शुक्रवार, २१ मार्च, २०२५

शिकार

शिकार
*****
शब्द चांदण्याचे 
भूल पाडतात 
नेती आडरानी 
चकवा देतात  १

स्पर्श तरंग ते  
सुख वर्षतात 
भोवरे होवून 
तळाशी नेतात २

डोळे लकाकत  
खोल घुसतात 
जग तोडोनिया 
वेदना देतात ३

स्मित सुमनाचे 
वाट मोडतात 
वणवा जीवना 
आग लावतात ४

अगा अवघे हे 
पारधीचे गाणे 
भुलता हरीण 
प्राण पडे देणे ५

दिसे दूरवर 
अमृताचे तळे 
धाव धावूनिया 
मृगजळ मिळे ६

असे हा जिहाद
खुळ्या प्रेमासाठी 
बाण  मखमली 
शिकार शेवटी  ७

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

गुरुवार, २० मार्च, २०२५

शल्य

शल्य
****
पुन्हा पुन्हा तुझे गाणे मनात या उमटते
त्याचं शब्दी त्याच वृत्ती पुन:पुन्हा जन्म घेते ॥ 

पुन्हा पुन्हा तीच वाट मज नागमोडी दिसे 
तीच तुझी पडछाया तेच येणे पुन्हा भासे ॥

तुझ्याविना जीवन हे चाले नीट नेटकेसे 
घरदार संसार हा सारे काही ठीक असे ॥

माळेतील मणी जणू ओवलेले एकसरी
हरवला कोणी जरी नवा तया जागेवरी ॥

परी दोर जाणतोच कोण कुठे निसटले 
मौन त्याची गाठ घट्ट शल्य असे झाकलेले ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ ..

बुधवार, १९ मार्च, २०२५

हट्ट

हट्ट
****
एक हट्ट माझा पुरवी दयाळा 
माळ तुझी गळा पडो माझ्या ॥

एक स्वप्न माझे येऊ देत फळा 
पाहू दे रे डोळा रूप तुझे ॥

एक अर्थ माझ्या देई रे जीवना 
पायीच्या वाहणा करी मला ॥

अगा ज्ञानदेवा जीवीच्या जिव्हारा 
पावुलाशी थारा देई मला ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ ..

मंगळवार, १८ मार्च, २०२५

आळंदीत

आळंदीत
********
चालला गजर राम कृष्ण हरी 
 नाद नभावरी दुमदूमे ॥

 वाहे खळखळ इंद्रायणी जळ 
जाय मनोमळ वाहूनिया ॥

वैष्णवांची दाटी लाट लाटेवरी
पुण्य भूमीवरी पुण्यमूर्ती ॥

जया जैसा भाव तया तैसे फळ
माऊली दयाळ देत असे ॥

भारलेले क्षण दिव्य कणकण 
गेलो हरखून पाहुनिया ॥

विक्रांता जाहले जड देह ओझे 
चित्त चैतन्याचे साज ल्याले ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ ..

सोमवार, १७ मार्च, २०२५

सावल्या

सावल्या
****
जरी जीव खुळा उतावीळ होता 
कुणासाठी तरी टाळल्या मी वाटा 

कुणासवे तरी थांबलो बोलता 
मनात असंख्य असून कविता 

कुणा सवें झालो तटस्थ उदास 
कोरडी करून डोळ्यातील आस 

असेल कुठल्या जन्माचे हे देणे 
अथवा पुढे हे ऋण मी फेडणे

किती सोडवल्या बसलेल्या गाठी 
 नच येवू दिले नाव ते ही ओठी

परी कानी येती कुठले हे सूर 
विराण एकांती उरी का काहूर 

सुटूनिया गेले गाव दूरवर
तरी खुणावती वाटा का धूसर

हालती सावल्या मनात दडल्या 
चाहुली वाचून भोवती दाटल्या

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ ..

रविवार, १६ मार्च, २०२५

ज्ञानदेवा - प्रार्थना


ज्ञानदेवा - प्रार्थना
***************
उगमाला ओढ सदा सागराची 
तशी ह्या जीवाची दशा होय॥१

नुरो माझेपण उरो तुझेपण 
घडो समर्पण ऐसे काही ॥२

सरो माझी वाट तुझ्या आळंदीत 
वळणे परत घडू नये ॥३

सरो माझे श्वास तुझ्या गाभाऱ्यात 
देह निर्माल्यात जमा व्हावा ॥४

अस्तित्व कापूर पेटो धडाडून 
नुरावे निशाण इवलेही ॥५

इतुकी प्रार्थना माझी ज्ञानदेवा 
तुझाच मी व्हावा माझेविना ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ ..

शनिवार, १५ मार्च, २०२५

रंग

रंग
***"
उधळलेस रंग किती 
रंगीत झाले जीवन 
सरुनही सण सारे 
उतरती न अजून ॥

रंग तुझ्या डोळ्याचे 
रंग तुझ्या स्पर्शाने 
रंग तुझ्या लोभाचे
रंग तुझ्या रागाचे ॥

जीवनाची सारी पाने 
गेली रंगीत होऊन 
उलटून पाहताना 
गमती ताजी अजून ॥

तुझ्यामुळे मजलागी 
रंग जीवनाचा कळे 
प्रेम विरह ओढीचे 
इंद्रधनु मनी झुले ॥

उधळले काय किती 
मी मज नच स्मरते 
हासू तुझ्या डोळ्यातले 
कृतार्थ मज करते ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ ..

दिगंबर आजबे

स्व . दिगंबर आजबे *********** दिगंबर उर्फ डिगा आजबे जामखेड मधील सातवी आठवीच्या वर्गात माझ्याबरोबर शिकत होता . दत्ता आणि डिगा सख्...