच्या चांदण्या
लुकलुकतात नभात
कुणा धरू कुणा सोडू
पिसे भरते मनात

सखी दिसे त्यात जणू
शुक्रचांदणी  भरात
फिरफिरूनिया जाय
मन त्याच मोहनात

तिची भेट तिची गाठ
तिचा कोवळासा हात
तिचे पत्र तिचे नेत्र
धुंद अबोधसे मैत्र

धीट प्रीती कंप ओठी
अधीर डोळ्यात भीती
निरोपाचा हट्ट तरी
स्पर्शातील गूढ गोष्टी

ते तिचे रुसणे अन्
मी तिला समजावणे
ते तिचे विसरून सारे
मिठीमध्ये विसावणे

घरात ती दारात ती
होती मनात व्यापली
सारीच क्षण सुमने
पदी तिच्या वाहियली

एक याद अन अंती
मनांमध्ये रुतणारी
हार मान्य उभयता
लोकरीती व्यवहारी

दूर गेली सखी परी
देवुनिया काव्य लेणे
एकेक स्मृतीत असे
भिनले लाख तराणे

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
Http://kavitesathikavita.blogspot.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गिरनार परिक्रमा

गिरनार परिक्रमा *********** सरला प्रवास परी तुझा भास  वेढून मनास आहे दत्ता ॥१ माझे पदरव मज ऐकू येती  तरंग  गुंजती पाण्यावर ॥२ पा...