बुधवार, १९ फेब्रुवारी, २०२५

भाग्यवान


भाग्यवान
********
सुटूनिया लोभ भय हरवावे 
सुखही कळावे मोहमयी ॥१

चालावे उदास कळून जीवास 
सांडून सायास सुरक्षेचे ॥२

हवाय कुणाला जमीन जुमला 
बॅलन्सी भरला वेडेपणा ॥३

शून्यात उगम शून्यात मुक्काम 
शून्यात विराम ठरलेला ॥४

सारूनी पडदा मजलागी दत्त 
सदा दावी तथ्य पुन्हा पुन्हा ॥५

विक्रांत भाग्याचा दत्ताने धरला
जगाचा सुटला बंदीवास ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

मंगळवार, १८ फेब्रुवारी, २०२५

यमुना

यमुना 
*****
अव्यक्त यमुना तव डोळ्यातील 
ओढून मजला नेते दूरवर 

संभ्रम किंचित वेडी हुरहूर 
दिसे खिन्नता डोही खोलवर

मावळतीचा तो चंद्र धूसर 
घेऊन येतो उरात काहूर

हे तर घडले होते घडणार 
अटळ लिखित काळ पटावर 

नकोस शोधुस पुन्हा तीरावर 
पाऊल उठली मृदू वाळूवर 

पण विरहाची नको हळहळ
हि युगे इवली इवले अंतर

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 
 

सोमवार, १७ फेब्रुवारी, २०२५

वांच्छा

वांच्छा
******
या मनीचे हळू सांगतो 
आई तुझ्या मी कानात 
घे बांधुनी गाठोडे हे 
ठेव तुझ्या फडताळात 

फार काही भार नाही 
अडगळ थोडी होईल ही 
पायाखाली ठेव हवे तर 
भाग्य पदरी पडो ते ही 

घे  क्षणभर  उशाला वा
आसन करून  बसायाला 
तव कारणे देह पडावा 
आशिष देई या जन्माला 

कर पोतेरे सदनामधले 
देई दास्य घर पुसायला 
मी फक्त तुझाच व्हावा 
अन्य नसे वांच्छा मजला 
🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

रविवार, १६ फेब्रुवारी, २०२५

बाजार

बाजार
******
आता मी जगतो नाटक कळून 
स्वतःला दावून सुख दुःख ॥

आले गेले धन मान अपमान 
हिशोब पुसून साठवला ॥

जरी माझे इथे मुळी काही नाही 
ध्यान नित्य राही  चित्तात या ॥

लेक बाळ घर सांभाळले सारं
शिक्षण संस्कार देऊनिया ॥

परी ती पाखरं जातील उडून 
चित्ता या म्हणून दार नाही ॥

मित्र गोत्र सारे घडीचे पाहुणे 
आपले वाहणे पाही मन ॥

विक्रांत निघाला दत्ताच्या गावाला 
सोडून भरला बाजार हा ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

शनिवार, १५ फेब्रुवारी, २०२५

गारुडी

गारुडी
*****
द्वैत अद्वैताचे मज नसे भान 
वाचलेले ज्ञान शब्दरूपी ॥१

द्वैत अद्वैतात दिसे मज दत्त 
माझ्या हृदयात विराजित ॥२

मांडूनिया ठाण असे सदोदित 
आहे रे मी दत्त म्हणे जणू ॥ .३

जाणे जो सगुण तोच तो निर्गुण
गुणातीत गूण  स्वरूपाचे ॥४

नामरुपासवे कोंदाटे चैतन्य 
माझे हे मी पण वेटाळून ॥५

तरीही विक्रांता काहीच कळेना
गारुडी डोळ्यांना भुल घाले ॥६

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

शुक्रवार, १४ फेब्रुवारी, २०२५

कोळी

कोळी
*****
एक एक विचाराचा तंतू तंतू विणतांना 
क्षणात ते कोळीजाळे मुखातून काढतांना ॥

हरखला कोळी वेडा आणि विश्वाकार झाला 
माझे पण ऐसे व्याला तंतूमध्ये रिझु गेला  ॥

एक एक विचाराचा तंतू तंतू पाहताना 
हरवले कोळी जाळे स्वस्थानात पुन्हा आला ॥

मनातील तंतु त्याचे तंतूमय जग होते 
तेच त्याचे कारकत्व गंतव्यही तेच होते ॥

मग पक्षी ग्रास झाला सरड्याच्या पोटी गेला 
व्यक्ताव्यक्त जगताचा जड भास फक्त गेला ॥

पक्षी तोच सरडाही शिकार तो शिकारीही
मरणारा मारणारा नव्हते तेथे कोणीही ॥

 नसलेल्या जगताचे असणे पण निमाले
 नसलेपण पुनरपि नाही होत मिरविले ॥

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

गुरुवार, १३ फेब्रुवारी, २०२५

कुबेरास


कुबेरास
******
माझे मज देई तुवा लुटलेले 
बहु सांभाळले महाधन ॥१
गळ्यात बांधून जगात फिरलो 
उशाला निजलो घेऊन जे ॥२
असे बरे नव्हे तुझे हे वागणे 
जीव दुखावणे खाष्टपणे ॥३
आहे कमावले आहे जमवले 
श्रम जे केले रात्रंदिस ॥४
भक्तीचे भांडार ज्ञानाचे ते कोश 
मिळविले खास अभ्यासून ॥५
एकेक रुपया बंदा साठवला 
गाठीला मारला निरंतर ॥६
जर तूच चोर होशील रे देवा 
तर मग ठेवा कुठे ठेवू ॥७
दे बा लवकरी माझे हे घबाड 
सोड रे लबाड चाळा तुझा ॥८
विक्रांत उदास झाला धनावीन 
देतसे लोटून कुबेराला ॥९

🌾🌾🌾
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे 
https://kavitesathikavita.blogspot.com  
☘☘☘☘ 🕉️ 

झाड

झाड **** या किनाऱ्याला  मी चालत आहे  मी माझ्यातच रुजत आहे  मी झाड होत आहे  इथले पाणी खोलवर  माझ्या आत झिरपत आहे  तोच मी जरी  काह...