रविवार, १३ मे, २०१८

तुझी आठवण



तुझी आठवण

**********
तुझी आठवण
एक कळी होऊन उमलते
माझ्या मनात
तुझा श्वास तुझा गंध
जाणवू लागतो
मला माझ्या अस्तित्वात

त्या इवलाल्या क्षणाचे
होतात वटवृक्ष
व्यापून टाकतात
माझे आकाश
पुनर्नुभूतिच्या पारंब्यात
अडकतो माझा जीव
घेतो लपेटून ओढून
त्या सुखास

दिवसभर असतेस तू
अवती भवती
हातातील प्रत्येक गोष्टीत
घडणाऱ्या प्रत्येक घटनेत
असतात तुझ्या अदृश्य खुणा
याला तू हे म्हटली होतीस
त्याला तू असे बोलली होतीस
तेव्हा हे असे घडले होते
तेव्हा ते तसे झाले होते

अन रात्री केंव्हातरीं
अचानक जाग येते
तेव्हाही तू असतेस  तिथे
जणू काही माझी वाट पाहत
जागृतीच्या किनाऱ्यावर
स्वागताची गलबते घेऊन

मग तुला पाहणारा आठवणारा" मी "
मला दिसू लागतो वेगळेपणी
त्या "मी "चे तुझ्यात झालेले विलोपन
पाहून वाटते
अरे "मी "तर तूच झाली आहेत
अटळपणे

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

भक्ताचिया गोष्टी

भक्ताचिया गोष्टी ************** भक्ताचिया गोष्टी डोळा आणी पूर  भावनांनी उर भरू येई ॥१  आहाहा किती रे भाग्याचे पाईक  पातले जे सुख...