बुधवार, २० ऑगस्ट, २०२५

Reel, रिल

Reel/रिल
*********
एका मागे एक रील धावतात 
मना धरतात आवळून ॥१
कळण्याआधीच थांबण्याआधीच 
नेती ओढतच लागोलाग ॥२
यात गुंतूनिया काही नच मिळे
अपव्यय वेळे घडतसे ॥३
काही घडताच मन जाणू पाही 
गर्दी त्यात होई आपणही ॥४
असे कुतूहल जरी याचे मूळ 
रक्षणा केवळ अंगभूत ॥५
अथवा स्त्रवते मेंदू इंडोफिन 
थोडे एड्रलीन हवे देहा ॥६
अवघा यांत्रिक चाले रसायनिक 
खेळ भावनिक बाजाराचा ॥७
यातून सुटका करूनिया घेणे 
म्हणजे जगणे स्वातंत्र्यात ॥८
तर मग यंत्र हाती जे मायिक 
झाले जे कायिक अंग एक ॥९
कामाव्यतिरिक्त दूर त्या सारावे 
पहाणे टाळावे डोकावून ॥१०
बंधन आखून घेई रे बांधून 
तरीच होईन कार्य काही ॥११
अन्यथा फेकून देई तू रे याला 
वन्ही लाकडाला एक सवे ॥१२
विक्रांत व्यसन जहाले करून 
सोडले पाहून त्याची  ॥१३
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

मंगळवार, १९ ऑगस्ट, २०२५

श्रावणाची गाणी

श्रावणाची गाणी 
***************"
तू श्रावणाची होत गाणी 
येतोस माझ्या मनी 
ही रात्र अष्टमीची 
भरलेल्या काळ्या ढगांची 
नेहमीच घालते मला भूल 
लाखो मनात दाटणारी 
तुझ्या स्मृतीची सघन ऊर्जा 
पोहोचते खोलवर माझ्या अणूरेणुत 
अणूरेणूत असलेल्या अनंत पोकळीत
 मग ती पोकळी जाते भरून 
तुझ्या ऊर्जेनी 
चैतन्याचे एक निळे निळे गगन 
अवतरत असते त्यातून 
ज्यात तूच असतोस अंतर्बाह्य भरून 
हे कृष्ण हे गोपाळ हे नंदनंदन 
हळूहळू ही नामावली ही 
होत जाते क्षीण क्षीण
उरते फक्त एक गुंजन 
कुणी तिला म्हणते बासुरीची धून 
कुणी म्हणते प्राणाचे होणारे स्पंदन 
तर कोणी म्हणते अनाहत श्रवण 
कुठलीही मीमांसा न करता 
त्या धूनी मध्ये मी जातो हरवून 
अवघे देहभान हरपून 
अन तू प्रगट होत असतोस 
श्रावणाचे गाणे होऊन
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

सोमवार, १८ ऑगस्ट, २०२५

अजूनही

अजूनही
*******
मी जातो अजून त्या तुझ्या वस्ती जवळून 
ते घर ती झाडी वृक्ष बोलावतात मला खुणावून 
मीही दाखवतो ओळख त्यांना कधी थोडेसे हसून 
तर कधी गर्दीत मिसळून जातो हळूच टाळून 
पण या साऱ्या बाहेरच्या हुलकावण्या
त्याला काहीच अर्थ नसतो हे असतो मी जाणून
कारण मला तू दिसत असतेस अगदी वेशीपासून
तिथे उभी असलेली सजून धजून 
कदाचित तुला माहीत नसेल तुझे हे मला दिसणे 
अन अगदी चार पावलावरून निघून जाणे 
या महानगरात कुणाचे भेटणे आणि दुरावणे 
किती साहजिक असते नाही 
खरंतर या महासागरात आपल्याला इथे
आपल्या खेरीज कोणीच ओळखतही नसते 
तरीही तुझी ओळख अजून का पुसत नाही
ते मला अजूनही कळत नाही 
पुसल्यावर गडद होणाऱ्या अदृश्य अक्षरासारखी
 उमटत असतेस तू माझ्या अस्तित्वावर पुन:पुन्हा

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

रविवार, १७ ऑगस्ट, २०२५

कृष्ण कळणे


कृष्ण कळणे
**********
कृष्ण कुणालाच कळला नाही 
कधीच कळला नाही 
कृष्ण कळला म्हणायची 
कुणाची हिंमतच होत नाही .
जस जसे कृष्णाला कळू पाहते मन 
जस जसे कृष्णाला न्याहाळू लागते मन 
स्तिमित स्तब्ध होते अन 
मौनात जावू लागते मन 
अथांग सागराच्या मध्यावर जाणे 
अन् त्या सागराला पाहणे असते ते
कणभर अस्तित्वाला घेवून 
अथांग शून्यात  हरवणे असते ते
तिथे दडपून जाते छाती  
कंप सुटतो सर्वांगाला
ही भीती केवळ अर्जुनाची नसते 
कृष्ण जाणवू लागल्यावर 
वाटणारी प्रत्येकाचीच भीती असते ती
ती भीती असते अज्ञाताची 
ती भीती असते अज्ञानाची 
ती भीती असते संपण्याची  
मग मागे उरते ते फक्त मौन. 
आणि त्या मौनात दाटलेली शरणागती 
तरीही कृष्ण कळत नाही 
कारण कृष्ण कळणे शक्यच नसते. 
पण मग या जाणीवेचा उद्गम 
घेऊन जातो अहंकाराला शून्यात
तेव्हा क्षणभर भास होतो
मनाला कृष्ण रुपाचा  
कणभर गंध येतो 
अस्तित्वाला कृष्ण रुपाचा
तेवढेही खूप असते या देहाला मनाला
आणि या जन्माला !

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

शनिवार, १६ ऑगस्ट, २०२५

पुत्रशोक



पुत्रशोक 
( डॉ. हरेश मंगलानी सरांच्या मुलाच्या, डॉ. रौनकच्या आकस्मक निधनाने उमटलेली  व्यथा)
*******
मुलाचे पार्थिव खांद्यावर वाहणे 
यासारखे दुःख नाही 
कुणाच्या जीवनात
आणि या जगात 
मुलाचे मरण असते बापाचे मरण
कारण बापच जिवंत राहतो 
आपल्या मुलाच्या रूपाने 
तो अनुस्युत प्रवाह जीवनाचा
ती अमरता गुणसूत्रांची 
ती अखंडता परंपरेची 
देशाची मातीची आणि मनाची 
खंडित होते एका टोकावर कायमचीच

भग्न होते एक मूर्ती 
आपल्या हाताने आपणच निर्माण केलेली सांभाळलेली जपलेली सजवलेली 
वर्षांनुवर्षे खपून तिच्यात प्राण भरलेली
कुठल्या तरी अप्रिय घटनेने
अनपेक्षित आघाताने अपघाताने 

भंग पावते एक स्वप्न 
सर्वात सुंदर स्वप्न 
संसार वेलीला येऊ घातलेल्या
नव्या बहराचे नव्या ऋतूंचे
प्राणप्रिय पुत्राच्या भरभराटीचे

ही निर्दयता कुणाची 
प्रारब्धाची काळात्म्याची का नियतीची
कळत नाही कणालाच 
जन्म जीवन मरणाचे असह्य ओझे
अधिकच जड वाटू लागते 
अन् खूपच रग लागते मनाला .

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

शुक्रवार, १५ ऑगस्ट, २०२५

लक्ष्य

लक्ष्य
*****
माझी प्रकाशाची हाव 
तुझ्या दारी घेई धाव 
असे पतंग इवला 
देई तव पदी ठाव 

गर्द काळोख भोवती 
जन्म खुणा न दिसती 
आला किरण लोचनी 
तूच दिशा तूच वस्ती 

असे जगत अंधार 
किती शिकारी भोवती 
पथ सुकर बिकट 
भय नसे माझ्या चित्ती 

जया दिसतो किरणा 
तया घेतसे ओढून 
तुझ्या असीम कृपेचे 
दत्ता मिळे वरदान 

तुज भेटण्या उत्सुक 
कणकण देहातील
चिंता नुमटे किंचित 
जरी ठाव न अंतर

मनी सुखाचे गुंजन 
मज कळे निजस्थान 
सुख कळण्यात थोर 
लक्ष्य अवधूत चिंतन

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

बुधवार, १३ ऑगस्ट, २०२५

दुर्लभ

दुर्लभ
*****
तुझी भक्ती दत्ता असे रे दुर्लभ 
मोतीयाचा गर्भ शिंपी जैसा ॥१
ज्याची कुळवाडी असे देवभक्ती 
सदाचार वृत्ती सर्वकाळ ॥२
ज्याचे मायबाप लीन तुझ्या ठायी 
पिकून पुण्याई फळे तिथे ॥३
जया अंतरात विरक्तीचे बीज 
जन्मा आलो लाज वाटे जया ॥४
तेच तुझे भक्त तुझे पदी रत 
असती मागत प्रेम फक्त ॥५
जया नको धन नको मानपान 
केवळ व्यसन तुझेच ते ॥६
तयाला प्रसाद तुझी या भक्तीचा 
देतोस तू साचा चोखाळून ॥७
मज त्या पदीचा करी रे किंकर 
सुखाचा सागर पावेल मी॥८

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ .

दिगंबर आजबे

स्व . दिगंबर आजबे *********** दिगंबर उर्फ डिगा आजबे जामखेड मधील सातवी आठवीच्या वर्गात माझ्याबरोबर शिकत होता . दत्ता आणि डिगा सख्...