रविवार, २१ जुलै, २०१३

मरणासन्न





रक्त काळे उलटी मधले
रस्त्यावरती पुन्हा पडले
थोडे दुखले आत खुपले
मदिराग्रस्त यकृत सडले
भकास हसणे मरू घातले
थुंकीमध्ये गोळा झाले
तसेच शून्य होवून डोळे
अंधारी पुन: हरवून गेले
मरण कृपाळू उदार झाले
समोर येवुन उभे ठाकले


वेगळ्या form मध्ये    
मरणासन्न
रक्त काळे | उलटी मधले |
पुन्हा पडले | रस्त्यावर ||
थोडे दुखले | आत खुपले ||
यकृत सडले |मदिराग्रस्त |
भकास हसणे | मरू घातले ||
गोळा झाले |  थुंकीमध्ये |
तसेच शून्य | डोळे होवून| |
गेले  हरवून | अंधारात ||
मरण कृपाळू | होत उदार |
येवुन समोर | उभे ठाके || 
विक्रांत प्रभाकर 
http://kavitesathikavita.blogspot.in/


 

शनिवार, २० जुलै, २०१३

संन्यास




संन्यास एक फुल असते 
मनात उगवून आलेले
लाल शेंदरी रंगाने त्या 
आत बाहेरून रंगलेले ||
संन्यास एक धून असते 
मना मध्ये वाजणारी
लौकिकाच्या आकांक्षा 
सहज सुटून देणारी  ||
संन्यास एक गाणे असते 
जीवन गाणे झालेले
सह्जानंदी आत्मसुखाच्या 
हिंदोळ्यावर बसलेले ||
संन्याशाचे गाव कुणा का 
सहज असे मिळते
दिव्यत्वाचे ओढ तिथे 
जीवन जळावे लागते ||
जीवनाने दिले एक ते 
धन्य वरदान असते
भाग्यवशे कधी कुणाचे 
आयुष्य आनंद होते ||
प्रभूप्रेमाच्या प्रवासातील 
पेणे शेवटचे ते असते
अग्नीवेशी धुरंधरास 
ठाणे ठावूक ते असते ||


विक्रांत प्रभाकर तकोने
http://kavitesathikavita.blogspot.in/

गुरुवार, १८ जुलै, २०१३

लाखो व्याकूळ डोळ्यांनी





लाखो व्याकूळ डोळ्यांनी
पाहतो मी तुला
लाखो आतुर हातांनी
नमितो मी तुला  
लाखो कृतार्थ डोकी माझी
स्पर्शती तव चरणाला
लाखो गळ्यांनी स्वर माझा
राउळी तव दुमदुमला

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

बुधवार, १७ जुलै, २०१३

काही बाही होण्याआधी






परक्या सारखी आलीस तू
जुबबी बोलून हसलीस तू
काही बाही होण्याआधी
चटकन निघून गेलीस तू

किती लोक बाजूस माझे  
वर्षानुवर्ष ओळखीचे
कुणासही कळले नाही  
माझी कोण आहेस तू

अजून आहे म्हणतो मी
नाकारणे तुज अशक्य मी
अशी वेदना चिरतरुण
हृदयात या आहेस तू

उगा बोललो असेच काही  
ओढून ताणून मग मी हि   
माहित होते जरी मजला
काहीही ऐकत नाहीस तू

तुला त्वरा होती निघायची
मला स्वत:ला सांभाळायची
वळून मागे न पाहताच
जिना झरझर उतरलीस तू

मीही टाळले तुला पाहणे
पाठमोरे ते जीवघेणे
नच पाहले जरी तरीही
मजला दिसत होतीस तू



विक्रांत प्रभाकर             
http://kavitesathikavita.blogspot.in/


स्वामीभेट

स्वामी भेटी ******** कृपेचे कोवळे चांदणे पडले  स्वामी भेटी आले  अकस्मात  नसे घरदार नसे ध्यानीमनी  भाग्य उठावणी  केली काही  तोच स...