गुरुवार, ३१ मे, २०१८

रुजणे



रुजणे

पाण्यावाचून कसे रे
इथे घडेल रुजणे
ओठ फुटल्या पात्रात
माती सांगते गार्‍हाणे

एका व्याकूळ थेंबास
जन्म मागतो जगणे
वृक्ष भिडला कातळी
दार मिटलेले जुने

येरे येरे म्हणतांना
कंठ कासाविस होतो
दूर कुठे सागरात
थेंब खुशाल पडतो

कारे अडती प्रार्थना
तप्त दडल्या मातीत
स्वप्न उद्याची हिरवी
गुदमरती मनात


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
Http://kavitesathikavita.blogspot.in

मंगळवार, २२ मे, २०१८

रिक्त जीवन



रिक्त जीवन ।

रिक्त हे जीवन माझे न्याहाळीत मीच आहे
घेऊन मोती आसवांचे विकत मीच आहे

हे आकाश गोंदलेले लाख चांदण्यांनी
अंधारास मागच्या परी भीत मीच आहे

हे कवडसे क्षणाचे जमवून ओंजळीत
उधळून सूर्य हरवला म्हणत मीच आहे

त्या कालच्या फुलांचे शृंगार यौवनाचे
पुसता मनातून कोमेजत मीच आहे

असतील किती जन्म कालौघात अजूनी
हे प्रभो कालचक्रास नाकारीत मीच आहे

हा स्पर्श मृदू थंड अंग अंग शहारते
जाणतो काळसर्पा मिठीत मीच आहे

हा सुटावा पसारा प्रारब्धी मांडलेला 
म्हणुनी अवधुताआळवीत मीच आहे

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
Http://kavitesathikavita.blogspot.in


रविवार, १३ मे, २०१८

अद्वैत



जाणुनी अद्वैत । द्वैती मी रमतो ।
प्रेमें आठवतो । गुरुदेवा  ।।
लागला से छंद । मनाला प्रीतीचा ।
भक्तीच्या रूपाचा ।ऐसा काही ।।
मधू लागे इक्षु ।शर्करा गुळात ।
परी आवडीत ।भिन्नता ही ।।
मांडली पूजा  । सजला देव्हारा ।
पूजक पुजारा ।भेद नाही ।
विक्रांत रंगला । भक्तीत दंगला 
अंतरी एकला । एकपणी ।।

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
Http://kavitesathikavita.blogspot.in

तुझी आठवण



तुझी आठवण

**********
तुझी आठवण
एक कळी होऊन उमलते
माझ्या मनात
तुझा श्वास तुझा गंध
जाणवू लागतो
मला माझ्या अस्तित्वात

त्या इवलाल्या क्षणाचे
होतात वटवृक्ष
व्यापून टाकतात
माझे आकाश
पुनर्नुभूतिच्या पारंब्यात
अडकतो माझा जीव
घेतो लपेटून ओढून
त्या सुखास

दिवसभर असतेस तू
अवती भवती
हातातील प्रत्येक गोष्टीत
घडणाऱ्या प्रत्येक घटनेत
असतात तुझ्या अदृश्य खुणा
याला तू हे म्हटली होतीस
त्याला तू असे बोलली होतीस
तेव्हा हे असे घडले होते
तेव्हा ते तसे झाले होते

अन रात्री केंव्हातरीं
अचानक जाग येते
तेव्हाही तू असतेस  तिथे
जणू काही माझी वाट पाहत
जागृतीच्या किनाऱ्यावर
स्वागताची गलबते घेऊन

मग तुला पाहणारा आठवणारा" मी "
मला दिसू लागतो वेगळेपणी
त्या "मी "चे तुझ्यात झालेले विलोपन
पाहून वाटते
अरे "मी "तर तूच झाली आहेत
अटळपणे

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

बुधवार, ९ मे, २०१८

कणभर कृपा




कणभर कृपा
********

कासावीस जीव
होई रात्रंदिस
देवा का उदास
तुझी माया ॥

तुवा का न येई
माझी आठवण
कृपेसी कारण
सापडेना ॥

गाठी नाही तप
कमी पडे जप
साठवले पाप
हटेना का ॥

प्रभू गिरणारीं
पाहू नको अंत
हताश विक्रांत
तुझ्याविना ॥

कणभर कृपा
करी दिनावर
दावी क्षणभर
पदे तुझी  ॥


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
Http://kavitesathikavita.blogspot.in

मंगळवार, ८ मे, २०१८

शुक्र चांदणी




शुक्र चांदणी

आठवणींच्या चांदण्या
लुकलुकतात नभात
कुणा धरू कुणा सोडू
पिसे भरते मनात

सखी दिसे त्यात जणू
शुक्रचांदणी  भरात
फिरफिरूनिया जाय
मन त्याच मोहनात

तिची भेट तिची गाठ
तिचा कोवळासा हात
तिचे पत्र तिचे नेत्र
धुंद अबोधसे मैत्र

धीट प्रीती कंप ओठी
अधीर डोळ्यात भीती
निरोपाचा हट्ट तरी
स्पर्शातील गूढ गोष्टी

ते तिचे रुसणे अन्
मी तिला समजावणे
ते तिचे विसरून सारे
मिठीमध्ये विसावणे

घरात ती दारात ती
होती मनात व्यापली
सारीच क्षण सुमने
पदी तिच्या वाहियली

एक याद अन अंती
मनांमध्ये रुतणारी
हार मान्य उभयता
लोकरीती व्यवहारी

दूर गेली सखी परी
देवुनिया काव्य लेणे
एकेक स्मृतीत असे
भिनले लाख तराणे

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
Http://kavitesathikavita.blogspot.in

रविवार, ६ मे, २०१८

क्षणस्थ


कधी ग्रीष्मात नटला
कधी वर्षेत सजला
दोन्ही हातांनी भरून 
क्षण आताच थांबला ।
काय घडले काल नि
काय घडेल उद्याला
मना नको रे गमावू
काळ मोलाचा चालला ।
घेई हातात सुमने
फळे पिकून आलेले
नभ रंगांनी नटले
पाहा चांदणे भरले ।
हास्यी खळाळे बालक
दुवा देणारी म्हातारी
भाव विभ्रम मनाचे
सुख दुःखांच्या लकेरी ।
नको टिपूस चित्रात
नको पाठवू जगात
क्षण होई रे तो तू
स्थिर राहून मध्यात ।
डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
Http://kavitesathikavita.blogspot.in

रंग

रंग **** एक माझा रंग आहे  रंग माझा मळलेला  लाल माती चढलेला भगव्यात गढलेला ॥ आत एक धिंगा चाले  मन एकांतात रंगे घरदार अवधूत  स्वप्...