गुरुवार, २७ ऑक्टोबर, २०१६

निरोपाच्या क्षणी (एका send off ला )








निरोपाच्या क्षणी दाटतो हुंदका
शब्द होतो मुका ओठातला ||
आठवांचा मळा सर्वांगात दाटे
कालचेच वाटे रुजू होणे ||
एक एक साथी उभा राहे मनी
केले ज्यांनी ऋणी जन्मभर ||
तसे कधी वाटे जाहले सार्थक
सरे धकाधक आयुष्याची ||
खुणावते जरी स्वप्न जपलेले
उरी तुटलेले छळे काही ||
आता जीवनाचा एक नवा डाव
एक नवी धाव नवी दिशा ||
विक्रांत शुभेच्छा सहस्त्र वदतो
उलटे म्हणतो पहा आता  ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/

सोमवार, २४ ऑक्टोबर, २०१६

मनोरुग्ण






जन्म साठला मनात
दिन जातोय वाहत
चित्त भंगले सांडले
कधी तळ्यात मळ्यात

ग्रंथ नीटस नेटका
पान उलटत नाही
वर्ष उलटून गेली
कथा सरकत नाही

घट्ट लावले कवाड
दूर लोटतो प्रकाश
भय अनाम अंतरी
दवा मागते देहास

अंत होतोच शेवटी
घराघरात थडगी
ऐसे जिवंत जळणे
कोण कशास रे भोगी

दूर ढकलती दोर
मागे असून भोवरे
एक करूण अटळ
दिसे प्राक्तन सामोरे

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/


रविवार, २३ ऑक्टोबर, २०१६

द्वार सेवा (एक भारुड )





पंक्चरवाला दारी आला
गाडी माझी घेवून गेला
द्वार सेवा देता देता
पेट्रोल थोडे काढून गेला

भाजीवाला दारी आला
ताजी भाजी देतो म्हटला
आठ आण्याची दो रुपयाला
जुडी एक देवून गेला

रद्दीवाला दारी आला
भाव कमी सांगू लागला
मोजता मोजता तीन किलोला
हळूच काटा  मारून गेला

फरसाण वाला दारी आला
शेव चिवडा  विकून गेला
विकता विकता माल भरला
पोट दुखी ठेवून गेला

दत्त माझ्या दारी आला
डोळा भूल देवून गेला
जाता जाता सवे त्याच्या
माझेपण तो घेवून गेला

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/

शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०१६

कविता लिहिणे








पिले मांजराची
पिले कोंबडीची
कविता कुणाची 
घडो यावी  ||१

शब्द इटूकले
शब्द पिटुकले
यमकी रचले
काम व्हावे  ||२

असा खेळ खेळू   
मजा मजा करू  
चला वेळ काढू   
असातसा || ३

असे वेळ तर
सोडा नाहीतर
प्रेम शब्दावर
फक्त करा ||४

व्यक्ती नुसार
कविता होणार
भाव उमटणार
ज्याचा त्याचा ||५

तर मग चला
शब्द उधळा
कविता उजळा
पुन्हापुन्हा || ६

कविता लिहिणे
असते जगणे
दवात भिजणे
सकाळच्या ||७



डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/



चाकरमानी

चाकरमानी ******** पोटाला पाठीला  पिशव्या बांधुनी कामाला निघती हे चाकरमानी ॥ चाकरमान्याच्या  डोळ्यात घड्याळ देहा चिकट...