सोमवार, २८ डिसेंबर, २०१५

पतित पावन दिगंबरा




देवा  जन्म  आता
तुझ्या पायावर 
जगण्या आधार 
नाम तुझे ।।१
सांभाळी  कृपाळा
जरी  भटकलो 
तमी सापडलो 
मोहरात्री ।।२
करावी सोबत 
आणावे शोधत 
घालावे पोटात 
अपराध ।।३
पाही बेडकाची 
उडी चिखलात 
परी सांभाळत 
तया  तुच ।।४
अन  हत्येवीन 
जया  नाही  जीणे 
घडे  सांभाळणे 
तया  तुवा ।।५
व्याघ्रादी  केसरी 
श्वान भूल्लुकासी 
हरीण हत्तीसी 
प्रतिपाळी  ।।६
म्हणून मजला 
वाटतसे आशा 
जरी  घोर निशा 
सभोवती  ।।७
माझिया चुकांचे   
करावे क्षालन  
पतित पावन  
दिगंबरा ।।८

विक्रांत प्रभाकर

http://kavitesathikavita.blogspot.in/

रविवार, २७ डिसेंबर, २०१५

जेव्हा मी तुझा होतो






जेव्हा मी तुझा होतो
खरच का सुखात होतो
कुणास ठावूक खरच पण
काही तरी वेगळा होतो

एक धुंदी होती मनात
अन काळ होता वाहत
तोच तसाच दिवस पण
नव्हता कधी जुना होत

जणू वसंत चिरकालीन
होता मुक्कामाला इथे
थोडे होते तिखट तरीही
जन्म पक्वान्नच वाटे

का न कळे कसे कधी   
वस्त्र फाटले किंवा विरले
सांभाळलेले हातून पडले
दिस जन्म हिशोब बिघडले

आता त्या स्मृतीच दुखावून
करीती जगणे अजुनी जड
तेच विश्व अन असून समोर
भरुनी राहते असह्य तडफड  

होते ऐकले शापित जगणे
असते केव्हा कधी कुठले
प्राक्तन होईल आपले असले
स्वप्नीही मज नव्हते वाटले

दोष कुणाचा गुन्हा कसला
कुणा हातून प्रमाद घडला
असा खेळ व्यर्थ आंधळा
कोण कसा कशास खेळला  


विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


शनिवार, २६ डिसेंबर, २०१५

जे.कृष्णमुर्ती माझा बाप ...






जे.कृष्णमुर्ती माझा बाप ...
नाते असून नसल्यागत
कठोर तर्कट अगदी स्पष्ट
करुणामय अन प्रेमळ आत  

शब्द त्याचा तलवारीगत
दयामाया नसल्यागत
जातो कापत उघडे करत
सांभाळलेले सारे स्वगत

हे सांभाळू का ते मनात
दैवी धन्य ते पुजू जनात
मिरवू दावू सांगू लोकात
परी न ठेवी काही हातात

दुसऱ्याचे ते हवे कशाला
कर कमाई जाण स्वतःला
अर्थावाचून शब्द साठला
दे फेकुनी रे दूर तयाला

सत्वरजतम एकच असते
पापपुण्य ही मुळीच नसते  
थर मनाचे मन सांभाळते
तेच एक ते जन्म खेळते

सुरक्षितता अन सातत्य
मानस यातच रमते सत्य
देवधर्म तव पूजाअर्चाही  
असती पळवाटा अनित्य

ऐकुनी हे मन घाबरते  
अन अंधारी आत पाहते  
आत पाहते काही जाणते
जाणले ते त्याचे असते


डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे

http://kavitesathikavita.blogspot.in/




शुक्रवार, २५ डिसेंबर, २०१५

|| इदं दत्त द्रां ||







एक फकिरी
झोळी बांधून
काठी वाकडी
हाती घेवून

इदं दत्त द्रां
ददं दत्त द्रां
बोलत चाले
मस्त अनाम  

वाऱ्यावरती
होवून स्वार
श्वासाच्याही  
जावून पार

नाव तयाचे
कुणा न ठावे
गाणे आणिक
अर्थ न पावे 

खुळावलेले
शून्यसे डोळे
गूढ हसणे
ओठावरले

ओढ कसली
जीवा लागली
जन्म सांडून
वर्ष चालली  

काय उद्याचा  
मीच नसे तो
स्वप्न पडे वा
भास दाटतो

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


अटळ

अटळ **** गिरनारी मूर्ती फुटली गोरक्षाची  ती कृती भ्याड नामर्द रात्रीची  अफगाणी मूर्ती फुटली गौतमाची  ती कृती उद्दाम  द्वाड दिवसा...