बुधवार, २० नोव्हेंबर, २०१९

तेजे सिस्टर

तेजे सिस्टर
*******
माझ्यासाठी तेजे सिस्टर म्हणजे
अतिशय सोपे सरळ व्यक्तिमत्त्व
जेवढ्यास तेवढे बोलणाऱ्या
कमीत कमी बोलणाऱ्या
कामापुरते बोलणाऱ्या
त्यामुळे दिसायला
हे एक सोपे गणित होते
सोडवायला मात्र
मोठे अवघड होते .

आपण बरे की आपले काम बरे
आपले आठ तास
महानगरपालिकेला द्यायचे
नीटपणे कर्तव्य करायचे
पण जास्त खोलात शिरायचे नाही
उगाचच इन्व्हॉल्व व्हायचे नाही
असा एक सहज समंजसपणा
 त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये आहे
थोडक्यात म्हणजे
डोक्याला त्रास करून घ्यायचा नाही
असे हे एक त्यांचे साधे सोपे सूत्र होते
पण कामात कुचराई करायचे नाही
कामासाठी काम असे
एक सरळ धोरण ठेवून
त्यांनी काम केले

आपले अस्तित्व सिद्ध करणे
अधोरेखित करणे
हे बहुतेक लोकांना आवडते
कधी पदाच्या साह्याने
कधी गटांच्या सहाय्याने
कोणी कोणाच्या ओळखीने
लोक आपले महत्त्व मांडू पाहतात
पण त्या वृत्तीचा पूर्ण अभाव
मी तेजे सिस्टरा मध्ये पाहिला .

मिळून मिसळून राहणे
प्रेमाने राहणे
अन् प्रेमाने जगणे
बडेजाव न मिरवणे
हे त्यांचे वैशिष्ट .

कदाचित घार उडे अंतराळी
तिचे लक्ष पिलापाशी
अशीही एक भूमिका त्यामागे असावी
असे मला वाटते
तर अश्या या
एका शांत संयत सोशिक
व्यक्तीमत्वाला हा निरोप आहे .


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
***

भोगाची नावड



 
********
भोगाची नावड
नको मज दत्ता
धन मान सत्ता
पुरे आता .

निखळ ती भक्ती
देणार तू कधी  
अजूनही थोडी
ओढ जगी .

अजून मोहाचे
सुंदर मंदिर
येते डोळ्यावर
माझ्या दत्ता

अजून सुमने
मन वेडावती
गंधात वाहती
स्वप्न सान

अजूनही वसने
जगा मिरवणे
होते रिझवने
स्वतःसाठी

मावळो  हे जग
आता दत्त नाथा
स्वरूपाची सत्ता
पाहूनिया

बुजगावणे हे
विक्रांत नावाचे
कुणाही शेताचे
राहो मग


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

**

मंगळवार, १९ नोव्हेंबर, २०१९

अडकला जन्म



**
अडकला जन्म
देह बंधनात
घर संसारात
कर्म बळे

सुटण्याचे यत्न
वाढवितो गुंता
आणिक संकटा 
बोलावितो

बळे आधी व्याधी
सांगता न येते
जीवा दमवते
अहोरात्र

गांजलो देण्यात
वाकलो कर्जात
तुटलो तोट्यात 
जगताच्या

आता दत्तात्रेया
तूच सोडविता
घेऊनिया जाता
घराकडे 

विक्रांत मागतो
फक्त तुझी साथ
भक्ती प्रकाशात
जन्म जावो


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

**

सोमवार, १८ नोव्हेंबर, २०१९

भाकरीची कोर



 भाकरीची कोर
 **
माझिया वाट्याची
भाकरीची कोर
दत्ता हातावर
देई मज

बहु मी भुकेला
पोट खपाटीला
आलोय दाराला
तुझ्या येथे

बासुंदी खिरीचे
मिष्टान्न प्रकार
नको हवे तर
वाढू कधी

नसे कदाचित
पुण्य माझे मोठे
तुज कैसे भिडे
घालू मग

होईल आनंदी
देशील ते मज
मिरविन भोज
प्रेमाने मी

जगवीतो देह
आणखीन एक
नच निरर्थक
जावा कधी

विक्रांत उपाशी
अमृत दारासी
काय रे तुजसी
शोभा देई


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

****

रविवार, १७ नोव्हेंबर, २०१९

क्षणातला दत्त



क्षणातला दत्त
मनी विसावला
आणि स्थिरावला
जन्म मृत्यू
सगुणाची मोट
निर्गुणी बुडाली
जयाची कळली
त्यालाचीच
छाया प्रकाशाचा
असे जग खेळ
पाहण्यास वेळ
कुणा इथे
विक्रांत पापणी
मिती उघडली
प्रकाश पखाली
अंतरात


© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
**

शनिवार, १६ नोव्हेंबर, २०१९

जीवनाचे रण



जीवनाचे रण

**
थकलेला देह
विटलेले मन
जीवनाचे रण
तरी बाकी

नको तरी हाती
रथाची या वादी
ओढतात नाती
चारी दिशा

काय करू दत्ता
तूच सांग आता
ओढताओढता
हात तुटे

मजला सारथी
अश्व ना दिसती
तरी शर छाती
रुततात

वाहतात ओघ
दु:खाचे रुधिरी
मरणाच्या दारी
नेती मज

थांबवा हा रथ
थांबव प्रवास
निरर्थ सायास
जिंकण्याचे

विक्रांत हातात
पांढरे निशाण
पाहण्यास कोण
दिसेनाची

गजनी जीवन
उद्दाम मग्रुर
भोकसते क्रूर
शस्त्रे उरी

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

शुक्रवार, १५ नोव्हेंबर, २०१९

कर्ज दत्तावरी आहे



 कर्ज दत्तावरी 
 
*********

इथेही तूच आहेस
तूच आहेस तिथेही
स्वप्न सत्य वेटाळून 
तुझ्याविना नच काही 

येणे इथे परी माझे 
नच खुशामत आहे 
वेडेपण पांघरणे 
आनंदाचे गीत आहे 

होतातही कष्ट काही 
भोगण्यात मजा आहे 
मिळविणे प्रीती तुझी 
हाच हट्ट माझा आहे 

तुच फक्त अवधूता
जीवनाचा अर्थ आहे 
तुझ्याविना जगणे हे
खरोखर व्यर्थ आहे

रिकामेच हात माझे
उभा दत्त दारी  आहे
पाहतो वाट विक्रांत
कर्ज दत्तावरी आहे

© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

रिक्तत्ता

रिक्तत्ता ******* क्षणा क्षणाने कळल्या वाचूनी आयुष्य येते ऋतू घेवूनी  हसवून रडवून चोरपावलांनी रंग खेळूनी जाते उलटुनी  काय कमावल...