शुक्रवार, ३१ मे, २०२४

टर्म ॲण्ड कंडिशन (सोमवंशी सिस्टर)

टर्म अँड कंडिशन (सोमवंशी सिस्टर)
**************
जीवन हा एक खेळ असतो 
त्यात धावपळ पळापळ 
रुसवे फुगवे हार जीत सारे काही असते 
जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला 
हा खेळ कंपल्सरी खेळावाच लागतो 
जसेपाण्यात पडल्यावर पोहावेच लागते 
प्रत्येक खेळाला काही नियम असतात 
आणि ते पाळावे ही लागतात .
पण काही लोक हा खेळ खेळतात 
तो आपल्या टर्म अँड कंडिशन नुसार 
आपल्या अटी आणि शर्तीनुसार 
छाया सोमवंशी सिस्टर त्यापैकी एक आहेत 
त्यांचे व्यक्तिमत्त्व अतिशय फर्म 
धडाडीचे खमके स्पष्टवक्ते असे आहे 
पण त्याचवेळी मित्रासाठी जिवलगांसाठी रुग्णांसाठी त्यांच्यामध्ये 
प्रेम आपुलकी जिव्हाळा आणि कर्तव्यनिष्ठता 
हे तेवढेच भरलेली आहे 
त्यांनी जे काम स्वीकारले त्यात 
कधीही खळखळ केली नाही 
प्रामाणिकपणे काम केले आहे 

पण त्यांना कोणी काम करायची 
जबरदस्ती केली तर अन ते 
त्या टर्म अँड कंट्रशन मध्ये बसत नसेल 
तर धुडकावून देत ,परिणामत पर्वा न करता .
मला वाटते त्याचे कारण 
त्यांच्या जीवनात त्यांनी ठरविलेले
कॉन्सेप्ट एकदम क्लिअर होते
त्यात गोंधळ नव्हता चलबिचलत नव्हती
पोलादाच्या पात्याला सोन्याचे सोंग घेणे 
जसे आवडत नाही तसे होते ते 
इतरांपेक्षा वेगळे व्यक्तिमत्व आहे हे 
त्याचा त्यांना कधी कधी त्रासही होत होता
तो त्रास पचवण्याची शक्ती त्यांच्या अंगी होती
म्हणूनच आज इथे या निरोप समारंभात 
त्या कृतार्थ समाधानी आनंदी दिसत आहेत 
सिस्टरांना तीर्थयात्रा देवदर्शन भ्रमंती आवडते
ते त्यांचे ऊर्जेचे स्त्रोत आहे असे मला वाटते 
निवृत्तीनंतर त्यांना यासाठी भरपूर वेळ मिळेल 
त्या सर्व भारत अन परदेशही भ्रमण करतील 
त्या भ्रमणाला  लागणाऱ्या आरोग्यासाठी अन
दिर्घ आयु साठी त्यांना खूप खूप शुभेच्छा .

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 


बुधवार, २९ मे, २०२४

वाटा


वाटा
*****
साऱ्याच वाटा समोरच्या जगायच्या असतात . 
समोर आल्यावर चालायच्या असतात . 
वाटा कधी कधी अपरिहार्य असतात 
तर कधी कधी बदलता येतात 
पण पर्याय हातात असेपर्यंतच .
 कारण काही वाटा परत फिरत नसतात 
एकतर्फी वाहतूक असते तिथे 
परत फिरायला वेळ नसतो हातात 
किंवा परतीचे मार्गही बंद होतात 
आणि मग जी वाट आपण चालतो 
ती निमुटपणे चालावी लागते .
नशीबवान असतात ते 
ज्यांना भेटते हवी ती हवी तशी वाट 
काटे कुटे दगड तर प्रत्येक वाटेवर असतात 
अगदी राजमार्गावरही कधी कधी ठेचा लागतात 
पण चालणाऱ्याला जी वाट सुटू नये
असे वाटते ती वाट खरच नशीबवान असते 
आणि चालणाराही 
बाकी कधी ऊन कधी सावली 
हा खेळ तर चालतच असतो .
कधी कधी वाटते वाट पाया खाली नसते 
तर ती मनात असते 
अन
चालण्यात आनंद वाटू लागला 
की वाट कुठली कुठे जाते याला मूल्य नसते .
काही लोक वाटेवरून घसरतात 
चुकत चुकत आडवाटेला ही लागतात .
कधी कुणाला ते कळतं तर कधी कळतही नाही तर कधी कोणी कळूनही 
ते मुद्दाम त्याच वाटेने चालत राहतात
त्या आडवाटेचे सुख त्यांना अधिक आवडू लागते 
शेवटी प्रत्येक वाटेला एक शेवट असतो . 
मुक्काम असतो जो येणारच असतो . 
प्रवास चांगला असो किंवा वाईट असो 
पथ सुखकर असो किंवा दुःख कर असो 
कालौघात बुडून जातो .
विस्मृतीच्या मातीत मिसळून जातो 
विराट विश्व संचालनात 
ती एक नगण्य हालचाल असते . 
तरी चालणाऱ्या साठी ती 
किती महत्त्वपूर्ण आणि मोठी असते 
कारण त्याच्यासाठी ती तेवढीच असते

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

मंगळवार, २८ मे, २०२४

बंदीवान


बंदीवान
*******
तुझ्या संभ्रमाची वेल 
तुला बुडवते खोल 
मी होऊनिया खिन्न 
ऐके उदासीन बोल 

तू घेतेस ओढवून 
उगा वृथाचे वादळ
होत कस्पट नशीब
मज गिळते आभाळ 

तुझे बिंब प्रतिबिंब 
वाद घालते स्वतःशी 
माझा हरवे आकार
जातो कुठल्या मितीशी 

तुला वेढून अमृत 
परी डोळ्यात तहान 
माझ्या ओंजळीचे पाणी 
जाते फटी झिरपून 

सुख सुंदर विखारी 
तरी नाही सोडवत 
तुझ्या डोळ्याचे गारुड 
माझा जन्म बंदीवान

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

सोमवार, २७ मे, २०२४

हस्तांतरण

हस्तांतरण
********
जीवाकडून जीवाकडे
हस्तांतरण जीवनाचे  
आहे युगा युगाचे 
हे गूढ निर्मितीचे

ही साखळी अमरत्वाची 
देहा वाचून वाहायची 
सोडूनही देहास या 
देहपणी मिरवायची 

नसेल तेव्हाही मी 
असेल तेव्हाही मी 
सांगतो बजावूनी
इथे जणू मलाच मी 

बाप जगतो मुलांमध्ये 
आहे कुठे वाचलेले 
हे साज गुणसूत्रातले 
राहतेच तिथे साचले 

पुन्हा मी पुन्हा मी 
येतच राहतो पुन्हा मी 
पुन्हा पुन्हा नवेपणाने 
जीर्णत्व भिरकावूनी

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

रविवार, २६ मे, २०२४

दीपक


दीप
******
सांजवता दिन दीप उजळला
दत्ताच्या समोरी हळूच  ठेविला ॥१

दीप प्रकाशला गाभारा भरला
तम दाटलेला क्षणी दुरावला ॥२

इवला प्रकाश झाला घरभर
अन पुढे किती गेला दूरवर॥ ३

मग मिटू गेले थकलेले डोळे
शब्दाविन शब्द काही मनी आले ll४

भाग्य या दिव्याचे देई मज देवा
जळत पदाशी मिळावा विसावा ll५

तुझाच अंधार अन हा प्रकाश 
परी पेटण्याची मनास या आस ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 

शनिवार, २५ मे, २०२४

लायक


लायक
******
नच का लायक तुझ्या मी पदाला 
सांगावे मजला दत्तात्रेया ॥१
अजुनी आत का भाव न जागला 
भेटी न मजला म्हणुनी ती ॥२
उघडे सताड अतृप्तीचे दार 
घुसतो अपार वारा आत ॥३
सरू आले जिणे जन्म आटाअटी 
रितेपण गाठी दिसे पुढे ॥४
झाली पारायणे झाल्या प्रदक्षिणा 
भाकली करुणा किती वेळा ॥५
काय तुझी भक्ती मज ना घडते 
नच काय होते भांडे रिते ॥६
तर मग फुटो पात्र ही अनंता 
ही निरर्थकता नको आता ॥७
असणे नसणे तेही तुझ्या हाती 
करावे विक्रांती काय मग ॥८
बाकी मनातले दत्ता तुज ठाव 
करणे उपाव मर्जी तुझी ॥९
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 


शुक्रवार, २४ मे, २०२४

सरोवर

सरोवर
*******
त्या मोहमयी सरोवराचे जल 
चाखले तुम्ही एक वेळ 
तुम्हाला तिथे पुन्हा यावे वाटणे
आहे अगदी अटळ 
तो स्पर्श शितल मधुर 
ती जीवावर पडणारी भुरळ 
ते तृप्तीची अवीट महूर 
ते निस्पंदतेत जाणारे पळ 
किती विलक्षण असतात 
ती स्वप्नांची मदीर कमळ 
ते पेशी पेशीत उमटणारे कूजन 
ते रोमांचित होणारे तनमन 
आणि हरवून गेलेला काळ वेळ 
खरे तर ते असे सरोवर 
अचानक अनाकलनीयपणे 
सापडणे जीवनाच्या पथावर 
हा मोठा चमत्कारच 
आणि त्या सरोवराचे आमंत्रण 
शुभ्र बाहू पसरून 
आपल्या प्रतिबिंबासह 
आपल्याला घेणे सामावून 
अन अपूर्णतेला जीवनाच्या देणे कारण 
किती विलोभनीय असते .
तरीही ते मोहमयीच आहे
अन सोडून जाणेच आहे 
हे कडवट आणि दुःखद सत्य
व्यापून उरते येता जागृतीच्या काठावर 
मग मधूर सुखाचे स्वप्नाचे ते ठिकाण 
ठेवून हदयात निघतो आपण
ओढत नेते जीवन आपल्याला दूरवर 
त्याच आपल्या धुळीच्या रुळलेल्या
म्हटले तर ठरलेल्या-नियत वाटेवर
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  .
☘☘☘☘ 🕉️ 


वृक्ष वंश उच्छेद

वृक्ष वंश उच्छेद ********* जळताच झाड मन विद्ध होते  तोडताच झाड मन कळवळते  एकेक झाडात लक्षावधी जीव  राहतात प्रेमाने करुनिया गाव  ...